सोमवार, ३ नोव्हेंबर, २०१४

नेदरलॅंडमध्ये फडकणार मराठी ग्रंथसंपदेचा झेंडा

नाशिक - कुसुमाग्रज प्रतिष्ठानने वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी सुरू केलेला "ग्रंथ तुमच्या दारी‘ उपक्रम महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, सिल्व्हासा मार्गे दुबई, ओमान, बहारिनमध्ये पोचलायं. हाच उपक्रम आता पुढचं पाऊल टाकत असून कथा, कादंबरी, विनोदी, रहस्य, व्यक्तिचरित्र, अनुवादित असे विविध प्रकारचे साहित्य प्रकार नेदरलॅंडमध्ये पोचणार आहेत. त्यासाठी नेदरलॅंडमधील महाराष्ट्र मंडळाने पुढाकार घेतलाय.
मुंबईमधील गौरी आणि विनय कुलकर्णी हे नेदरलॅंडमध्ये स्थायिक झाले आहेत. या दाम्पत्याने मराठी माणसांसाठी आपल्या आवडत्या साहित्यिकांची ग्रंथसंपदा उपलब्ध व्हावी, अशी विनंती प्रतिष्ठानच्या वाचनालय समितीचे अध्यक्ष विनायक रानडे यांना केली. त्यानुसार प्रत्येकी 25 ग्रंथसंपदेच्या 12 पेट्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रानडे हे नेदरलॅंडमध्ये पोचवणार आहेत. त्यातील आठ पेट्या नेदरलॅंडमधील महाराष्ट्र मंडळाने प्रायोजित केल्या आहेत, तर चार पेट्यांची भेट नाशिकमधील उद्योजक श्रीरंग सारडा यांच्या देणगीतून दिल्या जाणार आहेत. उपक्रमाची मुहूर्तमेढ 2009 मध्ये 11 पेट्यांनी नाशिकमध्ये रोवली गेली. आतापर्यंत वाचन संस्कृतीची हीच चळवळ 521 पेट्यांपर्यंत पोचली असून ग्रंथसंपदा सव्वाकोटी रुपयांची झाली आहे. महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी विविध महाराष्ट्र मंडळे हा प्रकल्प राबवत आहेत. त्यात मात्र नेदरलॅंडमधील महाराष्ट्र मंडळाने वाचन संस्कृतीला बळकटी देणारा उपक्रम राबवण्याचे ठरवले, असे सांगून रानडे म्हणाले, की नेदरलॅंडमध्ये सुरू होणारी ही वाचन संस्कृतीची चळवळ युरोपभर विस्तारित होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा