बुधवार, ९ डिसेंबर, २०१५

ग्रंथ पेटीचा आनंद -श्री रवींद्र अवसरे आणि सौ रश्मी अवसरे (आलय सोसायटी गोरेगाव पूर्व)

ग्रंथ तुमच्या दारी हि योजना आमच्या आलय सोसायटीत सुरु होऊन दोन वर्ष पूर्ण झाली. दर चार महिन्यांनी येणारी १०० पुस्तकांची प्रत्येक पेटी म्हणजे विविध प्रकारच्या साहित्याची जणु तिजोरीच असते. यात विज्ञान, आरोग्य , विविध प्रकारच्या सामाजिक व ऐतिहासिक आणि इतर विषयावरील कादंबऱ्या , चरित्रात्मक कादंबऱ्या , कथासंग्रह इत्यादी अनेक प्रकारची पुस्तके असतात . हि पुस्तके अगदी विद्यार्थ्यांपासून वृद्ध व्यक्तींपर्येंत सर्वांना आवडतील व करमणुकी बरोबरच ज्ञानात हि भर घालतील अश्या प्रकारची असतात .
रणजीत देसाई यांची श्रीमान योगी किवा डॉ रवि बापट यांची के ई एम वॉर्ड नं ५ अश्या प्रकारची पुस्तके हातात घेतली कि खाली ठेववत नाही आणि हे सर्व कोणतेही मासिक शुल्क न आकारता फक्त ३०० रुपयाची अनामत रक्कम ठेवून आणि हे कशासाठी तर लोकांमध्ये मराठी साहित्याची आवड निर्माण व्हावी म्हणून. मराठी साहित्याच्या विकासासाठी यापेक्षा अधिक उत्तम पाऊल कोणते असू शकते ? आलय सोसायटीत हि योजना सुरु करणारे श्री मेहेंदळे काका , श्री महेश अभ्यंकर व सध्या हि योजना चालू राहावी म्हणून आठवड्यातून २ दिवस देणाऱ्या श्रीमती ढवळे यांना मन:पूर्वक धन्यवाद.तसेच हि योजना जोमाने विस्तारत जावो हि शुभेछा.
        

श्री कृ प नेर्लेकर -मनोगत

ज्ञानदेव सांगतात 'वक्ता वक्ता नोहे श्रोतेवीण' त्याचप्रमाणे "ग्रंथ हा ग्रंथ नोहे वाचाकावीण". ग्रंथाना त्यांचे नातेवाईक म्हणजे वाचक आपोआपच मिळतात . हा नातेसंबंध वाचक व ग्रंथावर जोपासला जातो. वाचक सामन्यात:उदार मायाळू व कधी कधी ग्रंथ कर्त्यापेक्षा बुद्धिमान असू शकतो. कधी वाचक खट्याळ पण असू शकतो. वाचकाला वाचन संस्कृती अकृत्रिमपणे जगायला हवी असते. ग्रंथ तुमच्या दारी हा कुसुमाग्रज प्रतिष्टान चा उपक्रम निश्चित च चोखंदळ वाचक वर्ग व वाचन संस्कृती जोपासत आहे.         

ग्रंथ तुमच्या दारी चळवळीस शुभेछा ! - संदीप देवरे - रहेजा विहार पवई

प्रथमत: दि ८ फेब्रुवारी २०१५ रोजी आयोजित सुवर्ण ग्रथ पेटी सोहळ्यास हार्दिक शुभेछा. मी गेली दोन वर्षे ग्रंथ तुमच्या दारी या योजनेचा सभासद असून अनेक उत्तमोत्तम पुस्तके केवळ या योजनेमुळेच वाचायला मिळाली . वाचनाची मला लहानपणापासून अतिशय आवड आहे. मात्र मुंबई च्या दैनंदिन धकाधकीच्या चक्रव्युहात वाचानासाठी सवड काढणे व योग्य ग्रंथालयात जाने हे केवळ दुरापास्त.
    मात्र ग्रंथ तुमच्या दारी या कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक या संस्थेच्या श्री विनायक रानडे ह्यांच्या कल्पकतेतून सध्याच्या ग्रंथ पेटी योजनेमुळेच आम्हा सर्व वाचकांना साहित्याबद्दल प्रेम असलेल्या सर्वाना अतिशय फायदा झाला. श्री विनायक रानडे ह्यांना माझ्याकडून लाख लाख धन्यवाद व भविष्यकालीन उपक्रमांना हार्दिक शुभेछा.
    ग्रथ तुमच्या दरी हि चळवळ जोमाने चालवणे म्हणजे जगन्नाथाचा रथ चालवण्याएव्हडेच  अवघड पण पवित्र धर्म कार्य आहे. ह्यात शंकाच नाही. मात्र यासाठी अनेक अनुयायी लागतात. तेव्हा माझ्याकडून ह्यासाठी काही कार्य घडले असलेल्यास मला त्याचा आनंद वाटेल.          

विद्यार्थिनीचे मनोगत -गौरी विजय थोरात (ज्ञानवर्धिनी विद्यालय )

ग्रंथ तुमच्या दारी हे आमच्या शाळेत सुरु केले याबद्दल मी खूप धन्यवाद मानते. ग्रंथाच्या पेटीतील पुस्तके मला खूप आवडली. मी कृष्णायन , ते चौदा तास, यक्ष प्रश्न , युरोपच्या भूमीवरून फिरताना , हि पुस्तके वाचली. "आई समजून घेताना"    हे उत्तम कांबळे यांचे पुस्तक विशेष आवडले. आमच्या शाळेतील शिक्षकही पुस्तके वाचताना रानमित्र हे पुस्तक चं आहे असे सांगतात.

तुम्ही आम्हाला आमच्या शाळेत पुस्तक वाचण्यासाठी ग्रंथ पेटी दिली त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.   

उघडले दार ज्ञानाचे -श्रीमती निर्मल ल बांदेकर (देव देवेश्वर सोसाईटी अंधेरी पूर्व )

लहान पणापासून मला वाचनाची आवड , छंदच म्हणा ना! कादंबरी ,प्रवासवर्णन , शास्त्रीय लेख जे मिळेल ते वाचावयाचे , पण मोठी झाल्यावर नोकरी संसार मुले या जबाबदारीची तारेवरची कसरत करताना या वाचनाच्या आवडीवर केव्हा पडदा पडला हे कळलेच नाही. आता निवृत्ती नंतर फुरसतीचे क्षण मिळाले आहेत व माझी वाचनाची आवड मला जोपासता येऊ लागली आहे. माझेच काय आताच्या तरुण पिढीचे हे च दुख: आहे. फुरसतीच्या वेळी हातात पुस्तक असेल तर आपण वाचतो . आजकाल कोणालाच वेळच्या वेळी बाहेर जाऊन पुस्तक बदलून आणणे जमत नाही.
    हल्ली टी व्ही वगैरे अनेक करमणुकीची साधने उपलब्ध आहेत . पण त्यामुळे वरवर करमणूक होते . पण वाचन करताना एकाग्र चित्ताने व शांततेने वाचत असल्याने आपण वेगळ्या वातावरणात जाऊन आपल्या मनाला विरंगुळा मिळतो. पुस्तकातील मजकूर मनाच्या गाभाऱ्यातून मेंदूकडे केव्हा जातो व आपला मेंदू केव्हा प्रज्वलित करतो  हे कळतच नाही. आपला वेळ भुरकन निघून जातो. व एक प्रकारचे समाधान मिळते.
  वाचनाचा आनंद मिळवण्यासाठी प्रत्येक मंगळवार शुक्रवार संध्याकाळी ५ ३०वाजले कि सर्वांची गडबड सुरु होते. मैत्रिणी भेटणार व आमच्या सारख्या वयोवृद्धांचे एकाकी जीवन थोडावेळ विसरणार. आपल्या सुदेवाने "कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक " यांनी वाचनालय पेटी चालू केली. व आपल्या देवदेवेश्वर सोसाईटी मधील उत्साही महिला सौ अंजली खेडेकर, सौ नंदिनी भावे, सौ अंजली कामत आपला मंगळवार शुक्रवार संध्याकाळी ५ ३०-६ ३० वेळ देऊन वाचनालयाला मूर्त स्वरूप आणले आहे याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहे.
     या उपक्रमाला शुभेछा.              

माझे मनोगत - श्रीमती स्नेहलता धान्गुर्डे

आपणाला माझे मनोगत लिहिताना खरोखर आनंद होत आहे . आपले पत्रक मला माझ्या मुलाने विजय नगर मधून आणून दिले. पत्रक पाहून आनंद झालाच. पण प्रश्न असा राहिला कि मी काम कसे करू शकेन पण विचार मनातून जात नव्हता. अशा विचारातच मी अंजली खेडेकरला भेटले . आपले पत्रक दाखवले. मला जेवढी मदत शक्य होईल तेवढी मी करीन असे सांगितले. तिने हि नक्की केले. मेम्बर्स जमवले. काम चालू केले.सर्व व्यवस्थित झाले. आपण मदत केली व पहिली पेटी मिळाली .
     आपले काम खरेच कौतुकास्पद आहे . आपल्या या कामामुळे ज्येष्ठ लोकांना घरी बसून वाचन करता येऊ लागले . नवीन लेखकांची पुस्तके वाचायला मिळत गेली. आजकाल एवढी पुस्तके विकत घेऊन वाचणे अशक्य आहे. आपल्या मदतीमुळे आम्हा सर्वांना समाधान मिळाले . मी खूप पुस्तके वाचते . मला पूर्वीपासून वाचनाची आवड आहे. अनेक वाचकांना , वेगवेगळ्या पुस्तकांचा आनंद लोकांना आपण देत आहात. बाहेरच्या देशात हि भारतीय संस्कृतीच्या लोकांना व इतरांनाही वाचनाचा आनंद मिळत आहे. मराठी जाणकार आपल्याला भरभरून आनंद देतील. सर्वांनी आपण सर्वाना शक्य असेल तेवढी मदत करावी हि इच्छा आहे.

                   

ज्ञानदीप-श्री. पी. बी. देसाई

  कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक तर्फे कार्यान्वित झालेली "ग्रंथ तुमच्या दारी " हि एक अभिनव अशी वाचनालयाची योजना असून ती मॉडेल टाऊन अंधेरी पश्चिम येथील रहिवाश्यांसाठी फारच उपयुक्त ठरली आहे. मी या योजनेचा आधीपासून सभासद आहे.
   नव्याने प्रकाशित झालेली उत्तम प्रतीची पुस्तके या वाचनालयात उपलब्ध आहेत . या योजनेच्या प्रत्येक पेटीतील पुस्तके उच्च दर्जाची व अतिशय वाचनीय असतात . माझ्या पुरते बोलायचे झाले  तर मी असे म्हणेन कि १)आनंदी शरीर -आनंदी मन -डॉ लिली जोशी २)विजयाचे मानसशास्त्र -भीष्मराज बाम ३)आजच्या विश्वाचे अर्थ -दीपक करंजीकर ४)आइन स्टाईन चा सापेक्षता वाद -अरविंद पारसनीस ५)प्रेमचंद यांच्या निवडक गोष्टी -अनुवादक बाबा भांड  हि माझ्या वाचनात आलेली पुस्तके माझ्या ज्ञानात भर टाकणारी ठरलेली आहेत.
   " ग्रंथ तुमच्या दारी"  हि योजना राबवणारे जे कष्ट घेत आहेत ते कौतुकास्पद आहे. हा ज्ञानदीप हजारो ज्ञानदीपांची ज्योत तेवत ठेवो हि सदिच्छा.  

मी वाचक - विद्यार्थिनीचे मनोगत-प्रज्ञा विद्याधर सावंत (ज्ञानवर्धिनी विद्यालय)

ग्रंथ तुमच्या दारी या अतिशय सुंदर उक्तीचा अर्थ व महत्व हा उपक्रम राबवणाऱ्या लोकांना , आमच्या ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेला व शिक्षकांना पटले त्यामुळेच त्या सर्वांनी आम्हा विद्यार्थ्यांसाठी हा छानसा उपक्रम सुरु केला.
यंदा दहावीचे वर्ष असल्याने मला जास्त नाही पण थोड्या पुस्तकांचा आस्वाद घेता आला.उत्तम कांबळे यांचे "आई समजून घेताना" महाभारताच्या काळात नेणारे भाषासौन्दार्याने नटलेले "मृत्युंजय" कलेबद्दल उत्सुकता जागरूक करणारं आणि कलाकारांच्या (उत्कृष्ठ कलाकारांच्या )जीवनाची ओळख करून देणारे बाल गंधर्व यांच्या जीवनावर आधारित "गंधर्व गान"अशी काही पुस्तके वाचण्याचा योग प्राप्त झाला.
   मला आईचे प्रेम , माया , जिव्हाळा कळला कधी कधी मुलांवर चिडण्याचा रागावण्याचा तिचा त्यामागचा  हेतू       समजला.
  "कर्ण " हे पुस्तक वाचण्यापूर्वी मी पूर्ण पणे अर्जुनाच्या बाजूने होते. कौरवांच्या अधर्माचा आणि सर्वच कौरवांचा राग यायचा . पण या लेखकांनी उत्कृष्ठ भाषा सौंदर्याचा वापर केला आहे. इतके सुंदर वर्णन केलं आहे कि माझ्या मनाला १००% पटले कि कर्ण चांगला होता. त्याच्यावर अन्याय झाला. ज्या कर्णाचा आधी राग यायचा , तो कर्ण पूर्णतः चुकीचा वाईट वागतो  अधर्म्यांना साथ देतो तोच कर्ण किती चांगला किती योग्य वागणारा होता असे वाटू लागले. वाचकांच्या मनाचा ठाव घेऊन त्याचे मतपरिवर्तन करून गोड कोमल मृदू शब्दात सुंदर भाषेच वापर करून आपले मत वाचकाला पटवून देणारे हे पुस्तक माझ्या दृष्टीने खूप चांगले वाटलं.
   वाचनाने माणूस चिंतनशील बनतो. या वाचनाचे महत्व सर्वाना कळावे याकरिता ग्रंथच आमच्यापाशी आले आहेत. त्याबद्दल हा उपक्रम राबवणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद.


          

इवलेसे रोप लावियले दारी२०१२ अखेरची गोष्ट , डॉक्टर अभ्यंकरांनी ग्रथ तुमच्या दारी या योजनेची कल्पना माझ्यासमोर मांडली. वाचनाची पहिल्यापासून आवड शिवाय जवळपासच्या मराठी जनांसाठी असा काही उपक्रम राबवावा हि कित्येक वर्षाची सुप्त इच्छा म्हणून मी अभ्यंकरांना ताबडतोब होकार दिल. आणि केंद्र समन्वयक म्हणून तयारीला लागलो. पण म्हणतात ना 'घी देखा मगर बडगा नाही देखा! बांगूर नगर-वसंत गेलक्झी परिसरातील मराठी मंडळी माझ्या ३०-३२ वर्षाच्या वैद्यकीय व्यवसायामुळे परिचित होती,पण खरी ओळख व्हायची होती.
"बैबिलियन संकृतीवर वैदिक संस्कृतीचा प्रभाव"या वरची पुस्तके असतील का हो ?
"अय्या घरी आणून नाही देणार पुस्तकं ?मग कसलं ग्रंथ तुमच्या दारी "?
"पु लं ची नवीन पुस्तके ठेवणार का?
"तुम्हाला मदत म्हणून होईन मेम्बर !

अश्या अनेक प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या . बांगुरनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे निरलस समाजसेवक श्री महेश नेणे यांच्या प्रचंड सहकार्यामुळे एक एक सदस्य मिळत गेले. आणि १० मार्च(शिव जयंती -कुसुमाग्रज स्मृतिदिन )२०१३च्या सुमुहूर्तावर आमचे केंद्र सुरु झाले.
   सुरु होणे आणि चालवणे या महदंतर आहे याचा ताबडतोब प्रत्यय आला. ग्रंथ पेटी माझ्या दवाखान्यात ठेवलेली त्यामुळे शनिवारी संध्याकाळी पेशंट, वाचक, पेशंट कम वाचक अशा तिहेरी हल्ल्याला तोंड देताना माझी दमछाक होऊ लागली. अश्या वेळी दीपक आणि राजन हे राय बंधू माझ्या सहाय्याला उभे राहिले . दीपक मितभाषी आणि कामाला वाघ राजन हसतमुख पण शिस्तीला काटेकोर त्यामुळे पुस्तक देणे घेणे त्यांची नोंद ठेवणे , वेळेवर पुस्तक न देणाऱ्या महाभागांना टेलीफोनवरून आठवण करून देणे हि कामे हि दुक्कल बिन बोभाटपणे करीत आहे.
    दीपकची कार्य निष्ठा जबरदस्त. स्वताच्या आईचे निधन झाल्यावरही शनिवारी ७ वाजता नित्यनेमाप्रमाणे हे महाशय पुस्तक वितरणासाठी हजर. त्यांच्या घरची गोष्ट मला दुसरीकडून समजली तेव्हा मन हेलावल्या वाचून राहिले नाही, कधी गावी जायचे असेल तर, ऑफिसात जसे सिक लिव चा अर्ज करतात तसा हा माणूस १५ दिवस आधी सांगणार !अश्या अकृत्रिम , भक्कम पाठींब्यावरच आमचे केंद्र सुरळीत चालू आहे.
"रिधोरकर बाई या आणखीन एक अस्सल ग्रन्थ्प्रेमि. पतीच्या ७५व्या वाध्दिवासानिम्मित त्यांनी एकरकमी २०,०००/- चा चेक दिला आणि आमच्या दुसऱ्या ग्रंथ पेटी ची तजवीज सुरू झाली.
    दोन वर्ष उलतलि. विनायक रानडेंच्या "ग्रंथ तुमच्या दारी "चळवळीला आमच्या केंद्रासारखे अनेक खंदे समर्थक मिळाले आहेत आणि तिची प्रगती चालूच आहे.
"इवलेसे रोप लावियले दारी , तयाचा वेलू गेला गगनावरी"

या ज्ञानेश्वरांच्या ओळी आम्ही सानंद साभिमान अनुभवीत आहोत आणि या फुललेल्या मोगऱ्याचा वाचन सुगंध दशदिशात परीमालात राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करीत आहोत.

डॉक्टर विद्याधर देसाई 
बांगूर नगर गोरेगाव (प )  

    

ग्रंथ तुमच्या दारी ४था वर्धापन दिन सोहळा २८नोव्हेंबर २०१५ फोटो