गुरुवार, ८ जानेवारी, २०१५

कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक – ग्रंथ तुमच्या दारी उपक्रम – ठाणे केंद्र-३रा वर्धापन दिन -१६ नोव्हेंबर २०१४ वृत्तांत अरविंद गजानन पेंडसे

साहित्य पंढरीची वारी


       ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील पुस्तक वाचायला घेतले पण  लक्ष लागेना. कारण हि तसेच होते. १६ नोव्हेंबर २०१४ ला ठाणे शाखेचा वर्धापनदिन कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे नाव हि समर्पक "पालखी निघाली कुसुमाग्रजांची ". रसिक वाचक सकाळी ६ वाजता  थंडीची चाहूल देणाऱ्या गारव्या मध्ये सांगितल्या ठिकाणी पालखीची वाट पहात होते. प्रारंभीच्या मुक्कामाहून ब्राम्हण सोसायटीहून बस निघाल्याचा संदेश आमच्यापर्येंत आला. दुसरा पडाव होता नितीन सिग्नल. लांबूनच  पालखीचे दर्शन होताच सर्वांच्या अंगात उत्साह संचारला. आम्हीही पालखीत सहभागी झालो आणि साहित्य पंढरीच्या वाटेने आमचा प्रवास सुरु झाला. वाटेतच घोडबंदर ठाणे येथून आलेली पालखी आमच्यात येउन  मिसळली . 
                          ज्ञानियांच्या वारीमध्ये गजर हरिनामाचा 
                           साहित्य पंढरीच्या वाटेवर गजर साहित्यनामाचा 
       संयोजक चांगले असले कि वेळी कसा गेला हे समजत नाही. संपूर्ण प्रवासात श्री अरविंद जोशी व सौ रश्मी जोशी व त्यांच्या सहकारयानी  प्रश्न मंजुषेने सर्व साहित्यरसिकांना गुंतुवून ठेवले.  अर्धे अंतर पार केल्यावर थोडी विश्रांती व अल्पोपाहारासाठी सर्वजण हॉटेल ऑलिव गार्डन मध्ये गेलो. तिथली पण व्यवस्था अतिशय सुरेख होती. पुन्हा उरलेला अर्धा  प्रवास प्रश्न मंजुषा सोडवत आपल्या पंढरीच्या दारात अर्थात कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या दारात येउन पोहोचलो. 

        ठाणे येथून आलेल्या रसिक वाचकांच्या स्वागताला आलेल्यांमध्ये ग्रंथ तुमच्या दारीचे प्रवर्तक श्री. विनायक रानडे तसेच   त्यांचा गोतावळा होता. गुलाब अत्तराने सर्वांचे स्वागत झाले.चहा पाणी झाले आता वेळ होती  वाचक पंढरीच्या देवाची पूजा करण्याची त्याच्या चरणी  आपल्यातील अविष्कार अर्पण करण्याची  एक एक पुष्प अर्पण केले जात होते. सुरवात झाली तात्यासाहेबांच्या "गर्जा जयजयकार " ने. कोणतीही क्रांती घडायची झाली कि अनेकांचे सहकार्य लागते ग्रंथ पेटी योजनेची क्रांती अशीच पसरत होती. आता तर परदेशातूनही ही प्रतिसाद येत होता. यावरून आठवण झाली ती "पाठीवर हात ठेवून लढ म्हणा " या कवितेची त्याच्या गुलजारने केलेल्या  हिंदी भाषांतराची अश्या कवितांची सुद्धा कार्यक्रमात लयलूट झाली. कथा झाल्या, मराठी माणसाच्या करमणुकीत  स्थान मिळवलेले नाटक कसे मागे राहील तात्यासाहेबांचे सदाबहार नाटक नटसम्राट, वीज मिळाली धरतीला,आनंद या आणि अश्या अनेक नाटकातील उतारे  व  नाट्यप्रवेश झाले. असा रंगलेला कार्यक्रम हळूहळू शेवटाकडे आला. ह्या कार्यक्रमाची सांगता श्री विनायक रानडे यांच्या महत्वाच्या प्रवेशाने होणार होती. त्यांनी सादर केलेला प्रवेश फारच मनोरंजक होता. त्यावेळी आम्हा सर्व रसिक वाचकांना समजले कि या वाचक चळवळीची खरी शक्ती कोणती. प्रत्येक सहकाऱ्याची म्हणजे रखवालदार पासून ते व्यवस्थापनातील व्यक्तीची अगदी खुमासदार भाषेत ओळख त्यांनी करून दिली. त्यांची कामाप्रती असलेली निरलस भावना ह्यांनी प्रत्येकाच्या मनात त्यांच्याकरता  एक कोपरा राखला गेला. त्यांच्या करता ठाणे विभागाने काही केले तर त्यात नवल ते कसले. ठाणे विभागाकडून कुसुमाग्रज प्रतिष्ठानला दोन पाणी शुद्धीकरण यंत्रे दिली आणि कार्यक्रमाची सांगता झाली. 
           जेवणानंतर प्रतिष्ठान बघून सर्वांनी तात्यासाहेब जिथे लिखाण करीत वास्तव्य करीत ती वस्तू बघितली. आणि परतीच्या प्रवासाला सुरवात केली. दिवसभराच्या आनंद यात्रेमुळे कोणाचाही उत्साह कमी झाला नव्हता. मात्र येताना स्पर्धा नव्हत्या पण जल्लोष तोच गाणी गोष्टी विनोदी किस्से सांगितले जात होते. गाड्या ठाणे येथे केव्हा आल्या हे समजलेच नाही. उतरताना फक्त आठवणीच आठवणी . 

                                                     अरविंद गजानन पेंडसे     


           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा