शनिवार, १४ मार्च, २०१५

राजीव तांबे कार्यशाळा - ८ मार्च २०१५ नाशिक वाचक मेळावा


बालपण हे दर पिढीगणिक सतत बदलतं असतं . आमच्या वेळी नव्हतं बुवा असं , हे पालुपद घरोघरी मातीच्या चुलींसोबत टांगलेलंच असावं. आत्ताची मुलं आणि त्यांचे आई-वडिल यांच्यात मात्र ही जनरेशन गॅप जरा जास्तच. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात उपलब्ध असणारी अनेकोनेक नवनवी गॅजेट्स , मोबाइल्स, इंटरनेट या आभासी दुनियेत चटकन रमणाऱ्या या पिढीचे प्रश्नही वेगळे. पालकत्त्व , विवेकी पालकत्त्व , मुलांचं मानसशास्त्र , क्वालिटी टाईम , न्युक्लियर फॅमिली वगैरे शब्द हे आज सातत्याने नजरेसमोर येतात . हल्ली टिव्हीवर , वृत्तपत्रांमधून मुलं आणि त्यांच्याबद्दलचे लहानमोठे प्रश्न याबद्दल साधकबाधक चर्चासत्र सतत होत असतात.

करमणूकीच्या भरमसाट साधनांची रेलचेल नसणाऱ्या पिढीत सुट्टी किंवा मोकळा वेळ हा दंगामस्ती आणि वाचनासाठीचा होता. आज चित्र पालटतय. अशावेळी मुलांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानाने ’माझे ग्रंथालय’ बालविभागाद्वारे या मुलांसाठी एक अनोखी वाचक चळवळ सुरू केली आणि या चळवळीला पालकांचा आणि बालदोस्तांचा उदंड प्रतिसादही लाभला.

’२१ अपेक्षित प्रश्नसंच ’- ओळखीचा वाटतोय किनई हा शब्द . पण आज चौफेर मुशाफिरी करणाऱ्या या चिमुरड्यांच्या मेंदूच्या कारखान्यात निर्माण होणाऱ्या २१, २१० ते २१०० ’अनपेक्षित’ प्रश्नांच्या फैऱ्यांना तोंड देतांना पालकांची मात्र दमछाक होते. आणि मग आपल्यालाही एखादे गाईड मिळाले तर काय मदत होईल नाही असा विचार मनात डोकावल्याशिवाय रहात नाही. या गाईडमंडळींमधे अग्रक्रमाने नाव येते ते श्री. राजीव तांबे यांचे.

’माझे ग्रंथालय’ बालविभागाच्या स्थापनेनंतरच्या पहिल्याच कार्यक्रमाला राजीवजी प्रमुख पाहूणे म्हणून येणार ही बातमी सगळ्यांसाठीच आनंदाची होती. राजीवजी युनिसेफसाठी शिक्षण सल्लागार आहेत, अभ्यासक्रम समितीचे ते सदस्य आहेत, राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा पुनर्विलोकन समितीचे सदस्य, केंद्र-राज्य शासनाचे अनेक पुरस्कार मिळवणारे तसेच कथा, कविता, पालकत्त्व अश्या अनेक विषयांवर ६९ पुस्तके लिहीणारे ही ओळख आहेच मात्र बच्चेकंपनी त्यांना ओळखते ते ’गंमतशाळा’ चालवणारे त्यांचे ’दोस्त’ राजीवकाका म्हणून.
राजीवजी दोन मुद्द्यांवर पालकांशी आणि बालदोस्तांशी बोलले. ’अभ्यास आणि वाचन’ व ’परिक्षेला जाता जाता ’ .

मुलांना समजेल ,रुचेल, त्यांना त्यांची अगदी आपलीशी वाटेल अश्या भाषेत साधे सोपे असे पण अर्थपूर्ण मार्गदर्शन ही राजीवजींची खासियत. सहज साध्या सोप्या दाखल्यांतून त्यांनी बालग्रंथालयाच्या पालक आणि बच्चेकंपनीशी संवाद साधला. खुसखुशीत उदाहरणांमधून आपल्या पालकांना ’इंजेक्शन’रूपी टोचणी देणारे राजीवकाका क्षणार्धात बच्चेकंपनीचे आपले झाले. 

पालकांनी भूतकाळात न जगता मुलांच्या वर्तमानात त्यांच्यासोबत असावे. मुलांना ’लेबल’ लावू नका तसेच मुलांना त्यांची चूक दाखवून न देता काय बरोबर हे मात्र वारंवार सांगा असे मुद्दे राजीवजींनी मांडले. वाचनाचे महत्त्व, वाचन वाढल्यास भाषासमृद्धी वाढून त्याचा विचारक्षमता वाढवण्यात कसा हातभार लागतो हे ही त्यांनी अगदी सहज मुलांना उलगडून दाखवले.

दिलखूलास हसणारी मुलं आणि वक्त्याकडून आपल्या वागणूकीतल्या दोषांबद्दल आरसा समोर धरून चिमटे काढले जात असले तरी त्याचं मर्म अलगद समजलेला पालकवर्ग हे कार्यशाळेचे महत्त्वाचे यश जाणवत होते. आजच्या दिनचर्येत मुलांना आधिच इतकी धावपळ असते की ते वाचनाकडे चटकन वळत नाहीत , मात्र या कार्यशाळेनंतर मुलांना वाचावेसे नक्की वाटेल.

कृतीमधे बदल हवा असेल तर आपण मनाला देत असलेला ’इनपुट ’ बदलायला हवा हे समजावताना राजीवजी म्हणाले की आपण मनाला सकारात्मक इनपुट दिला असता आपली भाषा बदललेली असते , भाषा बदलली की त्या अनुषंगाने येणारे विचार बदलतात आणि विचारांद्वारे आपली कृतीदेखील सकारात्मक होते. सभाधीटपणाबद्दल बोलताना ते म्हणाले, आपण मनाला सतत सांगायला हवे की मी जे योग्य ते, बरोबर तेच करणार. लोक माझ्या झालेल्या एखाद्या चुकीला हसले तर हसू देत. स्टेजवरून बोलताना मी कुठे कमी पडलॊ तरी मी स्टेजवर आहे आणि एकदिवस नक्कीच यशस्वी होणार मात्र हसणारी लोकं ही प्रेक्षकात होती आणि तिथेच असतीलही.

परिक्षेबद्दल येणाऱ्या तणावावर मात करण्यासाठी मार्गदर्शन करताना राजीवजींनी मुलांना सांगितले की प्रश्नपत्रिका हातात आली आणि एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसले की आपण घाबरून जातो आणि येणाऱ्या तणावात आपल्याला येत असलेली उत्तरं देखील चुकवतो. अश्यावेळी आपण मनाला शांत ठेवत , येणाऱ्या उत्तरांबद्दल आधी स्वत:ला शाबासकी देत , आत्ता येत नसलेले उत्तर देखील मला येणारच असा सकारात्मक विचार केल्यास हळूहळू उत्तरं आठवत जाईल व तणावमुक्त पद्धतीने सहज परीक्षा पार पडॆल.

सोप्या आणि ओघवत्या भाषेत केले गेलेले, मुलांच्या रोजच्या आयुष्यातल्या गणितातले दाखले दिलेले, पालकांना नक्की कसे वागले पाहिजे याबद्दल सांगणारे राजीवजींचे शब्द उपस्थितांच्या ’दिमाग मे फिट’ नक्कीच झाले असतील.पालक आणि पाल्यांमधली दरी कमी व्हायला मदत होइल. तसेच ’तू छान वागलास हं’ , ’आत्ता नाही जमले तर पुन्हा प्रयत्न कर’ , ’शाब्बास’ अशी ’अमराठी’ वाक्य पालक घरोघरी उच्चारू लागतील याबद्दल शंका नाही.

या कार्यशाळेच्या यशात कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या विश्वस्त सौ.विनिता धारकर, श्री.विनायक रानडे तसेच बालग्रंथालयाच्या समन्वयक सौ. स्वाती गोरवाडकर यांनी परिश्रम घेतले. आलेल्या छोट्या दोस्तांना सुकामेव्याचा खाऊ देण्याची जबाबदारी श्री.कौस्तुभ मेहेता यांनी उचलली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विनायक रानडे यांनी केले. सौ. मधुरा दिवाकर यांनी कार्यक्रमाची सुरूवात सुमधुर इशस्तवनाने केली. तर सुत्रसंचालन डॉ कौसर तांबोळींनी केले. सौ.तन्वी देवडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपस्थित लहान मुलांना त्यांची पुस्तकांची बॅग देण्यात सौ. रश्मी दांडेकरांचं सहकार्य होतं. कुसुमाग्रज प्रतिष्ठानातील कर्मचारी वर्गाने संपूर्ण कार्यालयीन भार पेलला. श्री. अरूण नातू यांनी उपस्थितांच्या अल्पोपहाराची व्यवस्था चोख ठेवली. तसेच उपस्थित तमाम श्रोत्यांच्या टाळ्यांनी आणि खळखळून हसण्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान बालग्रंथालय या योजने अंतर्गत उत्तमोत्तम निवडक अश्या एकूण २५ पुस्तकांची एक बॅग प्रत्येकास देण्यात येत असून त्यात १५ मराठी आणि १० इंग्लिश पुस्तकं आहेत. माझं ग्रंथालय बालविभागाचे सदस्यत्व घेण्यासाठी ठराविक देणगीमुल्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानास देण्यात येते. सामाजिक मुल्यांची जपणूक करत या बालग्रंथालयातली पहिली पेटी माई लेले श्रवण विकास विद्यालयाला देण्यात आली होती. तसेच राजीव तांबेंच्या हस्ते माइलस्टोन या ऑटिझमच्या विद्यार्थ्यांच्या शाळेस एक पेटी देण्यात आली.

दिवसेंदिवस बहणारा हा बालवाचकांचा मेळावा आणि त्यासाठी राजीव तांबेंसारख्या बालकांच्या ’दोस्तांचे’ लाभणारे सहकार्य पहाता या रोपट्याचे लवकरच एखाद्या वटवृक्षात रुपांतर होइल याबद्दल निश्चित खात्री वाटते.

तन्वी देवडे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा