सोमवार, २७ जानेवारी, २०१४

ग्रंथ तुमच्या दारी


ग्रंथ तुमच्या दारी
सुनील हिरवे - मंगळवार, १६ नोव्हेंबर २०१०
वाचनसंस्कृती रुजावी यासाठी  कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ (मोफत) या उपक्रमांतर्गत वाचकप्रेमींच्या घरी जाऊन पुस्तके  देण्याचा उपक्रम राबवला जात आहे . या आगळ्यावेगळ्या उपक्रमाविषयी..
‘वाचन म्हणजे प्रियजनसंगे विमानातूनी हिंडत जाणे’ कवी गिरीश यांच्या प्रतिभास्पर्शातून अक्षरबद्ध झालेले काव्य बरेच काही सांगून जाते. आज या ओळीची सत्यता किती लोकांना पटते आणि किती लोक असा आनंद मिळविण्यासाठी झटतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पुस्तक माणसाला नक्की देतात तरी काय, या प्रश्नाचं उत्तर एकच ठोसपणे काही देता येईल असं नाही. व्यक्तीपरत्वे या उत्तरात भिन्नता असू शकते, पण पुस्तक जे काही देतात ते मात्र चांगलंच असतं, यात कोणाचेही दुमत होण्याचे कारण नाही. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती नवे वळण घेत आहे.
इंटरनेटमुळे वाचन संस्कृतीला नवीन अर्थ मिळू लागला आहे. पुस्तकरूपाने कथा-कादंबऱ्यांऐवजी त्या कॉपी नेटवर कुठे मिळते का? हे गुगलिंग करणारी अनेक मंडळी आहेत. मात्र प्रत्यक्ष पुस्तकातून साहित्य वाचण्याची मजा आणि अनुभव काही औरच आहे. अशा परिस्थितीतही वाचन संस्कृतीतून नागरिकांचा संवाद वाढावा याकरिता पुण्यातील शासकीय फोटोझिंको मुद्रणालय येथे उच्च पदावर व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या रुपेंद्र मोरे यांचे प्रयत्न सुरु आहेत. मूळचे नाशिकचे असलेले रुपेंद्र मोरे यांचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानशी पूर्वीपासून संबंध  होता. त्यांचे परममित्र विनायक रानडे यांनी प्रथमत: ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम नाशिक येथे सुरू केला. कुणी तरी म्हटलं आहे की, माणसाला मिळणारी कुठलीही संधी ही छोटी असते, पण भविष्यात तिचा परिणाम खूप मोठा असतो. नाशिक येथे शासनाच्या साहाय्याने कुसुमाग्रज स्मारक व वाचनालय उभे राहिलेली वास्तू ही महाराष्ट्राच्या दृष्टीने प्रेरणादायी निश्चितच ठरली आहे. हा खरोखर मराठी साहित्यप्रेमींना मिळालेला मान आहे, असे वाटते. नाशिकमधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानने ग्रंथ तुमच्या दारी हा सुरू केलेला उपक्रम बघून रुपेंद्र मोरे यांनीदेखील शासकीय सेवा करीत असताना सामाजिक बांधीलकी जोपासून वाचन संस्कृती व नागरिकांचा संवाद वाढावा म्हणून हा उपक्रम पुण्यात  सुरू केला. पुस्तके घरपोच पोहोचवून हा अनुभव देण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानने पुढाकार घेतला असून, ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या त्यांच्या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. अवघ्या तीन महिन्यांमध्ये प्रतिष्ठानकडे २५ ग्रंथपेटय़ा तयार असून सध्या ८० सामाजिक संस्था ही ग्रंथपेटी मिळविण्यासाठी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत.
पुण्यातील उपक्रमाची सुरुवात केसरीवाडय़ापासून झाली.  न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी हे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष असून, त्यांनी स्वत: एक ग्रंथपेटी भेट दिली. ग्रंथपेटी शुभारंभ कार्यक्रमात न्यायमूर्तीनी सांगितले की, सध्या घरे धर्मशाळेसारखी व पंचतारांकित हॉटेलसारखी झाली आहेत. घरातलं घरपण जोपासायचं असेल तर माणसामाणसातील भावनिक गुंतागुंत टिकवून ठेवायची असेल तर वाचन गरजेचे आहे. म्हणून कदाचित जगातील पहिल्या ग्रंथालयास ‘आत्मरुग्णालय’ असे म्हणत.  जब्बार पटेल यांनीही पुण्याला ग्रंथालय वाचन संस्कृतीची मोठी परंपरा आहे, असे विचार मांडले. या उपक्रमाकडे बघून प्रेरित झालेले शैलेश टिळक (लोकमान्य टिळक यांचे वंशज) यांनी लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ एक ग्रंथपेटी भेट दिली.
‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमांतर्गत शंभर पुस्तकांची ग्रंथपेटी दोन महिन्यांसाठी ज्येष्ठ नागरिक संघ, बचत गट, सोसायटी, सामाजिक मंडळ, महिला मंडळ, सामाजिक संस्था अगदी घरापर्यंत विनामूल्य पोहोचविली जाते. या उपक्रमांतर्गत शंभर वेगवेगळ्या पुस्तकांची पेटी तयार करून शहरातील विविध भागांतील सेवाभावी संस्था आणि व्यक्तींची निवड करून प्रत्येकाकडे एक पेटी सुपूर्द केली जाऊन त्या-त्या परिसरातील वाचकांना मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. पुस्तकांसाठी फी आकारण्यात येणार नसली तरी त्या पुस्तकांची जबाबदारी त्या ठिकाणच्या पालक संस्था अथवा केंद्रप्रमुखाची राहते. दर दोन महिन्यांनी या पेटीतील पुस्तके बदलली जातात. आतापर्यंत प्रतिष्ठानने साधना कला मंच (कोथरूड), अक्षरस्नेह वाचनालय (धायरी), बोपोडी ज्येष्ठ नागरिक संघ, सहकारनगर सोसायटी, ज्ञानेश्वरी महिला बचतगट (चिंचवड) या ठिकाणी ग्रंथपेटय़ा वितरित केल्या आहेत. शासकीय फोटोझिंको मुद्रणालयातील अधिकारी रुपेंद्र मोरे यांनी हा उपक्रम घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी विडा उचलला आहे. वाचन संस्कृती वाढीस लागावी व एकमेकांमध्ये हरवत चाललेला संवाद पुन्हा एकत्र आणण्यासाठी त्यांची धडपड आहे. आज माणसांतला संवाद हरवत आहे. शेजारी राहतो, मात्र सोबत राहत नाही. अशा परिस्थितीत वाचन संस्कृतीच हरवलेला संवाद परत आणण्यास मदतीची ठरेल. मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळावी, मराठी साहित्य सर्वदूर पोहोचावे यासाठी कुसुमाग्रजांनी अपार मेहनत घेतली. त्यांच्याच प्रेरणेने ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
 जवळपास ग्रंथालय नसल्याने अन्य काही कारणास्तव वाचकांना पुस्तके उपलब्ध होत नाहीत किंवा आर्थिक परिस्थितीमुळे आजची पुस्तके विकत घेता येत नाहीत. त्यांच्याकडून या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
थोडक्यात सांगायचे नागरिकांचे समाधान तेच आमचे आशीर्वाद असे मोरे म्हणतात. शासकीय काम सांभाळून माणसांचा आणि साहित्याचा वावर असेल असे नि:स्वार्थ काम नेहमीच माणसाला माणूसपण जपण्यासाठी प्रेरित करीत असते, असे मोरे म्हणतात.
या उपक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या ग्रंथपेटीची किंमत त्यातील शंभर पुस्तके धरून रुपये १५ हजाराच्या आसपास आहे. यासाठी ज्यांना सामाजिक कार्य करावयाचे आहे त्या संस्था, उद्योग किंवा व्यक्तीकडून १५ हजार रुपयांचा धनादेश देणगी म्हणून ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नाशिक, या नावे घेतला जातो. त्यावर आयकर सवलतही मिळते व तेवढय़ा किमतीची पुस्तके समाजात अनेक व्यक्तींनी वाचल्याने समाधान मिळते. पुण्यात २५ प्रायोजक उभे राहिले, हा उपक्रम यशस्वी होण्यास मदत झाली.
वाचन संस्कृती कायम ठेवण्यासाठी ग्रंथालयेच असली पाहिजेत, या समजुतीला ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाने तडा दिला आहे.
 वाचकांना यामुळे चांगला पर्याय निर्माण झाला आहे, असे म्हणता येईल. इंटरनेट सिटी, फ्रीक आऊट आदी फॅडमुळे लोकांची वाचनाची सवय मोडली आहे. पूर्वीसारखी साहित्याला मागणी राहिली नाही.. नवीन पुस्तकांवर आता चर्चा होत नाही.. ही वाक्ये म्हणजे निव्वळ गैरसमज आहेत. याच्या बरोबर उलट परिस्थिती आज दिसून येत असल्याने आतापर्यंतच्या निरीक्षणातून दिसून येत असल्याचे मोरे सांगतात. शहरातील प्रत्येक भागात ग्रंथालये असणे शक्य नाही, असली तरी कामातून वेळ काढून ग्रंथालयाच्या वेळेत पुस्तक जाऊन आणणे जमत नाही. ज्येष्ठ नागरिकांनाही वयोमानानुसार ग्रंथालयात जाणे शक्य होत नाही. अशा लोकांना वाचनाची भूक व मित्र म्हणून भागविण्यासाठी ‘ग्रंथ तुमच्या दारी’सारखे पर्याय नक्कीच उपयोगी पडतील.
पुण्यासारख्या शहरात हा उपक्रम राबविणे म्हणजे सर्वात जिकिरीचे काम; परंतु  शासकीय फोटोझिंको मुद्रणालयातील रुपेंद्र मोरे व त्यांचे सहकारी व कर्मचारी यांचे शेकडो हात मदतीला अहोरात्र झटत आहेत, ही एक गौरवास्पद बाब निश्चितच मानली पाहिजे. त्यामुळे निश्चित अशा उपक्रमांचा फायदा घेतला तरच पुढील  पिढीपर्यंत साहित्य पोहोचेल,  मराठी भाषेला जगात प्रतिष्ठा लाभावी म्हणून आयुष्यभर ध्यास घेतलेले कवी कुसुमाग्रज प्रतिष्ठानने ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या नव्या उपक्रमाने पुण्यातील वाचन संस्कृतीचा प्रवास वाढणार आहे.
 गरज आहे ती फक्त आपणही या प्रवासात सहभागी  होण्याची.. कुसुमाग्रज  प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला व शिलेदारांना  खरंच सलाम..!!  ग्रंथपेटी  मिळविण्यासाठी  संपर्क - ९४२३१४८०४८  ईमेल-  rupendramore5@yahoo.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा