मंगळवार, २६ मे, २०१५

उषा भालचंद्र येवले -ब्रम्हांड ठाणे - पुस्तक पेटी ने मला काय दिले (निबंध स्पर्धा २०१२)

     पुस्तके हि ज्ञान आणि माहिती देतात. नव्या पिढीवर संस्कारही करतात. तुम्ही कुठली पुस्तके वाचतात हे बघून तुमच्या ज्ञान आणि विचारांची खोली किती आहे याची कल्पना येते. तसेच पुस्तक वाचन हा मनासाठी उत्तम व्यायाम आहे. पुस्तक वाचनामुळे आपले अनुभव विश्व आपली कल्पनाशक्ती आणि शब्दसंपत्ती वाढते. आणि स्वतंत्र पणे विचार करण्याची क्षमता वाढते. वाचन केल्याने माणसाची दृष्टी आणि बुद्धी बदलत असते. बुद्धीला परिपक्वता येते. खोचक पणाची वृत्ती लोप पावते. वाचनाने प्रज्ञा बुद्धी जागृत होते. मन शांत होते आणि वैचारिक शक्ती वाढते.
       अर्थात या सर्व गोष्टी खऱ्या असल्या तरी प्रत्येक वेळेस हि पुस्तक खरेदी करणे शक्य नाही. मग यासाठी पर्याय म्हणजे वाचनालय मात्र जवळ पास वाचनालय नसल्यास त्याला पर्याय पुस्तक पेटी आणि हीच संकल्पना मनात ठेवून श्री व सौ जोशी यांच्या पुढाकाराने आमच्या ब्रम्हांड परिसरात कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे आणि ठाणे जनता सहकारी बँकेच्या सौजन्याने पुस्तक पेटी या उपक्रमाची सुरवात केली गेली. १०० पुस्तकांची १ पेटी ३ महिन्यांनी बदलली जाते. या १०० पुस्तकांच्या एका पेटीत आत्मचरित्र, कथा कादंबऱ्या , प्रवास वर्णन व विविध वांड:मय प्रकारातील पुस्तकांचा खजिनाच असतो.
         १०० पुस्तकांची एक पेटी हि ब्रम्हांड मधेच स्थाईक झालेल्या सौ वैदेही जोशी यांच्याकडे दिली आहे. या पुस्तक पेटीचे सभासदत्व मायबोली महिला मंडळाच्या सभासदांना देण्यात आलेले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे आठवड्यातून एकदा बुधवारी संध्याकाळी ४-७ या वेळेत पुस्तके दिली घेतली जातात. या मुळे आम्ही सर्व महिला सभासद एकत्र येतो या पुस्तक पेटीत विविध लेखकांची तसेच विविध विषयांची पुस्तके उपलब्ध असल्याने आमच्यात वाचनाची गोडी निर्माण झाली. घराजवळ च असल्याने व वार्षिक अनामत रक्कम फक्त २०० रुपये असल्याने आर्थिक दृष्ट्या देखील परवडण्यासारखे आहे. त्यामुळे आमचा वाचनाचा छंद  चांगल्या प्रकारे जोपासला जात आहे. आणि याचा फायदा कुटुंबातील सर्व सभासदांना होतो. घरात पुस्तक बघून सगळ्यांची वाचायची इच्छा निर्माण होते. व सर्वचजण पुढच्या आठवड्यातील बुधवारची वाट बघतात.
         या पुस्तक पेटी द्वारे माझ्या ज्ञानात भर पडतेच आणि याचा सर्वात जास्त फायदा मला आमच्या मायबोली महिला मंडळाच्या मिटींगमध्ये होतो. या मिटिंग मध्ये दर महिन्याला "मी वाचलेले पुस्तक " यावर थोडक्यात भाष्य करायचे असते व त्या विषयावर चर्चा देखील होते.
अश्या प्रकारे या पुस्तक पेटीने माझी ज्ञानाची लालसा आणि जिज्ञासा वाढवली आहे. आता तर हि पुस्तक पेटी माझ्या रोजच्या सवयीचा भागच झाली आहे. अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम समाज बांधवाना दिलेला संदेश थोड्या फार प्रमाणात माझ्याकडून पाळला जातो. "वाचाल तर वाचाल"                               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा