सोमवार, ८ जून, २०१५

मेघना दर्शन शहा - पुस्तक पेटीने मला काय दिले (निबंध स्पर्धा २०१२)

     पुस्तक पेटी ने मला काय दिले या प्रश्नाचे उत्तर दोन शब्दात देता येईल. ते म्हणजे निखळ आनंद सर्व प्रथम या साखळीत असणाऱ्या सर्वांचे आभार. सर्वांचे उल्लेख करणे जर कठीण वाटत असल्यामुळे एकत्रित आभार.सर्वांचा उल्लेख करणे कठीण वाटत असल्यामुळे एकत्रित आभार.
     घोडबंदर रोड येथील आमच्या वसंत लीला संकुलातील हा उपक्रम सौ अमृता कुलकर्णी चालवितात. जेव्हा मला या उपक्रमाची माहिती कळली तेव्हा क्षणभर खरेच वाटले नाही. कारण कुठलीही गोष्ट फुकटात किवा सवलतीत मिळते म्हणजे त्यात नक्कीच गडबड असते हा जो माझा समज होता तो या उपक्रमाने खोटा  ठरवला. म्हंटले तर लायब्ररी पण फी नाही. फक्त डिपोझिट  हि कल्पनाच आगळीवेगळी आहे. सुरवातीला शंका आली कि हि पुस्तके कशी असतील कोणत्या लेखकांची असतील वगैरे. परंतु या सर्व शंका सौ कुलकर्णी यांच्या घरी टेबलावर व्यवस्थित मांडून ठेवलेली पुस्तके पाहून दूर झाल्या. नवीन पुस्तके, व्यवस्थित प्लास्टिक चे कव्हर घातलेली , बुकमार्क असलेली हे पाहून तर मला जो काही आनंद झाला कि विचारता सोय नाही. कारण मुळात मी अगदी पुस्तक वेडी किंवा वाचन वेडी म्हणा हवं तर वाचनाची भूक अगदी वर्तमानपत्र पासून  ते मासिके , अंक या द्वारे भागवत असते. घरी देखील बऱ्याचश्या पुस्तकांचा संग्रह केला आहे.
     तर गुरुवारी सौ कुलकर्णी यांच्या घरात संध्याकाळी साधारण पणे असे वातावरण असते. पुस्तक प्रेमी स्त्रिया एकत्र येउन उत्सुकतेने पुस्तक बघत असतात. आपल्या पसंतीचे पुस्तक निवडत असतात. अगदी भाजी मंडईतील भाजी निवडतात ना त्याच उत्साहाने त्यांचे हे काम सुरु असते. आवडीचे पुस्तक निवडल्या नंतरच त्यांचे चेहऱ्यावरचे समाधान देखील बघण्यासारखे असते. आपापसात चाललेली चर्चा देखील फक्त पुस्तकांसंबंधी , लेखकासंबंधी असते हे विशेष. काहिंना तर पेटी बदलण्याआधी सर्व पुस्तके वाचून होतील कि नाही याची शंका भेडसावत असते. मला तर हे सर्व अनुभवताना  देखील खूप मजा वाटते.
      पेटी हा शब्द आता तसा फारसा वापरात न येणारा पण नवीन पुस्तक पेटी येणार असे म्हणल्यावर या पेटीमध्ये दडले काय अशी माझी भावना असते. आता पर्येंत च्या सर्वच पेटीतील पुस्तके खूप छान होती. अश्याच चं पुस्तकांची माझी किवा माझ्या मैत्रिणींची अपेक्षा पुढील पेटीतून पूर्ण होईल अशी आशा करते
      पुन्हा एकदा सौ अमृता कुलकर्णी यांचे तसेच या प्रक्रियेतील सर्वांचे आभार
                  धन्यवाद             

मंगळवार, २ जून, २०१५

म वि कुंटे - पुस्तक पेटी ने मला काय दिले - विकास कॉम्प्लेक्स ठाणे (निबंधस्पर्धा २०१२)

      माणसाच्या अंगी चांगले गुण , कला आणि अभ्यासू वृत्ती या अभिजात असाव्या लागतात. एकदा का त्या अभिजात गुणांना वाव आणि प्रोत्साहन मिळाले कि त्यात प्राविण्य  मिळवणे  सहज शक्य होते. जीवनात असे हि होते कि आपल्यात दैवी गुण नसतात तरी हि दुसऱ्याचे पाहून करायची इच्छा होते. तसा प्रयत्नही हि होतो. पण अपेक्षित असे काहीच हाती लागत नाही. मग दुसरा प्रयत्न होतो., तिसरा होतो आणि अशी धरसोड आणि धडपड चालूच राहते असे करताना काही तरी प्राप्त झाले यात समाधान मानून पुढे चालत राहावे. व आनंदात राहावे व आनंदात असावे हि वृत्ती वृद्धिंगत होऊन माणूस प्रयत्नवादी होतो. मिळवण्याची जिद्द अंगी रुजू लागते.
       माझे हि काहीसे असेच असावे. थोडे फार नोकरी मिळण्य इतपत शिक्षण घेतले. पण साहित्य सहवासाची वृत्तीच नव्हती. त्यामुळे लेखन, वाचन , भाषण वगैरे गोष्टी अगदी क्षुद्र होत्या. ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचावी किंवा कोणी दिलेले पुस्तक वाचावे असे कधीच वाटलेच नाही. विकत घेऊन पुस्तक वाचायचा प्रश्नच नव्हता. घरी येणारा पापर लोकांना दाखवण्यापुरता वाचत असल्याचा नुसता देखावा करायचा. चालून फेकून द्यायचा एवढाच वर्तमानपत्राशी संबंध यायचा. संपूर्ण सेवा निवृत्ती पर्येन्तच्या काळात पुस्तकांचा संबंधच आला नाही. पुस्तकांचा संबंध शाळे पुरताच आणि नंतर नोकरीत नियम अगर कायद्याचा संदर्भ पाहण्यापूरताच असायचा. नाही म्हणायला शास्त्रीय संगीताची काही पुस्तके मी वाचून पहिली. संगीताची आवड असल्याने काही शिकता येईल का? या भावनेने ती वाचली गेली होती. अभ्यास किवा ज्ञानवृद्धी करावी किवा गुरुकुलात जाऊन शिकण्याची जिद्द कधी उपजलीच नाही.
      धार्मिक वातावरणात मी लहानाचा मोठा झालो. आमचे घर म्हणजे घर कम देऊळ होते. त्या अनुषंगाने शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम वर्षभर चालू असायचे काही कीर्तनकार, प्रवचनकार, संगीतकार उत्तम दर्जाचे असायचे. त्यांची कीर्तने, प्रवचने व संगीत मी शेवट पर्येंत मी ऐकत असे . अधून मधून एखाद्या विषयावर वाद विवाद प्रतियोगिता व्हायच्या. त्या मला फार आवडायच्या. या वरून चांगले ते ऐकणे. आणि त्या विषयाचे थोडे फार चिंतन मनन करणे हा अभिजात गुण असावा असे वाटते.
       सेवा निवृत्ती नंतर काय करावे हा एक मोठा यक्ष प्रश्न प्रत्येक समोर असतो. आमच्या गृह संकुलाचे प्रशस्त आवार आहे. त्यामुळे वृद्धांना सकाळ संध्याकाळ चालण्याचा व्यायाम व्यवस्थित करता येतो. नंतर श्रम परीहारास्त्व क्लब हाउस मध्ये पंधरा ते वीस वृद्ध तास दीड तास गप्पा मारत बसतात. डॉक्टर ,व्यापारी ,इंजिनियर अश्या सर्व स्तरातील उच्च विद्या विभूषित विद्वान मंडळी एका ठिकाणी जमल्यावर सगळ्याच विषयावरचे बौद्धिक विचार मंथन चालू असते. यात तुम्ही कधी तरी तुम्ही हे पुस्तक वाचले का असे हि साहित्यिक विचार मांडले जातात. अश्या चर्चांमध्ये भाग घेण्यास स्वत:त कोणत्याही विषयावर बोलण्याची क्षमता व पांडित्य असावे लागते. त्यामुळे कमी बोलणारे कमी व माझ्या सारखे श्रोते जास्त असतात. न बोलून वाया  काहीच जात नाही. उलट ज्ञानात भर पडते. व न पटणाऱ्या गोष्टींवर आपण मनातल्या मनात विचार करीत असतो. वैयक्तिक मतभेदांवर वाद घालून वितंड वाद घालण्यापेक्षा मौन हे उत्तमच.
       एक दिवस कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे "ग्रंथ तुमच्या दारी" या योजने अंतर्गत वाचनालय आमच्या संकुलात सुरु झाले. अर्थात आम्ही सर्व त्याचे सभासद हि झालो. आपल्या दारी आणि तो हि अगदी फुकट आलेली संधी कोणी सोडतो! माझ्या मनाने ठरवले हि पुस्तके वाचून बघावी. त्या प्रमाणे गीतेत म्हंटल्या प्रमाणे "कर्मण्ये व धिकारस्ते…. " आपल्या मेंदूत किती प्रकाश पडतो याची अपेक्षा न करता मिळेल ते पुस्तक घ्यायचे आणि वाचायचे असा संकल्प करून माझा साहित्य वाचनाचा प्रवास सुरु झाला. दर बुधवारी पुस्तक आणायचे आणि पुढच्या बुधवारी परत करून दुसरे आणायचे असा वाचन क्रम अस्तित्वात आला.
      अल्प अवधीत च बरीच पुस्तके वाचली. चरित्र ग्रंथ , कादंबरी, व्यंगात्मक कथा, प्रवास वर्णने इत्यादी अनेक विषयावर सरसकट वाचीत राहिलो. हे सगळे वाचताना बऱ्याच गोष्टी मला हळू हळू समजू लागल्या. न समजणाऱ्या गोष्टींचा, तत्वांचा गूढ अर्थ लक्षात येऊ लागला. भारदस्त शब्दांचे अर्थ , भावार्थ कळू लागले. मनातल्या विचारांना दिशा मिळू लागली. प्रत्येक लेखकाचे विचार मांडण्याचे स्वतंत्र तंत्र असून आपले विचार योग्य आहेत. हे पटवून देण्याचे कसब त्यांना साध्य झालेले आहे असे समजते. याचे बरोबर कि त्याचे बरोबर याचा विचार करण्यास वाचक प्रवृत्त होतो. त्याचा परिणाम म्हणजे माझ्या सारखा हि विचार मंथनात रस घेऊ लागतो. वाचताना टिपणे घेऊन ठेवू लागतो. कदाचित भविष्यात उपयोगी पडतील या विचारांनी.
         काही पुस्तकांचा ठसा मनावर कायम उमटतो. साने गुरुजी सात्विक वातावरणात नेतात, पु ल देशपांडे , व पु काळे हास्याची कारंजी उडवतात. प्रवीण दवणे , वि स खांडेकर , मिरासदार वगैरे व्यक्तिरेखांचे अचूक वर्णन दर्शवतात. ऐतिहासिक पुस्तके वाचताना त्या काळात वावरू लागतो. आणि त्या प्रसंगाचे आपण साक्षीदार आहोत असे वाटून आपले रक्त सळसळू लागते. रवींद्र भटांचे "भेदिले सुर्य मंडळा" वाचून  प्रभू रामचंद्रांचे प्रत्यक्ष दर्शनाचा आनंद प्राप्त झाला. अध्यात्मा बरोबर शारीरिक बळ असणे समर्थांना जरुरी वाटले. म्हणून मारुतीच्या उपासनेचा समर्थ रामदासांनी प्रचार केला. कालानुरूप जन जागृतीची मशाल पेटवण्याचे महान कार्य त्यांनी केले. प्रत्येक विषयाचे ज्ञान प्राप्त करण्याची समर्थांची जिद्द पाहून मन थक्क होते.
          मनोरंजनात्मक दृष्टीने पुस्तकांचे वाचन करताना त्यात तत्वज्ञान भरलेले आहे ते कळले. लिहणाऱ्या मंडळींची विद्वत्ता पाहून ती सर्व तपस्वी ऋषी आहेत अशी श्रद्धा निर्माण होते. वीक एन्ड ला निसर्गाच्या सानिध्यात मौज मजा करण्यास आपण जातो. खूप आनंद येतो. मन उल्हसित होते.  आहा किती छान अशी भावना निर्माण होते. पण एक लेखक निसर्गाच्या बारकाव्यांचे अफलातून वर्णन असे लिहितो कि प्रत्यक्ष न जाता हि आपण तिथल्या गारव्याचा अनुभव घेतो. म्हणून च वाचनाची चटक लागते. अभ्यासू वृत्ती येते. निदान माझ्या वृत्तीत तरी नक्कीच फरक पडलेला आहे. ग्रंथ आणि साहित्याचा मोठा खजिना उपलब्ध आहे. वाचून ज्ञानात भर घालावी. निदान थोर संतानी आणि साहित्यकारांनी अथक प्रयत्नांनी प्राप्त केलेल्या आणि सांगितलेल्या गूढ तत्वज्ञानाचे सर समजले तरी जीवन पावन होईल असे मला वाटते.
         मनातले विचार लिखाणातून कसे व्यक्त करावे. मुद्देसूद मांडणी कशी करावी .लहन सुबक वाक्ये कशी लिहावी.  क्रम व ओघ व्यवस्थित ठेवण्याचे भान असावे. शक्यतो साधे आणि योग्य शब्दांची गुंफण असावी. अश्या मुलभूत गोष्टींचा अभ्यास करण्याची इच्छा  होऊ लागते. माझे वाचन वाढत गेले तसे आपले विचार लिहून व्यक्त करता येतील असे मला हि वाटू लागले.
        परवाच आमच्या केंद्र प्रमुखांनी निबंध स्पर्धा आयोजित केल्याचे कळवले . निबंध म्हणजे काय व तो कसा लिहायचा हे मला उमगलेले नाही. आपले विचार निबंध समजून प्रस्तुत करण्याची मला प्रेरणा झाली. आयुष्यात पहिल्यांदा निबंध स्पर्धेत भाग घेत आहे. त्याचे श्रेय मी पेटीतल्या पुस्तकांना देतो. कसला हि विचार न करता सुचेल तसे लिहित गेलो. व हा निबंध तयार झाला. पुस्तक पेटीने मला काय दिले ते मन मोकळेपणाने जमेल तसे प्रस्तुत केले आहे. चूक कि बरोबर हे काळच ठरवील.