सोमवार, ११ मे, २०१५

सौ सुचेता यशवंत रानडे, देवदया नगर , ठाणे - मला पुस्तक पेटीने काय दिले (निबंध स्पर्धा २०१२)

  नऊ वर्षापूर्वी आम्ही ठाण्यास शिवाई नगर भागात वास्तव्यास आलो. जुने मित्रत्वाचे संबंध तुटले नव्याने मैत्री जुळवणे, मन रमवणे सोपे नव्हते . पण मे महिन्याच्या सुट्टीत छोट्यांसाठी दोन वर्षे संस्कार वर्ग चालवले. महिला मंडळी सुरु केले. परंतु आजकाल या साठी सक्रिय सभासदांचा सहभाग मिळणे समाजाच्या अश्या उपक्रमांकडे दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीमुळे अवघड झाले व ते बंद पडले.
    आम्हा उभयतांची वये वाढत होती. शारीरिक स्थितीमुळे ठाण्याबाहेर व कधी कधी घराबाहेर जाणे  हि अशक्य होत असे . आम्हा दोघांना वाचनाची आवड आहे.  पुस्तक हा जवळचा सोबती वाटतो. शरीर दुर्बल असले तरी वाचन शक्य असते . हा मित्र आपल्याशी मोकळेपणाने संवाद साधतो. मनोरंजन बरोबर अनेक अज्ञात विषयांची जवळून माहिती देतो , असामान्य व्यक्तीच्या जवळ नेतो व त्यांचे अलौकिक गुण ज्यांनी अनुभवले आहेत त्यांच्या साक्षीने आपल्यासमोर त्या गुणांना देदीप्यमान करतो. यशस्वी माणसांनी किती झगडून व जिद्दीने हार न मानता ध्येय साध्य केले हे सांगून आपले पूर्वीचे कष्ट व संकटे खरे तर या पुढे नगण्य होती हे लक्षात आणून देतो . शिवाय जर आवडले नाही , वेळ नाही , शरीर दमले तर मुकाट्याने आपले तोंड मिटून घेतो. आणि तसे करण्यासाठी आपल्या हातांना दुसऱ्यांच्या परवानगीची गरज लागत नाही. या मुळे  घरपोच पुस्तक देणाऱ्या वाचनालयाचे सभासदत्व घेतले . परंतु मोजक्या दहा बारा पुस्तकातून निवड करावी लागे . पुस्तक वाचून झाले नाही तर ठराविक दिवशी वाटप करणारा दारात आला तर पुस्तक परत न केले तरी अवघड अन्यथा नाईलाजाने पुस्तक बदलायचे ते हि बंद केले.
      पाच महिन्यापूर्वी योगायोगाने गावंड बाग येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वाचन पेटी उपक्रमासंबंधी कळले .तिथे जाऊन संचालिका सौ लेले यांची गाठ घेऊन तपशीलवार माहिती मिळवली. लगेचच सभासदत्व घेऊन टाकले . ठराविक वेळी व ठरविक दिवशी पुस्तक बदलायचे , पंधरा दिवसांनी ते बदलावेचे लागते या मुळे वाचनात एक शिस्त आली असे अनुभवास आले. दर वेळेस चाळीस एक पुस्तकातून पुस्तक निवडायचे असल्याने निवडीस वाव मिळतो. विविध विषयावरची व विविध लेखन प्रकारातील पुस्तके समोर आल्याने मनपसंत निवड करून कृष्णाबाई सुर्वे यांचे " मी आणि मास्तर " हाती आले त्यांच्या कथेने कष्टानी अडचणींनी काळीज हेलावले. रवींद्र पिंगे यांच्या शतपावलीत कुमार गंधर्वांना भेटलो, महात्मा गांधीचे चरित्रकार श्री. डी. जी तेंडूलकर यांना जवळून जाणले. राम जगताप संपादित कर्ता माणूस मधल्या अप्रसिद्ध परंतु असामान्य व्यक्तींना परीचीतात सामावून घेतले. द. मा. मिरासदारांच्या हसणावळीत हसलो, वि. स. खांडेकरांचे पाढरे ढग कितीतरी वर्षांनी वाचले. काय नि किती जणांचा उल्लेख करू?
        शिवाय "समानशीलेषु  व्यसनेषु सख्यम या नात्याने इतर सभासद व संचालिकांशी मैत्री होत आहे. वाचन पेटी उपक्रमामुळे वाचनाचे आमचे उद्धेश सफल होत आहेतच .शिवाय मैत्रीचे वर्तुळ हि वाढत आहे. या सारखा आनंद कोणता? या उतारवयात एकटेपणा विसरायला लावणारी कोणतीही गोष्ट  आनंदाचीच व स्वागतार्ह असते ना?                    

             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा