शनिवार, ३१ जानेवारी, २०१५

ग्रंथ तुमच्या दारी दौरा बडोदा ३१ जानेवारी -१ फेब्रुवारी २०१५

ग्रंथ तुमच्या दारी दौरा बडोदा 


गुजरात येथील ११ वी ग्रंथ पेटी वितरण 

मराठी वांग्मय परिषद ६७ वे अधिवेशन ३१ जानेवारी -१ फेब्रुवारी २०१५
माणिकराव आखाडा बडोदा 

गुरुवार, ८ जानेवारी, २०१५

कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक – ग्रंथ तुमच्या दारी उपक्रम – ठाणे केंद्र-३रा वर्धापन दिन -१६ नोव्हेंबर २०१४ वृत्तांत अरविंद गजानन पेंडसे

साहित्य पंढरीची वारी


       ग्रंथ तुमच्या दारी योजनेतील पुस्तक वाचायला घेतले पण  लक्ष लागेना. कारण हि तसेच होते. १६ नोव्हेंबर २०१४ ला ठाणे शाखेचा वर्धापनदिन कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे नाव हि समर्पक "पालखी निघाली कुसुमाग्रजांची ". रसिक वाचक सकाळी ६ वाजता  थंडीची चाहूल देणाऱ्या गारव्या मध्ये सांगितल्या ठिकाणी पालखीची वाट पहात होते. प्रारंभीच्या मुक्कामाहून ब्राम्हण सोसायटीहून बस निघाल्याचा संदेश आमच्यापर्येंत आला. दुसरा पडाव होता नितीन सिग्नल. लांबूनच  पालखीचे दर्शन होताच सर्वांच्या अंगात उत्साह संचारला. आम्हीही पालखीत सहभागी झालो आणि साहित्य पंढरीच्या वाटेने आमचा प्रवास सुरु झाला. वाटेतच घोडबंदर ठाणे येथून आलेली पालखी आमच्यात येउन  मिसळली . 
                          ज्ञानियांच्या वारीमध्ये गजर हरिनामाचा 
                           साहित्य पंढरीच्या वाटेवर गजर साहित्यनामाचा 
       संयोजक चांगले असले कि वेळी कसा गेला हे समजत नाही. संपूर्ण प्रवासात श्री अरविंद जोशी व सौ रश्मी जोशी व त्यांच्या सहकारयानी  प्रश्न मंजुषेने सर्व साहित्यरसिकांना गुंतुवून ठेवले.  अर्धे अंतर पार केल्यावर थोडी विश्रांती व अल्पोपाहारासाठी सर्वजण हॉटेल ऑलिव गार्डन मध्ये गेलो. तिथली पण व्यवस्था अतिशय सुरेख होती. पुन्हा उरलेला अर्धा  प्रवास प्रश्न मंजुषा सोडवत आपल्या पंढरीच्या दारात अर्थात कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या दारात येउन पोहोचलो. 

        ठाणे येथून आलेल्या रसिक वाचकांच्या स्वागताला आलेल्यांमध्ये ग्रंथ तुमच्या दारीचे प्रवर्तक श्री. विनायक रानडे तसेच   त्यांचा गोतावळा होता. गुलाब अत्तराने सर्वांचे स्वागत झाले.चहा पाणी झाले आता वेळ होती  वाचक पंढरीच्या देवाची पूजा करण्याची त्याच्या चरणी  आपल्यातील अविष्कार अर्पण करण्याची  एक एक पुष्प अर्पण केले जात होते. सुरवात झाली तात्यासाहेबांच्या "गर्जा जयजयकार " ने. कोणतीही क्रांती घडायची झाली कि अनेकांचे सहकार्य लागते ग्रंथ पेटी योजनेची क्रांती अशीच पसरत होती. आता तर परदेशातूनही ही प्रतिसाद येत होता. यावरून आठवण झाली ती "पाठीवर हात ठेवून लढ म्हणा " या कवितेची त्याच्या गुलजारने केलेल्या  हिंदी भाषांतराची अश्या कवितांची सुद्धा कार्यक्रमात लयलूट झाली. कथा झाल्या, मराठी माणसाच्या करमणुकीत  स्थान मिळवलेले नाटक कसे मागे राहील तात्यासाहेबांचे सदाबहार नाटक नटसम्राट, वीज मिळाली धरतीला,आनंद या आणि अश्या अनेक नाटकातील उतारे  व  नाट्यप्रवेश झाले. असा रंगलेला कार्यक्रम हळूहळू शेवटाकडे आला. ह्या कार्यक्रमाची सांगता श्री विनायक रानडे यांच्या महत्वाच्या प्रवेशाने होणार होती. त्यांनी सादर केलेला प्रवेश फारच मनोरंजक होता. त्यावेळी आम्हा सर्व रसिक वाचकांना समजले कि या वाचक चळवळीची खरी शक्ती कोणती. प्रत्येक सहकाऱ्याची म्हणजे रखवालदार पासून ते व्यवस्थापनातील व्यक्तीची अगदी खुमासदार भाषेत ओळख त्यांनी करून दिली. त्यांची कामाप्रती असलेली निरलस भावना ह्यांनी प्रत्येकाच्या मनात त्यांच्याकरता  एक कोपरा राखला गेला. त्यांच्या करता ठाणे विभागाने काही केले तर त्यात नवल ते कसले. ठाणे विभागाकडून कुसुमाग्रज प्रतिष्ठानला दोन पाणी शुद्धीकरण यंत्रे दिली आणि कार्यक्रमाची सांगता झाली. 
           जेवणानंतर प्रतिष्ठान बघून सर्वांनी तात्यासाहेब जिथे लिखाण करीत वास्तव्य करीत ती वस्तू बघितली. आणि परतीच्या प्रवासाला सुरवात केली. दिवसभराच्या आनंद यात्रेमुळे कोणाचाही उत्साह कमी झाला नव्हता. मात्र येताना स्पर्धा नव्हत्या पण जल्लोष तोच गाणी गोष्टी विनोदी किस्से सांगितले जात होते. गाड्या ठाणे येथे केव्हा आल्या हे समजलेच नाही. उतरताना फक्त आठवणीच आठवणी . 

                                                     अरविंद गजानन पेंडसे     


           

कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक – ग्रंथ तुमच्या दारी उपक्रम – ठाणे केंद्र-३रा वर्धापन दिन -१६ नोव्हेंबर २०१४ वृत्तांत श्रीपाद सहस्रबुद्धे

कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक – ग्रंथ तुमच्या दारी उपक्रम – ठाणे केंद्र-३रा वर्धापन दिन -१६ नोव्हेंबर २०१४-
‘पालखी कुसुमाग्रजान्ची’   
     १६ नोव्हेम्बरची पहाट. सारे शहर अजून साखर झोपेत असताना, पन्नाशीची उमर गाठलेले किंवा ओलांडलेले, तरुण, उत्साही शंभर स्त्री-पुरुष दोन बसेसमधून ठाण्याहून नाशिकला जायला निघाले होते. निमित्त होते कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिकच्या ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमांतर्गत ठाणे केंन्द्राचा -३रा वर्धापन दिन साजरा करण्याचे. तीन वर्षापूर्वी पाच पुस्तक-पेटया घेऊन सुरु झालेल्या ठाणे केंन्द्राकडे आज मितीला ६५ पुस्तक पेटया आहेत. ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाला या शहराकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाची दखल घेत कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक ने ठाणे केंन्द्राला आपला ३रा वर्धापन दिन नाशिकला येऊन साजरा करण्याचे आमंत्रण दिले आणि ठाणेकरांनी ते आनंदाने स्वीकारले. विशेष म्हणजे ठाणेकर ग्रंथप्रेमी मंडळीना आपल्या गावाला, नाशिकला घेऊन जाण्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिकच्या, ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाचे मुख्य समन्वयक, दस्तुरखुद्द श्री विनायक रानडे मोठ्या उत्साहाने आधल्या दिवशीच ठाणे मुक्कामी डेरेदाखल झाले होते. आज १६ नोव्हेम्बरला श्रीस्थानाहून (ठाणे) जनस्थानास (नाशिक) जाण्यासाठी ठाणेकरांनी पंच पंच उष:काली प्रस्थान ठेवले होते. बस मध्ये आमच्या सोबत अर्थात श्री विनायक रानडेही होते.
          कविवर्यांच्या गावाला निघालेल्या या आनंद यात्रेला नाव दिले होते-  निघाली पालखी कुसुमाग्रजान्ची ”. या पालखीच्या भोयांचे नेतुत्व होते श्री अरविंद जोशी आणि सौ रश्मी जोशी यांचेकडे. निरनिराळ्या पुस्तक पेटयांशी संबद्धित १०० ग्रंथप्रेमी या दिंडीत सहभागी झाले होते. हे सारेजण नाशिकला कुसुमाग्रज स्मारक संकुलात तात्यासाहेबांच्या (कुसुमाग्रजांच्या) साहित्यकृतींवर आधारित एक रंजक कार्यक्रम सादर करणार होते. आकाशवाणीवरील प्रदीर्घ सेवेचा अनुभव गाठीशी असलेल्या सौ सुषमाताई हिप्पळगावकर या कार्यक्रमाच्या सूत्रधार होत्या.
          दोन बसेसपैकी एका बसचे मुखिया होते श्री अरविंद जोशी तर दुसर्या बसचे नायकत्व सौ रश्मी जोशी यांचेकडे होते. जोशी पतीपत्नींनी या आनंदयात्रेची तयारी खूप मेहनत घेऊन केली होती. दोघांच्या हातात प्रश्न मंजुषेचे कागद तयारच होते. आमच्या  बसमध्ये अरविंद जोशींनी प्रश्न मंजुषेच्या खेळाचे नियम सर्वांना समजावून सांगितले. चार प्रकारचे खेळ होते. त्यासाठी  वेगळ्या प्रश्न मंजुषा होत्या.  
 १) आत्मचरित्राचे नाव दिले असेल – आत्मचरित्र कोणाचे ते ओळखायचे.
 २) अभंगाचे नाव दिले जाईल – अभंगाचा रचयिता / कवी ओळखायचा.
 ३) प्रसिद्ध साहित्यिक आपल्या विषयी, आपल्या साहित्याविषयी, मिळालेल्या
    पुरस्कारांविषयी माहिती देऊन विचारतो- मी कोण ? – नाव ओळखायचे.
 ४) म्हण तोडून तिचे दोन भाग चिठीवर लिहून वाटले जातील. आपल्या वाट्याला
    आलेल्या अर्ध्या भागाचा पुकारा करून उरलेला अर्धा भाग ज्याचेकडे आहे
    त्याला शोधायचे व म्हण पूर्ण करायची. सर्वाधिक म्हणी पूर्ण करणार्याला
    सर्वाधिक गुण
       प्रत्येक प्रश्नाला क्लू दिले जातील. पहिल्याच क्लू वरून बरोब्बर उत्तर देणार्यास दोन गुण. नंतरच्या क्लू वरून उत्तर देणार्यास एक गुण. दोन्ही बस मध्ये खेळ सुरु झाला. सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. खेळ रंगू लागला. वाटेत पडघ्याजवळ  हॉटेल ऑलिव्ह गार्डनमध्ये नाश्ता झाला. गरम गरम उपमा, त्यावर शेव - कोथिंबीरीची पेरणी आणि वर मस्त वाफाळणारा चहा. असा फक्कड  नाश्ता  मिळाल्यावर सर्वांची तबीयत खूष झाली नसती तरच नवल. ८ ते ८.४५ असा पाऊण तासाचा ब्रेक घेऊन मंडळी परत बसमध्ये स्थानापन्न होतायत तोच आमच्या बसचे पुढचे चाक पंक्चर झाल्याचे लक्षात आले. स्टेपनी, jackजक, पान्हे इ. तयारच होते. १५-२० मिनिटात चाक बदलून झाले आणि बसेस नाशिकच्या दिशेने धाऊ लागल्या. प्रश्न मंजुषेचा खेळ पुन्हा रंगात आला. एरव्ही हमखास कंटाळवाणा होऊ शकला असता असा तीन साडे तीन तासाचा बसचा प्रवास अधिकाधिक रंजक होत गेला. नाशिक कधी आले ते कळलेच नाही.
     सकाळचे १०.४५ वाजत होते आणि गोदाकाठच्या रम्य परिसरात दिमाखात उभ्या असलेल्या कुसुमाग्रज स्मारकाच्या त्या आगळ्या वेगळ्या वास्तू समोर आमच्या दोन्ही बसेस उभ्या होत्या. ठाणेकरांचे स्वागत करायला प्रतिष्ठानची प्रतिष्ठित मंडळी/पदाधिकारी हसतमुखाने उभे होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी ठाणे केंद्र-३रा वर्धापन दिन -१६ नोव्हेंबर २०१४. असा फलक दिमाखात झळकत होता. समोर रांगोळ्या रेखल्या होत्या. स्मारक संकुलातील मिनी-थिएटर  समोरील जागेत चहापानाची सोय ठेवली होती. फ्रेश होऊन, चहा घेऊन सर्वजण थिएटरमध्ये जाऊन स्थानापन्न झाले. आत जाताना प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी प्रेमाने अत्तर लाऊन हातात गुलाबाचे फुल दिले. 
        कार्यक्रम तालिकेत ज्यांचा पथनाटयाचा  कार्यक्रम लगेच होणार होता ते लोक ग्रीनरुममध्ये गेले. ११.३० झाले होते. सुषमाताईनी माईक हातात घेतला अधिक वेळ न घालविता थेट कार्यक्रमाला सुरवात झाली. पुढे १ तास ४५ मि चा हा भरगच्च कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला ज्यात कथा वाचन, कविता वाचन, पथनाट्य( पुतळे आभार मानतात), नाटकातील प्रवेश( वीज म्हणाली धरतीला) नाट्यप्रवेश ( एक होती वाघीण ), नाटकातील स्वगत (नटसम्राट), नाटकाचे अभिवाचन(आनंद) इ. चा  समावेश होता. वेगवेगळ्या वाचक मंडळानी सादर केलेले हे सर्वच प्रकार चांगले झाले. परंतु त्यातही दासी ‘जुलेखा’ आणि झांशीची राणी लक्ष्मीबाई ह्यांचा हृदयस्पर्शी संवाद असलेल्या, ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकातील प्रवेशाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्याचप्रमाणे ‘आनंद’ नाटकाच्या अभिवाचनात आनंदच्या तोंडी असलेली कुसुमाग्रजान्ची कविता ‘पुरे झाले चंद्र-सूर्य पुरे झाल्या तारा’... प्रेक्षकाची वाहवा मिळवून गेली.  या कार्यक्रमानंतर प्रवासात बसमध्ये घेतलेल्या प्रश्न मंजुषा स्पर्धेत प्रत्येक बसमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्यांची नावे जाहीर करण्यात आली. बस क्र. १ मध्ये    लुइसवाडी ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या श्री श्रीपाद सहस्रबुद्धे यांना तर बस क्र २ मध्ये मायबोली मंडळाच्या प्रा. अशोक धोपेश्वरकर यांना बक्षीस मिळाले. प्रतिष्ठानचे पदाधिकारी श्री लोकेश शेवडे व श्री विनायक रानडे यांचे हस्ते पुस्तके (ग्रंथाली मार्फत दिलेली)बक्षीस म्हणून देण्यात आली. ठाणे केंद्रातर्फे वर्धापनदिना निमित्त घेतलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
१) ‘डायरीतील एक पान’ -              शरयू पाटील ( मायबोली मंडळ) – प्रथम
२)‘आज कुसुमाग्रज हयात असते तर’- प्रा.अशोक धोपेश्वरकर(मायबोली)- प्रथम                 
                                    संगीता कुलकर्णी (मायबोली )   -द्वितीय
सर्व विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.  त्यानंतर ग्रंथ तुमच्या  दारी’ उपक्रमाचे मुख्य समन्वयक श्री विनायक रानडे यांनी या योजनेची माहिती सांगितली. आज एकूण ५०० हुन अधिक पुस्तक पेटया केवळ भारतातच वेगवेगळ्या शहरात जातात असे  नाही तर दुबई, सिंगापूर इ. ठिकाणीही रवाना होतात. जगात जिथे जिथे मराठी माणूस पोचला आहे त्या त्या ठिकाणी आपली पुस्तक पेटी पोचली पाहिजे. असा आमचा संकल्प असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. एव्हड्या मोठ्या संखेने पुस्तक पेटया काळजीपूर्वक भरून वेळेवर त्या सर्वदूर रवाना करणे हे प्रचंड जिकीरीचे काम अनेकांच्या सहकार्याशिवाय होणे केवळ अशक्यच आहे. या मागे अनेकांची जिद्द, वेळेची मर्यादा पाळून केलेले प्रामाणिक प्रयत्न कारणीभूत आहेत. त्यांनी नातू, जगताप इ. आपल्या सगळ्या टीमचा परिचय उपस्थितांना करुन दिला. श्री रानडे व त्यांच्या सगळ्या टीमचा ठाणे केंद्रातर्फे गौरव करण्यात आला. या प्रसंगी ठाणे केन्द्राकडून  कुसुमाग्रज प्रतिष्ठानला दोन वोटर प्युरीफायर’ मशीन्स भेट देण्यात आली. वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम  असा सुनियोजित, आणि रंगतदार होण्यामागे श्री अरविंद जोशी व सौ रश्मी जोशी यांनी केलेले अथक प्रयत्न आहेत. या दोघांनी खूप मेहनत घेऊन प्रश्न मंजुषेच्या खेळाचे आयोजन दोन्ही बसेसमध्ये केले. सुषमाताई हिप्पळगावकर यांनी मनोरंजनाचा कार्यक्रम सुसूत्र पद्धतीने बसविला. जोशी पतीपत्नी आणि सौ सुषमाताई यांचा यथोचीत गौरव यावेळी करण्यात आला. अशा रीतीने या सुंदर रंगत गेलेल्या सोहळ्याची सांगता झाली. 
       बाहेरच्या आवारात प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांबरोबर सर्वांचा ग्रुप फोटो काढून झाला. दुपारचे दोन वाजले होते. पोटातून ‘काऊ कोकताहे’ चा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मिनी-थिएटर च्या बाहेरच भोजनाचा पुख्ता बंदोबस्त नाशिककरांनी ठेवला होता. उत्तम स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद सर्वांनी यथेच्च घेतला. त्यानंतर कुसुमाग्रज स्मारकाचा परिसर पहात भटकंती झाली. इथे अभ्यासिका, ग्रंथालय, कुसुमाग्रज जीवनदर्शन घडविणारी चित्रफित,  कुसुमाग्रजांच्या पुस्तकांचे प्रदर्शन इ. पाहता आले. सर्व दालनांना कुसुमाग्रजांच्या पुस्तकांची नावे दिलेली आहेत. विशाखा, मुक्तायन, छंदोमयी, पाथेय इ. खरे तर तेथून कोणाचाच पाय निघत नव्हता. पण आता ‘आम्ही जातो अमुच्या गावा’ म्हणायची वेळ झाली होती. बसेस प्रवेशद्वारापाशी येऊन उभ्या होत्या. सर्वजण बस मध्ये बसले. नाशिकमधून बाहेर निघताना कुसुमाग्रजांचे निवास स्थान पाहिले. १९८९ मध्ये ‘ज्ञानपीठ’ मिळाल्यावर भारत सरकारकडून सन्मानपूर्वक हा बंगला तात्यासाहेबांना देण्यात आला. अखेरच्या दिवसात तात्यासाहेबांचे वास्तव्य इथेच होते. इथे आता प्रतिष्ठानचे ग्रंथालय आहे. दर्शनी भागात तात्यासाहेबांच्या वापरातील वस्तू काचेच्या खोलीत जतन करून ठेवल्या आहेत. तिथेच ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार मांडून ठेवले आहेत.  तेजाचे गौरव गीत गाणार्या कुसुमाग्रजांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून, या भेटीच्या सुंदर स्मृती मनात जपून ठेवत, आमच्याबरोबर वेशीपर्यंत आलेल्या विनायक रानड्यांना आम्ही प्रेमाने निरोप दिला. ठाण्याला पोचेपर्यंत रात्रीचे ९ वाजून गेले होते. ठाणे केंद्राच्या तिसर्या वर्धापन दिनाच्या हृद्य आठवणी सर्वांच्याच मनात कायम राहतील यात शंका नाही.
        लुईस वाडी ज्येष्ठ नागरिक संस्थेने  कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत ठाणे केंद्राकडून पुस्तक पेटी घेतली आहे. लुईसवाडीतील वाचकप्रेमी  नियमितपणे या ग्रंथालय सुविधेचा लाभ घेत आहेत. ठाणे केंद्राच्या पहिल्या आणि दुसर्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संस्थेला सहभागी होता आले नाही. या वर्षी  तिसर्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संस्थेने सहभागी होताना तात्यासाहेबांच्या ‘आनंद’ नाटकातील एका प्रवेशाचे अभिवाचन (हावभावासह) करण्याचे ठरविले. संस्थेचे जुने कार्यकर्ते श्री अरविंद पेंडसे यांनी या बाबतीत पुढाकार घेतला. त्यांनीच नाट्यप्रवेश अतिशय थोड्या कालावधीत बसवून घेतला. यात काम केलेल्या सभासदांची नावे आणि त्यांनी केलेली भूमिका - सौ. चारू देशमुख ( राजलक्ष्मी कान्हेरे), श्री प्रवीण देशमुख (डॉ.उमेश बनर्जी) आणि श्री श्रीपाद सहस्रबुद्धे (आनंद) श्री अरविंद पेंडसे यांनी दिग्दर्शनाची बाजू सांभाळली. वरील सभासदाबरोबरच  श्री कासार आणि श्री सुवर्ण काळे हे देखील या कार्याक्रमासाठी मुद्दाम नाशिकला आले होते. आपल्या संस्थेने सादर केलेला  हा नाट्य अभिवाचनाचा कार्यक्रम खूप छान झाला. उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद देऊन त्याचे कौतुक केले.
                                                  

                                                    श्रीपाद सहस्रबुद्धे 

मंगळवार, ६ जानेवारी, २०१५

माझे ग्रंथालय नाशिक १० जानेवारी २०१५ शुभारंभ

" माझ ग्रंथालय " नाशिक शुभारंभ  
दुपारी  ५ वाजता शनिवार १० जानेवारी  २०१५ रोजी 
कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड , नाशिक येथे होणार आहे . 

माझ ग्रंथालय योजनेत नाशिक येथील सहभागी वाचकांना ३२ पेट्यांचे वितरण होणार आहे . 
वाचन प्रेमींनी योजनेत सहभागी होण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे . 

माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : 
९ ३ ७ ३ ९ ० ० ९ ६ २  मृणालिनी गोरे , 
समन्वयक , माझ ग्रंथालय , नाशिक विभाग .