बुधवार, ९ डिसेंबर, २०१५

ग्रंथ पेटीचा आनंद -श्री रवींद्र अवसरे आणि सौ रश्मी अवसरे (आलय सोसायटी गोरेगाव पूर्व)

ग्रंथ तुमच्या दारी हि योजना आमच्या आलय सोसायटीत सुरु होऊन दोन वर्ष पूर्ण झाली. दर चार महिन्यांनी येणारी १०० पुस्तकांची प्रत्येक पेटी म्हणजे विविध प्रकारच्या साहित्याची जणु तिजोरीच असते. यात विज्ञान, आरोग्य , विविध प्रकारच्या सामाजिक व ऐतिहासिक आणि इतर विषयावरील कादंबऱ्या , चरित्रात्मक कादंबऱ्या , कथासंग्रह इत्यादी अनेक प्रकारची पुस्तके असतात . हि पुस्तके अगदी विद्यार्थ्यांपासून वृद्ध व्यक्तींपर्येंत सर्वांना आवडतील व करमणुकी बरोबरच ज्ञानात हि भर घालतील अश्या प्रकारची असतात .
रणजीत देसाई यांची श्रीमान योगी किवा डॉ रवि बापट यांची के ई एम वॉर्ड नं ५ अश्या प्रकारची पुस्तके हातात घेतली कि खाली ठेववत नाही आणि हे सर्व कोणतेही मासिक शुल्क न आकारता फक्त ३०० रुपयाची अनामत रक्कम ठेवून आणि हे कशासाठी तर लोकांमध्ये मराठी साहित्याची आवड निर्माण व्हावी म्हणून. मराठी साहित्याच्या विकासासाठी यापेक्षा अधिक उत्तम पाऊल कोणते असू शकते ? आलय सोसायटीत हि योजना सुरु करणारे श्री मेहेंदळे काका , श्री महेश अभ्यंकर व सध्या हि योजना चालू राहावी म्हणून आठवड्यातून २ दिवस देणाऱ्या श्रीमती ढवळे यांना मन:पूर्वक धन्यवाद.तसेच हि योजना जोमाने विस्तारत जावो हि शुभेछा.
        

श्री कृ प नेर्लेकर -मनोगत

ज्ञानदेव सांगतात 'वक्ता वक्ता नोहे श्रोतेवीण' त्याचप्रमाणे "ग्रंथ हा ग्रंथ नोहे वाचाकावीण". ग्रंथाना त्यांचे नातेवाईक म्हणजे वाचक आपोआपच मिळतात . हा नातेसंबंध वाचक व ग्रंथावर जोपासला जातो. वाचक सामन्यात:उदार मायाळू व कधी कधी ग्रंथ कर्त्यापेक्षा बुद्धिमान असू शकतो. कधी वाचक खट्याळ पण असू शकतो. वाचकाला वाचन संस्कृती अकृत्रिमपणे जगायला हवी असते. ग्रंथ तुमच्या दारी हा कुसुमाग्रज प्रतिष्टान चा उपक्रम निश्चित च चोखंदळ वाचक वर्ग व वाचन संस्कृती जोपासत आहे.         

ग्रंथ तुमच्या दारी चळवळीस शुभेछा ! - संदीप देवरे - रहेजा विहार पवई

प्रथमत: दि ८ फेब्रुवारी २०१५ रोजी आयोजित सुवर्ण ग्रथ पेटी सोहळ्यास हार्दिक शुभेछा. मी गेली दोन वर्षे ग्रंथ तुमच्या दारी या योजनेचा सभासद असून अनेक उत्तमोत्तम पुस्तके केवळ या योजनेमुळेच वाचायला मिळाली . वाचनाची मला लहानपणापासून अतिशय आवड आहे. मात्र मुंबई च्या दैनंदिन धकाधकीच्या चक्रव्युहात वाचानासाठी सवड काढणे व योग्य ग्रंथालयात जाने हे केवळ दुरापास्त.
    मात्र ग्रंथ तुमच्या दारी या कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक या संस्थेच्या श्री विनायक रानडे ह्यांच्या कल्पकतेतून सध्याच्या ग्रंथ पेटी योजनेमुळेच आम्हा सर्व वाचकांना साहित्याबद्दल प्रेम असलेल्या सर्वाना अतिशय फायदा झाला. श्री विनायक रानडे ह्यांना माझ्याकडून लाख लाख धन्यवाद व भविष्यकालीन उपक्रमांना हार्दिक शुभेछा.
    ग्रथ तुमच्या दरी हि चळवळ जोमाने चालवणे म्हणजे जगन्नाथाचा रथ चालवण्याएव्हडेच  अवघड पण पवित्र धर्म कार्य आहे. ह्यात शंकाच नाही. मात्र यासाठी अनेक अनुयायी लागतात. तेव्हा माझ्याकडून ह्यासाठी काही कार्य घडले असलेल्यास मला त्याचा आनंद वाटेल.          

विद्यार्थिनीचे मनोगत -गौरी विजय थोरात (ज्ञानवर्धिनी विद्यालय )

ग्रंथ तुमच्या दारी हे आमच्या शाळेत सुरु केले याबद्दल मी खूप धन्यवाद मानते. ग्रंथाच्या पेटीतील पुस्तके मला खूप आवडली. मी कृष्णायन , ते चौदा तास, यक्ष प्रश्न , युरोपच्या भूमीवरून फिरताना , हि पुस्तके वाचली. "आई समजून घेताना"    हे उत्तम कांबळे यांचे पुस्तक विशेष आवडले. आमच्या शाळेतील शिक्षकही पुस्तके वाचताना रानमित्र हे पुस्तक चं आहे असे सांगतात.

तुम्ही आम्हाला आमच्या शाळेत पुस्तक वाचण्यासाठी ग्रंथ पेटी दिली त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.   

उघडले दार ज्ञानाचे -श्रीमती निर्मल ल बांदेकर (देव देवेश्वर सोसाईटी अंधेरी पूर्व )

लहान पणापासून मला वाचनाची आवड , छंदच म्हणा ना! कादंबरी ,प्रवासवर्णन , शास्त्रीय लेख जे मिळेल ते वाचावयाचे , पण मोठी झाल्यावर नोकरी संसार मुले या जबाबदारीची तारेवरची कसरत करताना या वाचनाच्या आवडीवर केव्हा पडदा पडला हे कळलेच नाही. आता निवृत्ती नंतर फुरसतीचे क्षण मिळाले आहेत व माझी वाचनाची आवड मला जोपासता येऊ लागली आहे. माझेच काय आताच्या तरुण पिढीचे हे च दुख: आहे. फुरसतीच्या वेळी हातात पुस्तक असेल तर आपण वाचतो . आजकाल कोणालाच वेळच्या वेळी बाहेर जाऊन पुस्तक बदलून आणणे जमत नाही.
    हल्ली टी व्ही वगैरे अनेक करमणुकीची साधने उपलब्ध आहेत . पण त्यामुळे वरवर करमणूक होते . पण वाचन करताना एकाग्र चित्ताने व शांततेने वाचत असल्याने आपण वेगळ्या वातावरणात जाऊन आपल्या मनाला विरंगुळा मिळतो. पुस्तकातील मजकूर मनाच्या गाभाऱ्यातून मेंदूकडे केव्हा जातो व आपला मेंदू केव्हा प्रज्वलित करतो  हे कळतच नाही. आपला वेळ भुरकन निघून जातो. व एक प्रकारचे समाधान मिळते.
  वाचनाचा आनंद मिळवण्यासाठी प्रत्येक मंगळवार शुक्रवार संध्याकाळी ५ ३०वाजले कि सर्वांची गडबड सुरु होते. मैत्रिणी भेटणार व आमच्या सारख्या वयोवृद्धांचे एकाकी जीवन थोडावेळ विसरणार. आपल्या सुदेवाने "कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक " यांनी वाचनालय पेटी चालू केली. व आपल्या देवदेवेश्वर सोसाईटी मधील उत्साही महिला सौ अंजली खेडेकर, सौ नंदिनी भावे, सौ अंजली कामत आपला मंगळवार शुक्रवार संध्याकाळी ५ ३०-६ ३० वेळ देऊन वाचनालयाला मूर्त स्वरूप आणले आहे याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहे.
     या उपक्रमाला शुभेछा.              

माझे मनोगत - श्रीमती स्नेहलता धान्गुर्डे

आपणाला माझे मनोगत लिहिताना खरोखर आनंद होत आहे . आपले पत्रक मला माझ्या मुलाने विजय नगर मधून आणून दिले. पत्रक पाहून आनंद झालाच. पण प्रश्न असा राहिला कि मी काम कसे करू शकेन पण विचार मनातून जात नव्हता. अशा विचारातच मी अंजली खेडेकरला भेटले . आपले पत्रक दाखवले. मला जेवढी मदत शक्य होईल तेवढी मी करीन असे सांगितले. तिने हि नक्की केले. मेम्बर्स जमवले. काम चालू केले.सर्व व्यवस्थित झाले. आपण मदत केली व पहिली पेटी मिळाली .
     आपले काम खरेच कौतुकास्पद आहे . आपल्या या कामामुळे ज्येष्ठ लोकांना घरी बसून वाचन करता येऊ लागले . नवीन लेखकांची पुस्तके वाचायला मिळत गेली. आजकाल एवढी पुस्तके विकत घेऊन वाचणे अशक्य आहे. आपल्या मदतीमुळे आम्हा सर्वांना समाधान मिळाले . मी खूप पुस्तके वाचते . मला पूर्वीपासून वाचनाची आवड आहे. अनेक वाचकांना , वेगवेगळ्या पुस्तकांचा आनंद लोकांना आपण देत आहात. बाहेरच्या देशात हि भारतीय संस्कृतीच्या लोकांना व इतरांनाही वाचनाचा आनंद मिळत आहे. मराठी जाणकार आपल्याला भरभरून आनंद देतील. सर्वांनी आपण सर्वाना शक्य असेल तेवढी मदत करावी हि इच्छा आहे.

                   

ज्ञानदीप-श्री. पी. बी. देसाई

  कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक तर्फे कार्यान्वित झालेली "ग्रंथ तुमच्या दारी " हि एक अभिनव अशी वाचनालयाची योजना असून ती मॉडेल टाऊन अंधेरी पश्चिम येथील रहिवाश्यांसाठी फारच उपयुक्त ठरली आहे. मी या योजनेचा आधीपासून सभासद आहे.
   नव्याने प्रकाशित झालेली उत्तम प्रतीची पुस्तके या वाचनालयात उपलब्ध आहेत . या योजनेच्या प्रत्येक पेटीतील पुस्तके उच्च दर्जाची व अतिशय वाचनीय असतात . माझ्या पुरते बोलायचे झाले  तर मी असे म्हणेन कि १)आनंदी शरीर -आनंदी मन -डॉ लिली जोशी २)विजयाचे मानसशास्त्र -भीष्मराज बाम ३)आजच्या विश्वाचे अर्थ -दीपक करंजीकर ४)आइन स्टाईन चा सापेक्षता वाद -अरविंद पारसनीस ५)प्रेमचंद यांच्या निवडक गोष्टी -अनुवादक बाबा भांड  हि माझ्या वाचनात आलेली पुस्तके माझ्या ज्ञानात भर टाकणारी ठरलेली आहेत.
   " ग्रंथ तुमच्या दारी"  हि योजना राबवणारे जे कष्ट घेत आहेत ते कौतुकास्पद आहे. हा ज्ञानदीप हजारो ज्ञानदीपांची ज्योत तेवत ठेवो हि सदिच्छा.  

मी वाचक - विद्यार्थिनीचे मनोगत-प्रज्ञा विद्याधर सावंत (ज्ञानवर्धिनी विद्यालय)

ग्रंथ तुमच्या दारी या अतिशय सुंदर उक्तीचा अर्थ व महत्व हा उपक्रम राबवणाऱ्या लोकांना , आमच्या ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेला व शिक्षकांना पटले त्यामुळेच त्या सर्वांनी आम्हा विद्यार्थ्यांसाठी हा छानसा उपक्रम सुरु केला.
यंदा दहावीचे वर्ष असल्याने मला जास्त नाही पण थोड्या पुस्तकांचा आस्वाद घेता आला.उत्तम कांबळे यांचे "आई समजून घेताना" महाभारताच्या काळात नेणारे भाषासौन्दार्याने नटलेले "मृत्युंजय" कलेबद्दल उत्सुकता जागरूक करणारं आणि कलाकारांच्या (उत्कृष्ठ कलाकारांच्या )जीवनाची ओळख करून देणारे बाल गंधर्व यांच्या जीवनावर आधारित "गंधर्व गान"अशी काही पुस्तके वाचण्याचा योग प्राप्त झाला.
   मला आईचे प्रेम , माया , जिव्हाळा कळला कधी कधी मुलांवर चिडण्याचा रागावण्याचा तिचा त्यामागचा  हेतू       समजला.
  "कर्ण " हे पुस्तक वाचण्यापूर्वी मी पूर्ण पणे अर्जुनाच्या बाजूने होते. कौरवांच्या अधर्माचा आणि सर्वच कौरवांचा राग यायचा . पण या लेखकांनी उत्कृष्ठ भाषा सौंदर्याचा वापर केला आहे. इतके सुंदर वर्णन केलं आहे कि माझ्या मनाला १००% पटले कि कर्ण चांगला होता. त्याच्यावर अन्याय झाला. ज्या कर्णाचा आधी राग यायचा , तो कर्ण पूर्णतः चुकीचा वाईट वागतो  अधर्म्यांना साथ देतो तोच कर्ण किती चांगला किती योग्य वागणारा होता असे वाटू लागले. वाचकांच्या मनाचा ठाव घेऊन त्याचे मतपरिवर्तन करून गोड कोमल मृदू शब्दात सुंदर भाषेच वापर करून आपले मत वाचकाला पटवून देणारे हे पुस्तक माझ्या दृष्टीने खूप चांगले वाटलं.
   वाचनाने माणूस चिंतनशील बनतो. या वाचनाचे महत्व सर्वाना कळावे याकरिता ग्रंथच आमच्यापाशी आले आहेत. त्याबद्दल हा उपक्रम राबवणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद.


          

इवलेसे रोप लावियले दारी



२०१२ अखेरची गोष्ट , डॉक्टर अभ्यंकरांनी ग्रथ तुमच्या दारी या योजनेची कल्पना माझ्यासमोर मांडली. वाचनाची पहिल्यापासून आवड शिवाय जवळपासच्या मराठी जनांसाठी असा काही उपक्रम राबवावा हि कित्येक वर्षाची सुप्त इच्छा म्हणून मी अभ्यंकरांना ताबडतोब होकार दिल. आणि केंद्र समन्वयक म्हणून तयारीला लागलो. पण म्हणतात ना 'घी देखा मगर बडगा नाही देखा! बांगूर नगर-वसंत गेलक्झी परिसरातील मराठी मंडळी माझ्या ३०-३२ वर्षाच्या वैद्यकीय व्यवसायामुळे परिचित होती,पण खरी ओळख व्हायची होती.
"बैबिलियन संकृतीवर वैदिक संस्कृतीचा प्रभाव"या वरची पुस्तके असतील का हो ?
"अय्या घरी आणून नाही देणार पुस्तकं ?मग कसलं ग्रंथ तुमच्या दारी "?
"पु लं ची नवीन पुस्तके ठेवणार का?
"तुम्हाला मदत म्हणून होईन मेम्बर !

अश्या अनेक प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या . बांगुरनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे निरलस समाजसेवक श्री महेश नेणे यांच्या प्रचंड सहकार्यामुळे एक एक सदस्य मिळत गेले. आणि १० मार्च(शिव जयंती -कुसुमाग्रज स्मृतिदिन )२०१३च्या सुमुहूर्तावर आमचे केंद्र सुरु झाले.
   सुरु होणे आणि चालवणे या महदंतर आहे याचा ताबडतोब प्रत्यय आला. ग्रंथ पेटी माझ्या दवाखान्यात ठेवलेली त्यामुळे शनिवारी संध्याकाळी पेशंट, वाचक, पेशंट कम वाचक अशा तिहेरी हल्ल्याला तोंड देताना माझी दमछाक होऊ लागली. अश्या वेळी दीपक आणि राजन हे राय बंधू माझ्या सहाय्याला उभे राहिले . दीपक मितभाषी आणि कामाला वाघ राजन हसतमुख पण शिस्तीला काटेकोर त्यामुळे पुस्तक देणे घेणे त्यांची नोंद ठेवणे , वेळेवर पुस्तक न देणाऱ्या महाभागांना टेलीफोनवरून आठवण करून देणे हि कामे हि दुक्कल बिन बोभाटपणे करीत आहे.
    दीपकची कार्य निष्ठा जबरदस्त. स्वताच्या आईचे निधन झाल्यावरही शनिवारी ७ वाजता नित्यनेमाप्रमाणे हे महाशय पुस्तक वितरणासाठी हजर. त्यांच्या घरची गोष्ट मला दुसरीकडून समजली तेव्हा मन हेलावल्या वाचून राहिले नाही, कधी गावी जायचे असेल तर, ऑफिसात जसे सिक लिव चा अर्ज करतात तसा हा माणूस १५ दिवस आधी सांगणार !अश्या अकृत्रिम , भक्कम पाठींब्यावरच आमचे केंद्र सुरळीत चालू आहे.
"रिधोरकर बाई या आणखीन एक अस्सल ग्रन्थ्प्रेमि. पतीच्या ७५व्या वाध्दिवासानिम्मित त्यांनी एकरकमी २०,०००/- चा चेक दिला आणि आमच्या दुसऱ्या ग्रंथ पेटी ची तजवीज सुरू झाली.
    दोन वर्ष उलतलि. विनायक रानडेंच्या "ग्रंथ तुमच्या दारी "चळवळीला आमच्या केंद्रासारखे अनेक खंदे समर्थक मिळाले आहेत आणि तिची प्रगती चालूच आहे.
"इवलेसे रोप लावियले दारी , तयाचा वेलू गेला गगनावरी"

या ज्ञानेश्वरांच्या ओळी आम्ही सानंद साभिमान अनुभवीत आहोत आणि या फुललेल्या मोगऱ्याचा वाचन सुगंध दशदिशात परीमालात राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करीत आहोत.

डॉक्टर विद्याधर देसाई 
बांगूर नगर गोरेगाव (प )  

    

ग्रंथ तुमच्या दारी ४था वर्धापन दिन सोहळा २८नोव्हेंबर २०१५ फोटो

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

मी समन्वयक - मराठी भाषेच्या उत्कर्षाची चाहूल - श्री रामचंद्र पुरुषोत्तम मेहेंदळे

इवलेसे रोप लावलीयानावरी 
त्याचा वेलू गेला गगनावरी 
विनायकाच्या अंतरंगी स्वप्न होते आगळे 
स्वप्नपूर्तीचे समाधान असते जगावेगळे 

श्री विनायक रानडे , विश्वस्त कुसुमाग्रज प्रतिष्ठान , नाशिक यांनी मराठी भाषांचे संवर्धन व्हावे या एका ध्येयाने प्रेरित होऊन ग्रंथ तुमच्या दरी या बीज वृक्षाचा महावृक्ष कसा होईल याचा विचार तन मन धन लावून धरला आणि अखेर तो तडीस हि नेला. हा वटवृक्ष केवळ भारतापुरता मर्यादित न राहता परदेशस्थ मराठी नागरिकांपर्येंत पोहोचोवला यातच त्यांच्या यशाचे गमक आहे.
   सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये इतर राज्यांशी तुलना करता मराठी भाषेची किती शोचनीय अवस्था आहे हे सर्वजण  जाणतात  . महाराष्ट्राची मराठी भाषा हि जणू महाराष्ट्रामधून लुप्त होत चालली आहे असे आजचे एकंदरीत निराशाजनक चित्र आहे. मराठी भाषा जिवंत राहावी, तिचे संवर्धन व विकास व्हावा. लोकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी व ती वृद्धिंगत व्हावी या एकमेव ध्येयाने श्री विनायक रानडे यांनी जी झेप घेतली आहे हि एक अभिनंदनीय व अविस्मरणीय अशी बाब आहे.
       या उपक्रमाला साहित्य क्षेत्रात , राजकीय क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात एक सकारात्मक संदेश जात आहे, उपक्रमाला प्रतिसाद मिळतो आहे. हेच या उपक्रमाचे फलित आणि यश आहे. मला पूर्ण विश्वास आहे कि आज ना उद्या   महाराष्ट्र सरकारला जाग येईल आणि मराठी भाषेला राजाश्रय प्राप्त होईल. या उपक्रमाद्वारे मराठी अस्मिता परत जागृत होऊन महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मराठीचा डंका परत जोमाने वाजू लागेल याबद्दल मनामध्ये तिळमात्र शंका नाही.
       मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी सर्व मराठी भाषिकांनी या उपक्रमाचे भव्य स्वागत करावयास हवे आणि जेथे जेथे शक्य आहे, जेथे जेथे मराठी माणूस आहे त्याच्या दारापर्येंत या उपक्रमाचे पाऊल पडावयास हवे . मराठी भाषेला भूतकाळात मिळालेले उज्वल यश भविष्यात परत प्राप्त करून देण्यास सर्व मराठी भाषिकांनी यथाशक्ती सहकार्य करावे हे आवाहन करतो

या उपक्रमासाठी माझ्या लाख लाख शुभेछा












        

आधार - श्री बबन सावंत

नसला आधार तुम्हाला कुणाचा जरी , देऊ शकता तुम्ही
तुमचा आधार कुणाला तरी
जसा जगाला प्रकाश देतो दिवा
स्वतःखाली अंधार असला तरी
आंधळ्याने लंगड्याला पाठीवर घेतल्यास दोघेही करू शकतात वाटचाल जीवनाची
तरुच्या आधारानेच वेळी उंची गाठतात तरुच्या बरोबरीची
तार फुलाला अन्नपाणी झाडच पुरवीत असते.
कलम केलेली फांदीसुद्धा झाडाच्या आधारानेच पोसली जाते.
कुणाचा आधारस्तंभ होण  तसं कठीण असतं
पण बुडत्याला काडीचा आधार देणे मात्र सोपं असतं
प्रत्येकाला आयुष्यात आधाराची देवाण घेवाण होतंच असते
अंतिम यात्रेत सुद्धा चार खांद्याच्या आधारानेच जावे लागते


जादूची पेटी -श्री दत्तात्रेय शंकर धुमाळ

या पेटीमध्ये दडलेय काय?
पेटीमध्ये दडलेय काय
खाऊ कि काय? नुसती बडबड
हि तर जादूच्या पेटीची खडखड  
पेटीला खोलता ग्रंथ, येती तुमच्या हाती
वाचून वाचून लिहिता टिप्पणी
लहान मोठे घेती गुंफणी
या पेटीमध्ये दडलय का
दडलय का
वाचकांची भूक वाचकांची भूक
संपता संपेना पेटीवर पेटी बदलती पुस्तके
म्हणतात कसे खाऊ कि काय? नुसती बडबड
हि तर वाचकांसाठी, जादूच्या पेटीची खडखड
आमची भूक तुमची पेटी
असू द्या आम्हा सदेव भेटी
ग्रथ तुमच्या दारीची
जादूच्या पेटीची
  

सरस्वतीचे मंदिर -सुप्रिया नाईक

सुशांत जागा
जसे तपोवन
जिथे साठले
विद्येचे धन
रमते माझे मन
ग्रंथ पेटीच्या दारी
होऊन मोहित निर्भर
रसिक येउनि
विहार करिती
रंगीत पृष्ठे
मिटती उघडती
हे निवडू कि ते घेऊ
चिंतन करिती
येती जाती
सुखे विहरती
ज्ञानाचे कण
सरस्वतीचे हे तर दालन
इथे शांतीचा केवळ वावर
रमते माझे मन
ग्रंथ पेटीच्या दारी
होऊनी मोहित निर्भर
कुण्या रसिक काव्य आवडे अध्यात्माचे कुणा वावडे
रुची वेगळी , दुर्लभ योजक
मेल घालती ग्रंथ पेटीचे
ते संग्राहक
अतीव सुंदर
रमते माझे मन
ग्रंथ पेटीच्या द्वारी
होऊन मोहित निर्भर
रसिकांसाठी हे दुजे घर
अभिमानाची वाहून मोहर
एकजुटीने सहकार्याने
जपूया सारे नव्या जुन्याचा
सुवर्ण संकर
रमते माझे मन
ग्रंथ पेटीच्या दारी
होऊनी मोहित निर्भर





बुधवार, ११ नोव्हेंबर, २०१५

विधिलिखित - श्री बबन सावंत

कोणी म्हणती नशीब तयाला , कोणी म्हणती विधिलिखित
अस्तित्व तयाचे मानवी जीवनी आहे मात्र खचित
एकाच फांदीची दोन फुले , एक वाहिले जाते प्रभू चरणावर
तर दुसरे जाऊन पडते , माणसाच्या कलेवरावर
जुळे जरी जन्म घेती , एका मातेच्या पोटी
एक जीव त्यातील होती करोडपती, दुसऱ्याच्या हाती मात्र करवंटी
जन्म घेती प्राणी जगती, दीर्घायुष्य जगण्यासाठी
पण काही मरती अल्पायुषी , तर काही जगती शतायुषी
कसे जगावे, किती जगावे, नसते अपुल्या हाती
ते सारे लिहिले जाते, विधीच्या ताळेबंद खाती
विज्ञानाच्या प्रगतीतून , मानव चंद्रावर पोचला
पण कल्पनाचे विधिलिखित तो नाही टाळू शकला
अटल जरी असेल अपुले विधिलिखित
तरी धरू नये भीती तयाची मनात
फुले असतो वा काटे वाटेत
चालत राहावे जीवनात , सदेव आनंदात

माझी आई - श्री बबन सावंत

नऊ महिने नऊ दिवस वाढवलेस तू मला तुझ्या उदरात
म्हणूनच मी आलो आज या जगात
माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब बनलाय तुझ्याच दुधाने
तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेस तू मला प्रेमाने
सरस्वतीचा श्री गणेशा तुझे बोट धरून शिकलो मी
तुझ्याच छायेखाली लहानाचा मोठा झालो मी
मातृप्रेमाची महती गायली आहे अनेकानेक कवींनी
मी पामर वर्णू कशी ती शब्दांनी
ठेच लागली कधी जर मम पायाला
आई ग शब्द फुंकर घालतात मम वेदनेला
निसर्ग नियमानुसार सोडून गेलीस तू या जगाला
कायमचे पोरके करून तुझ्या या मुलाला
तुझ्या आठवणीने आजही पाणावतात डोळे माझे
नाही फेडू शकणार मी या जन्मी ऋण तुझे


निर्माल्य - श्री बबन सावंत

निसर्ग नियमानुसार ठरलो आहोत आपण ज्येष्ठ
पण मानाने आहोत आपण अजूनही धष्टपुष्ट
वय परत्वे चालताहेत रोग अनेक
पण त्यांची पर्वा नाही आम्हाला क्षणेक
पण जरी पिकलं असलं तरी हिरवा आहे देठ
ज्ञानाभूवाने आम्ही आहोत सदेंव श्रेष्ठ
दिसू लागले आता जरी पैलतीर
आम्हाला नाही त्याची जरा हि फिकीर
वसा घेतला आहे आम्ही समाज सेवेचा
म्हणून झेंडा उंचवतो आम्ही समाज सेवेचा
निर्माल्य झाले असेल जरी आज आमच्या आयुष्याचे
तरी उगवतील त्यातून अंकुर उद्या नव्या विचारांचे


रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

सेलेब्रेटी कॉर्नेर -ज्योती कपिले - कवयत्री

कुसुमाग्रज प्रतिष्ठानने अतिशय निस्वार्थ पाने एक व्रत एक वसा म्हणून हाती घेतलेल्या एक अभूत पूर्व अश्या योजनेचा अर्थात ग्रंथ तुमच्या दरी या वाचन संस्कृती वाढवण्याच्या जोपासण्याच्या प्रयत्नांचा अथक प्रसार करणाऱ्या आणि  ह्या योजनारूपी शिवधनुष्याला पेलणाऱ्या प्रत्येक वाचन प्रेमींना माझ्या शुभेछा


सेलेब्रेटी कॉर्नेर -अनिता दाते केळकर

आपले जीवन समृद्ध करण्यात विकसित करण्यात साहित्याचा मोठा वाट आहे. विविध काळातील विविध विषयांची व साहित्य प्रकारांची पुस्तके ह्या पेट्यांत भरलेली आहेत. हि पुस्तके वाचकांसाठी आनंद देणारा बहुमुल्य खजिना आहे तो लुटावा आणि आपल्या जाणीव संपन्न कराव्यात

ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाला माझ्या शुभेछा   

सेलिब्रेटी कॉर्नेर - श्री शैलेश दातार

ग्रंथ तुमच्या दारी या  योजनेचा मी सदस्य आहे . वाचण्याची प्रचंड आवड , कुसुमाग्रजांकरिता मनात असलेले अत्यंत आदराचे स्थान आणि आसपास चांगल्या वाचनालयांची वानवा असल्याने साहजिकच या उपक्रमाचा भाग झालो आहे. हा उपक्रम तरुण आणि लहान मुलांपर्येंत पोहचून त्यांना याची आवड निर्माण करण्याचे आव्हान मात्र आपल्या समोर आहे. माझ्या वाचण्याचा ध्यास अविरत चालू ठेवण्याकरिता या उपक्रमाने मोलाची मदत केली त्याबद्दल धन्यवाद.

सेलिब्रेटी कॉर्नेर - श्री सुनील बर्वे

ग्रंथ तुमच्या दारी हा आजच्या काळातला अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. इंटरनेट  आणि दगदगीच्या जीवन पद्धतीमुळे कामावरून घरी आले कि बाहेर पडावेसे वाटत नाही. त्यामुळे घरात बसल्या बसल्या जी करमणूक जे प्रबोधन जे ज्ञानार्जन होईल त्यात लोक रमताना दिसतात . त्यामुळे लायब्ररी मध्ये जाऊन पुस्तक आणून वाचणे तर फारच दुर्मिळ आहे. अश्यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे सुरु केलेला हा उपक्रम हि काळाची गरज आहे. अश्या अनोख्या उपक्रमाला प्रतिसाद हि उत्तम मिळतोय हे ऐकून खूप आनंद झाला व हा उपक्रम राबवणाऱ्या प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे असे वाटले.


शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

८ नोव्हेंबर २०१५ रोजी संस्कार भारती रांगोळी कार्यशाळा

कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि ऋतुरंग परिवारातर्फे ८ नोव्हेंबर २०१५ रोजी संस्कार भारती रांगोळी कार्यशाळा माझे ग्रंथालय बालविभाग आणि ऋतुरंग सदस्यांसाठी नाशिक येथे आयोजित केली आहे
स्थळ -ऋतुरंग भवन , दत्त मंदिर , नाशिक रोड विभाग
वेळ -सकाळी ११-१
समन्वयक तन्वी अमित -७६९८८२९९९

प्रकाश यात्रा आठवणीची कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्टान ६ नोव्हेंबर २०१५ वृत्तपत्र बातमी

या कार्यक्रमात १५० कलावंतांची आठवण म्हणून त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते एक पणती कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे प्रज्वलित करण्यात येणार आहे. या निमित्ताने  आठवणींची  देवाणघेवाण, गप्पा , फराळ   आणि प्रकाश यात्रा याचे आयोजन केले जाणार आहे .

https://youtu.be/8IZNwnEZ-vE 

महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ३१ ऑक्टोबर २०१५ ग्रंथ तुमच्या दारी - ग्रंथ पेटी कार्यक्रम वृतांत आणि छायाचित्रे

     महाराष्ट्र सेवा संघ आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ग्रंथ तुमच्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी सुविधा गोखले सभागृह (महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड) येथे संध्याकाळी ६ वाजता आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सौ अलका भावे यांनी केले. 
    या कार्यक्रमात कुसुमाग्रज प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री विनायक रानडे , महाराष्ट्र सेवा संघाचे श्री चंद्रशेखर वझे , श्री जयप्रकाश बर्वे , प्रमुख अतिथी म्हणून श्री विसुभाऊ बापट आणि सौ उमा बापट उपस्थित होते.या शिवाय मुलुंड मधील ६ प्राथमिक शाळेतील शिक्षक , मुख्याध्यापक आणि विद्यार्थी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमाची सुरवात  ग्रंथ तुमच्या दारी या योजनेची थोडक्यात माहिती देऊन करण्यात आली. त्यानंतर शाळेतील शिक्षकांना  मान्यवरांच्या हस्ते १०० पुस्तकांची  (७० मराठी आणि ३० इंग्रजी )ग्रंथ पेटी  प्रदान करण्यात आली. श्री विनायक रानडे यांना संवाद साधण्याची विनंती केली.
    श्री विनायक रानडे यांनी मुलांशी संवाद साधताना विचारले कि ती वाचतात का? तर त्याचे उत्तर अगदी एकासुरात हो असे आले मग ते म्हणाले कि वाचन हे आपली उन्नती घडवते त्यातून नवीन विषयाचे ज्ञान मिळते. वाचन सहभागातून शिक्षण घेणे शिकवते. त्यांनी त्याच बरोबर महाराष्ट्र सेवा संघाचे या  योजनेत सहभागी झाल्याबद्दल आभार मानले.आणि श्री विसुभाऊ बापट यांनी या कार्यक्रमात येणे मान्य केले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
      सौ युगंधरा वळसंगकर यांनी श्री विसुभाऊ बापट यांची थोडक्यात ओळख करून दिली. त्यांची ओळख करून देताना त्या सांगतात कि २६ मे १९८१ रोजी त्यांनी कुटुंब रंगलेय काव्यात या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग केला. त्यानंतर सलग ३४ वर्ष हा कार्यक्रम ते करत आहेत. त्यांनी २००७ मध्ये सलग १५ तास कविता वाचन करून नवीन विक्रम केला जो लिम्का बुक ऑफ रेकोर्ड मध्ये नोंदवण्यात आला. १ एप्रिल २०१५ रोजी वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड ऑफ इंडिया आणि १२ जुन २०१५ रोजी वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया असे सन्मान त्यांना मिळाले . विसुभाऊ नि मराठी रसिकांना मराठी कविता ऐकायची आणि अनुभवायची अनुभूती दिली.हा प्रयोग २७४२ वा आहे असे त्यांनी नमूद केले.  महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात याचे प्रयोग सादर करण्यात आले. आश्रम शाळांसाठी मोफत प्रयोग सदर केले. त्याशिवाय शेतकरी आत्महत्या होऊ नये या साठी त्यांना कवितेच्या माध्यमातून धीर देणारे कार्यक्रम त्यांनी केले. हे सांगून  त्यांनी श्री विसुभाऊ बापट यांना   ओमकार काव्यदर्शन कार्यक्रम सादर करण्याची विनंती केली. 
     श्री  विसुभाऊ यांच्या कार्यक्रमाआधी आभारप्रदर्शन चा कार्यक्रम करण्यात आला . यात सौ गीता ग्रामोपाध्ये  आणि सौ प्रतिमा जोशी यांचा सत्कार मान्यवरान्तर्फे करण्यात आला. सौ अलका भावे यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींचे श्री चंद्रशेखर वझे , श्री जयप्रकाश बर्वे , श्री विनायक रानडे , श्री विसुभाऊ बापट , सौ उमा बापट , कॅन्टीन व्यवस्थापक , सेतू प्रकाशन चे श्री किशोर साळवी , श्री विजय वैद्य ,सौ मैत्रीये केळकर आणि उपस्थित प्रेक्षक आणि सहकाऱ्यांचे आभार मानले त्यानंतर श्री विसुभाऊ यांनी कार्यक्रम सुरु केला.     
     श्री विसुभाऊ बापट यांनी त्यांचा ओमकार काव्य दर्शन हा कार्यक्रम सदर केला . कार्यक्रमाची सुरवात सरस्वती वंदनेने केली. त्यानंतर गुरु प्रार्थना केली. त्यानंतर विविध प्रकारच्या बाल कविता सदर करून मुलांना उत्तम प्रकारे गुंतवून ठेवले. कविता म्हणजे काय तिचे प्रकार हे फार सुंदर रित्या त्यांनी विशद केले. कविता म्हणजे उत्कट सौंदर्याचा भावपूर्ण अविष्कार हे सांगताना त्यांनी कवितेचे वेग वेगळे १२ प्रकार सांगितले . कविता सदर करताना त्यांना आलेले अनुभव आणि वेगवेगळ्या सुंदर कविता यांचे अप्रतिम सादरीकरण  त्यांनी या कार्यक्रमातून घडवले. श्री विसुभाऊ बापट यांनी सौ उमा बापट यांच्याविषयी माहिती देताना सांगितले कि त्या हिंदी विषयात विशारद असून त्यांनी ४ पुस्तके हि लिहिली आहेत, त्याशिवाय त्या बालभारती मध्ये गाईड चे काम करतात , कविता वाचनात हि त्या विसुभाऊ न साथ देतात.  
   सौ उमा बापट यांनी वाचन  हे माणूस घडवते. नुसते वाचन न करता त्यावर चर्चा केली तर नवीन विषयाचे आकलन हि होते. त्यांच्या लहान पाणी त्यांच्या वडिलांमुळे त्यांना वाचनाची आवड कशी निर्माण झाली . आणि शिस्तबद्ध वाचन केल्यामुळे त्यांचा कसा विकास झाला त्याचे त्यांनी वर्णन केले.
   या संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी शिक्षक, मुख्याध्यापक यांनी भरभरून प्रतिसाद दिला. मांडून ठेवलेल्या ग्रंथ पेटीचे मुलांना खूपच आकर्षण वाटत होते. श्री विसुभाऊ यांच्या कार्यक्रमात मुलांनी खूप सुंदर सहभाग दर्शवला.
    या कार्यक्रमाच्या संयोजनेत सौ मैत्रीयी केळकर, सौ अलका भावे , सौ प्रतिमा जोशी , सौ किशोरी वाणी , सौ युगंधरा वळसंगकर , सौ गीता ग्रामोपाध्ये , श्री विनायक जोगळेकर ,श्री विजय वैद्य आणि कुमारी अदिती भावे यांनी सहकार्य केले. नाशिक हून खास नाशिक ग्रंथ तुमच्या दरी विभागाचे श्री अरुण नातू हि या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.      
                     
 

https://www.youtube.com/watch?v=q7q7wJGU48Q&feature=youtu.be

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०१५

माझे ग्रंथालय ठाणे २० डिसेंबर 2014 प्रथम पेटी बदल सोहळा

माझे ग्रंथालय ठाणे २० डिसेंबर प्रथम पेटी बदल सोहळा

        ठाणे येथील माझे ग्रंथालय योजनेतील प्रथम पेटी बदल सोहळा बी एन बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये २० डिसेंबर २०१४ रोजी पतंजली सभागृहात संपन्न झाला. या सोहळ्यात श्री विनायक रानडे (विश्वस्त , कुसुमाग्रज प्रतिष्ठान), श्री. चिंतामणी सिधये(प्रमुख पाहुणे ), कॉलेजच्या प्राचार्य  श्रीमती माधुरी पेजावर , सौ. रश्मी जोशी (समन्वयक, ग्रंथ तुमच्या दारी ठाणे ), श्री अरविंद जोशी( समन्वयक, माझे ग्रंथालय ) ,माझे ग्रंथालय योजनेतील सहभागी सभासद , सायन्स कॉलेजेचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

या सोहळ्यात श्री चिंतामणी सिधये यांनी वाचन आणि त्याचा होणारे फायदे सांगितले. याच बरोबर श्री

विनायक रानडे , सौ माधुरी पेजावर यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर श्री अरविंद जोशी यांनी

स्वत रचलेले माझे ग्रंथालय हे गाणे म्हणून दाखवले. त्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. श्री विनायक

रानडे यांच्या विनंती वरून माझे ग्रंथालय या योजनेत सहभागी सदस्यांनी आपली ओळख करून दिली आणि

आपले मनोगत व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमात बांदोडकर कॉलेज च्या ग्रंथपाल कादंबरी मांजरेकर आणि

त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप मदत केली. आभारप्रदर्शन होऊन कार्यक्रम संपन्न झाला.

या सोहळ्याचे फोटो     

https://youtu.be/7za1vZ3BuG0

श्री चिंतामणी सिधये यांचे भाषण
https://soundcloud.com/granthvinayak/chintamani-sidhaye-speech


माझे ग्रंथालय गाणे - श्री अरविंद जोशी
https://soundcloud.com/granthvinayak/maze-granthalay-gane

        

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५

ग्रंथ तुमच्या दारी - यंग तरंग कार्यक्रम डी डी सह्याद्री वाहिनी सहभाग- श्री विनायक रानडे आणि श्री राजीव तांबे

ग्रंथ तुमच्या दारी - यंग तरंग कार्यक्रम डी डी  सह्याद्री वाहिनी-  सहभाग श्री विनायक रानडे आणि श्री राजीव तांबे .

१५ मार्च २०१५ आमच्या आयुष्यातील एक भन्नाट दिवस. भन्नाट या अर्थाने कि त्यादिवशी मी आणि मैत्रयी केळकर आम्ही  सहयाद्री वरील एका कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून गेलो. त्यादिवशी सकाळी आम्हाला विनायक रानडे यांचा फोन आला  कि आम्हाला दूरदर्शन वरील एका कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून यायचे आहे. आमची दोघींची धावपळ सुरु झाली . घरचे आवरून आम्ही दादर पर्येंत ट्रेन ने  आणि मग टेक्सी ने वरळीला गेलो. तिथे गेल्यावर  राजीव तांबे ( बाल कथा लेखक ) यांची हि ओळख झाली. आणि मग आम्ही सगळे मेक अप रूम मध्ये जाऊन बसलो. विनायक रानडे आणि राजीव तांबे  यांचा मेक अप होणार होता. तो होइ  पर्येंत आम्ही सगळे तिथे बसून त्या कार्यक्रमाबद्दल बोलत बसलो त्यात त्याच्या विनायक रानडे , राजीव तांबे , मधुवनी गाडगीळ , मैत्रयी केळकर. आणि समीरा गुजर  यांच्या गप्पा सुरु झाल्या . विषय होता वाचन आणि आजची पिढी . मुले वाचतात का ? काय वाचतात ? का नाही वाचत ? मराठी वाचतात का इंग्लिश ? मराठी लेखक आहेत का मुलांसाठी ? ते मुलांना माहित असतात का ? आणि मग आम्ही सगळे कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंग ला गेलो कॅमेरा फिरत होता. मुले छान  संवाद साधत होती . 
       मुलांना जेव्हा विचारले ते का वाचतात ? तर वेग वेगळी उत्तरे आली. नवीनअनुभव घेण्यासाठी,स्फूर्ती येण्यासाठी, अभ्यासाला  पूरक  असे वाचन होते.
 मुले काय वाचतात हे विचारले तेव्हा कथा कादंबरी स्फुर्तीपर पुस्तके किवा आत्मकथा अशी उत्तर आली. यानंतर राजीव तांबे म्हणाले कि स्फूर्ती हि एकदा आली कि निघून नाही जात. ती आनंदासारखी असते कायम राहते.विनायक रानडे म्हणाले कि मुलांचे वाचन हे उपयुक्त गोष्टी वाचन करणे हेच होते. कारण पालक सांगतात पुढील भविष्यासाठी जे उपयोगी असेल तेच वाच. मुले हि तेच वाचायचा प्रयत्न करतात. वाचन करणे हे आनंद मिळवणे ज्ञान मिळवणे यासाठी करावे हे पालक विसरून गेलेत. 

      निवेदक समीर गुजर यांनी राजीव तांबे आणि विनायक रानडे यांना विचारले काय वाचले पाहिजे. राजीव तांबे म्हणाले कि जे चांगले ते वाचावे. आता चांगले काय हे प्रत्येकाने ठरवावे. पण वाचन हे आपला अनुभव समृद्ध करतात हे लक्षात ठेवून वाचावे . म्हणजे नक्की काय असे विचारल्यावर ते म्हणाले कि वाचन करताना वेगवेगळ्या भाषेतील वाचन करावे. भारतामध्ये तर कितीतरी भाषा आहेत त्यांच्या  कथा कादंबऱ्या वाचाव्या. त्याशिवाय जगात विविध देश आहेत त्यांच्या भाषेतील हि वाचन करावे. या वाचनाने आपले भाषा ज्ञान समृद्ध होते. असे सांगताना ते म्हणले कि आपली स्वताची भाषेची एक डिक्शनरी असते. या बद्दल सांगताना ते म्हणाले कि काही शब्द असे असतात कि त्याला समान अर्थ असतात जसे कि आग खून मारामारी दंगा हे शब्द ऐकले कि आपण लगेच सतर्क होतो जरी ते आपल्याला उद्देशून म्हणले नसले तरी त्याचा अर्थ आपण आपल्याशी जोडून लगेच काम करतो. 
      विनायक रानडे असे म्हणाले कि आपण सगळे विषय वाचले पाहिजेत जसे जेवणात सगळे रस असले कि जेवण खुलून येते तसे वाचनात सगळे विषय असले कि आयुष्य समृद्ध होते. समीरा  गुजर यांनी ग्रंथ तुमच्या दारी याबद्दल अधिक माहिती सांगावी अशी विनंती विनायक रानडे यांना केली.  ग्रंथ तुमच्या दारी हि एक वाचन संस्कृती वाढीस लावणारी योजना कुसुमाग्रज प्रतिष्टान तर्फे विनायक रानडे यांनी चालू केली. या योजनेत माझे ग्रंथालय हि एक योजना आहे यात डॉक्टर , इंजिनीअर या सारख्या सतत कामात मग्न असलेल्या पण वाचनाची आवड असलेल्या व्यक्तीसाठी २५ पुस्तकांची एक पेटी दिली जाते. आणि दर ३ महिन्यांनी हि पेटी दुसर्या व्यक्तीसोबत बदलली जाते. अशीच एक पेटी माझे ग्रंथालय बाल विभाग म्हणून हि निर्माण केली आहे त्यात इंग्लिश आणि मराठी पुस्तके मिळून २५ पुस्तके दिली जातात. हि पेटी हि २ महिन्यांनी बदलली जाते. त्याशिवाय मोठ्या व्यावसाईक संस्था , गृहनिर्माण संस्था , कारागृह, रिमांड होम या ठिकाणी ठेवण्यासाठी एक १०० पुस्तकाची पेटी दिली जाते हि पेटी दर ४ महिन्यांनी बदलली जाते . इतकी चं माहिती दिल्याबद्दल सगळ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. 

       समीरा गुजर यांनी मुलांना विचारले कि शाळेचे ग्रंथालय कसे असावे. या विषयावर उत्तर देताना मुले म्हणाले कि त्या पुस्तकाची सूची असावी. पुस्तक मुलांना निवडण्याची मुभा असावी,सुट्टीत वाचता येण्यास्ठी सोय असावी , संदर्भ ग्रंथ वापरायची मुभा असावी. 
      त्यानंतर विनायक रानडे म्हणाले कि ग्रंथालय हे सुबक मांडणी असलेले असावे . ग्रंथपाल हा मदत करणारा असावा. त्याच बरोबर त्यांनी गुजरात राज्यातील एक योजना सांगितली त्यात एक महिना विश्वकोश सोबत अशी लहान मुलांसाठी योजना होती त्यात एका खोलीत विश्वकोश मांडून ठेवले असायचे आणि तिथे एक वही ठेवली होती मुलांनी रोज यायचे आणि हवे ते विश्वकोश वाचायचे जे असे २४ तास पूर्ण करतील त्यांना ४८ वह्या दिल्या जायच्या . 
     राजीव तांबे यांनी हि सांगितले कि त्यांनी शाळेत वाचन वाढण्या साठी एक योजना केली होती. जी मुले १०० पुस्तके वाचतील त्यांना पुरस्कार द्यायचा. पुस्तक भूषण, पुस्तक विभूषण असे पुरस्कार होते. जी मुले सांगायची कि पुस्तके वाचली त्यांना पुरस्कार देण्यात येई. पण मग मुलेच त्यांना विचारत  कि तू कोनती पुस्तके वाचलीस रे सांग बरे. मग  मुले खरे सांगत एवढी नाही वाचली कमी वाचली. पण वाचन वाढवण्याचा हा उपक्रम उपयोगी पडला           
         त्यानंतर एक भाषेच खेळ खेळला गेला . त्यात एक वाक्य दिले होते आणि ते पूर्ण करायचे होते सगळी मुले खूप आनंदाने खेळ खेळली आणि मग जेव्हा  ते वाक्य पूर्ण झाले तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. राजीव तांबे असे म्हणाले कि हा खेळ खेळताना  आपण २३ पेक्षा जास्त क्रियापदे शिकलो हे ऐकल्यावर मुले ही चकित झाली. राजीव तांबे म्हणतात कि आपण शिकतो म्हणजे काय तर ते जेव्हा समजून घेतो तेव्हा त्याचा उपयोग होतो. तेव्हा आपण ते व्यवस्थित व्यवहारात वापरू शकतो. हे सांगताना त्यांनी एक अनुभव सांगितला  ते युनिसेफ या संस्थे तर्फे शाळेची तपासणी करायला गेले होते तेव्हा त्यांनी मुलांना काही शब्द लिहायला सांगितले तर ते मुलांना लिहिता येत नव्हते तेव्हा त्यांनी शिक्षकांना विचारले तर ते म्हणले आम्ही फक्त काही शब्द लिहायला शिकवले पण ती अक्षरे  कशी लिहायची ते नाही शिकवले     

         त्यानंतर काही प्रश्न मुलांनी विचारले. वाचन म्हणजे फक्त प्रिंटेड पुस्तक च असावे कि इ पुस्तके वाचन व्हाटस अप ग्रुप वर जे टाकले जाते ते हि वाचन  नक्की काय चांगले ? याचे उत्तर देताना राजीव तांबे म्हणाले कि जे चांगले ते नक्की वाचावे मग ते माध्यम कुठले हि असेल तरी चालेल ते वर्ज्य नाही . पुढे ते असे म्हणतात कि नेहमी चांगले तेच टिकते. 
           विनायक रानडे असे म्हणाले कि प्रिंटेड पुस्तके जास्त परिणाम कारक असतात . पण ते म्हणाले कि   व्हाटस अप ग्रुप सारख्या माध्यमातुन नवी माहिती देता येते. जसे त्यांनी सांगितले कि ते रोज त्यांच्या ग्रुपवर आजचे विशेष टाकतात त्यात शास्त्रज्ञ, लेखक किवा विशेष व्यक्तीची माहिती देतात .   

            मुलांनी असे हि विचारले कि या इतर माध्यमांमुळे प्रिंटेड पुस्तकाचे वाचन कमी होईल का. यावर राजीव तांबे आणि विनायक रानडे म्हणाले नक्कीच नाही. प्रिंटेड पुस्तके वाचून जो आनंद मिळतो तो अबाधित असतो त्याशिवाय त्यातली माहिती चिरंतन असते . इतर माध्यमातील माहिती बदलत राहू शकते . 
            अश्याप्रकारे या यंग तरंग चा कार्यक्रम फार सुंदर रित्या संपन्न झाला .   


https://www.youtube.com/watch?v=sxmVQ8PT3tA


माझे ग्रंथालय बाल विभाग नाशिक कार्यक्रम -नंदू गवांदे caligraphy फोटो

ग्रंथ तुमच्या दारी नागपूर फोटो

७५ वी ग्रंथ पेटी’ प्रदान सोहळा मुंबई पश्चिम विभाग रविवार,४ ऑक्टोबर,२०१५ फोटो

Young tarang programme about reading on DD Sahyadri channel with Mr. Vinayak Ranade & Mr.Rajiv Tambe

बुधवार, ३० सप्टेंबर, २०१५

७५ वी ग्रंथ पेटी’ प्रदान सोहळा मुंबई पश्चिम विभाग रविवार,४ ऑक्टोबर,२०१५ जॉगर्स पार्क,चिकूवाडी,बोरीवली (पश्चिम) सायंकाळी 5 वाजता

७५ वी  ग्रंथ पेटी’ प्रदान सोहळा    
प्रिय समन्वयक,
      मुंबई पश्चिम विभागाच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’योजनेचा ‘७५ वी  ग्रंथ पेटी’ प्रदान सोहळा रविवार,४ ऑक्टोबर,२०१५ रोजी ‘जॉगर्स पार्क,चिकूवाडी,बोरीवली (पश्चिम) येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्याचे ठरले आहे.या निमित्ताने  कुटुंब  रंगलय  काव्यात चा  कार्यक्रमही सादर  होणार आहे.आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी नम्र विनंती आहे.








बुधवार, १ जुलै, २०१५

नागपूर वाचक मेळावा शनिवारी ४ जुलै २०१५ दुपारी ४ वाजता

नागपूर येथे वाचक मेळावा 
शनिवारी ४ जुलै २०१५ 
सप्रेम नमस्कार, 
कुसुमाग्रज प्रतिष्ठानची 
वाचकांना विनासायास, विनामोबदला वाचनासाठी ग्रंथ उपलब्ध करून देणारी 
'ग्रंथ तुमच्या दारी" 
योजना नागपूर व विदर्भात अल्पावधीतच २४ ग्रंथ पेट्यापर्यंत पोहोचली . 
या योजनेतील वाचक, हितचिंतक, देणगीदार व समन्वयकांचा मेळावा 
शनिवार दि. ४ जुलै २०१५ रोजी दुपारी ४ वाजता शक्तीपीठ, रामनगर, नागपूर येथे आयोजित केला आहे. 
नागपूर येथे श्री नरेंद्र जोग (जोग केटरर्स) यांच्या सहकार्याने योजना सुरु आहे 
अवश्य उपस्थित राहावे . 
विनायक रानडे 
9922225777

सोमवार, ८ जून, २०१५

मेघना दर्शन शहा - पुस्तक पेटीने मला काय दिले (निबंध स्पर्धा २०१२)

     पुस्तक पेटी ने मला काय दिले या प्रश्नाचे उत्तर दोन शब्दात देता येईल. ते म्हणजे निखळ आनंद सर्व प्रथम या साखळीत असणाऱ्या सर्वांचे आभार. सर्वांचे उल्लेख करणे जर कठीण वाटत असल्यामुळे एकत्रित आभार.सर्वांचा उल्लेख करणे कठीण वाटत असल्यामुळे एकत्रित आभार.
     घोडबंदर रोड येथील आमच्या वसंत लीला संकुलातील हा उपक्रम सौ अमृता कुलकर्णी चालवितात. जेव्हा मला या उपक्रमाची माहिती कळली तेव्हा क्षणभर खरेच वाटले नाही. कारण कुठलीही गोष्ट फुकटात किवा सवलतीत मिळते म्हणजे त्यात नक्कीच गडबड असते हा जो माझा समज होता तो या उपक्रमाने खोटा  ठरवला. म्हंटले तर लायब्ररी पण फी नाही. फक्त डिपोझिट  हि कल्पनाच आगळीवेगळी आहे. सुरवातीला शंका आली कि हि पुस्तके कशी असतील कोणत्या लेखकांची असतील वगैरे. परंतु या सर्व शंका सौ कुलकर्णी यांच्या घरी टेबलावर व्यवस्थित मांडून ठेवलेली पुस्तके पाहून दूर झाल्या. नवीन पुस्तके, व्यवस्थित प्लास्टिक चे कव्हर घातलेली , बुकमार्क असलेली हे पाहून तर मला जो काही आनंद झाला कि विचारता सोय नाही. कारण मुळात मी अगदी पुस्तक वेडी किंवा वाचन वेडी म्हणा हवं तर वाचनाची भूक अगदी वर्तमानपत्र पासून  ते मासिके , अंक या द्वारे भागवत असते. घरी देखील बऱ्याचश्या पुस्तकांचा संग्रह केला आहे.
     तर गुरुवारी सौ कुलकर्णी यांच्या घरात संध्याकाळी साधारण पणे असे वातावरण असते. पुस्तक प्रेमी स्त्रिया एकत्र येउन उत्सुकतेने पुस्तक बघत असतात. आपल्या पसंतीचे पुस्तक निवडत असतात. अगदी भाजी मंडईतील भाजी निवडतात ना त्याच उत्साहाने त्यांचे हे काम सुरु असते. आवडीचे पुस्तक निवडल्या नंतरच त्यांचे चेहऱ्यावरचे समाधान देखील बघण्यासारखे असते. आपापसात चाललेली चर्चा देखील फक्त पुस्तकांसंबंधी , लेखकासंबंधी असते हे विशेष. काहिंना तर पेटी बदलण्याआधी सर्व पुस्तके वाचून होतील कि नाही याची शंका भेडसावत असते. मला तर हे सर्व अनुभवताना  देखील खूप मजा वाटते.
      पेटी हा शब्द आता तसा फारसा वापरात न येणारा पण नवीन पुस्तक पेटी येणार असे म्हणल्यावर या पेटीमध्ये दडले काय अशी माझी भावना असते. आता पर्येंत च्या सर्वच पेटीतील पुस्तके खूप छान होती. अश्याच चं पुस्तकांची माझी किवा माझ्या मैत्रिणींची अपेक्षा पुढील पेटीतून पूर्ण होईल अशी आशा करते
      पुन्हा एकदा सौ अमृता कुलकर्णी यांचे तसेच या प्रक्रियेतील सर्वांचे आभार
                  धन्यवाद             

मंगळवार, २ जून, २०१५

म वि कुंटे - पुस्तक पेटी ने मला काय दिले - विकास कॉम्प्लेक्स ठाणे (निबंधस्पर्धा २०१२)

      माणसाच्या अंगी चांगले गुण , कला आणि अभ्यासू वृत्ती या अभिजात असाव्या लागतात. एकदा का त्या अभिजात गुणांना वाव आणि प्रोत्साहन मिळाले कि त्यात प्राविण्य  मिळवणे  सहज शक्य होते. जीवनात असे हि होते कि आपल्यात दैवी गुण नसतात तरी हि दुसऱ्याचे पाहून करायची इच्छा होते. तसा प्रयत्नही हि होतो. पण अपेक्षित असे काहीच हाती लागत नाही. मग दुसरा प्रयत्न होतो., तिसरा होतो आणि अशी धरसोड आणि धडपड चालूच राहते असे करताना काही तरी प्राप्त झाले यात समाधान मानून पुढे चालत राहावे. व आनंदात राहावे व आनंदात असावे हि वृत्ती वृद्धिंगत होऊन माणूस प्रयत्नवादी होतो. मिळवण्याची जिद्द अंगी रुजू लागते.
       माझे हि काहीसे असेच असावे. थोडे फार नोकरी मिळण्य इतपत शिक्षण घेतले. पण साहित्य सहवासाची वृत्तीच नव्हती. त्यामुळे लेखन, वाचन , भाषण वगैरे गोष्टी अगदी क्षुद्र होत्या. ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचावी किंवा कोणी दिलेले पुस्तक वाचावे असे कधीच वाटलेच नाही. विकत घेऊन पुस्तक वाचायचा प्रश्नच नव्हता. घरी येणारा पापर लोकांना दाखवण्यापुरता वाचत असल्याचा नुसता देखावा करायचा. चालून फेकून द्यायचा एवढाच वर्तमानपत्राशी संबंध यायचा. संपूर्ण सेवा निवृत्ती पर्येन्तच्या काळात पुस्तकांचा संबंधच आला नाही. पुस्तकांचा संबंध शाळे पुरताच आणि नंतर नोकरीत नियम अगर कायद्याचा संदर्भ पाहण्यापूरताच असायचा. नाही म्हणायला शास्त्रीय संगीताची काही पुस्तके मी वाचून पहिली. संगीताची आवड असल्याने काही शिकता येईल का? या भावनेने ती वाचली गेली होती. अभ्यास किवा ज्ञानवृद्धी करावी किवा गुरुकुलात जाऊन शिकण्याची जिद्द कधी उपजलीच नाही.
      धार्मिक वातावरणात मी लहानाचा मोठा झालो. आमचे घर म्हणजे घर कम देऊळ होते. त्या अनुषंगाने शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम वर्षभर चालू असायचे काही कीर्तनकार, प्रवचनकार, संगीतकार उत्तम दर्जाचे असायचे. त्यांची कीर्तने, प्रवचने व संगीत मी शेवट पर्येंत मी ऐकत असे . अधून मधून एखाद्या विषयावर वाद विवाद प्रतियोगिता व्हायच्या. त्या मला फार आवडायच्या. या वरून चांगले ते ऐकणे. आणि त्या विषयाचे थोडे फार चिंतन मनन करणे हा अभिजात गुण असावा असे वाटते.
       सेवा निवृत्ती नंतर काय करावे हा एक मोठा यक्ष प्रश्न प्रत्येक समोर असतो. आमच्या गृह संकुलाचे प्रशस्त आवार आहे. त्यामुळे वृद्धांना सकाळ संध्याकाळ चालण्याचा व्यायाम व्यवस्थित करता येतो. नंतर श्रम परीहारास्त्व क्लब हाउस मध्ये पंधरा ते वीस वृद्ध तास दीड तास गप्पा मारत बसतात. डॉक्टर ,व्यापारी ,इंजिनियर अश्या सर्व स्तरातील उच्च विद्या विभूषित विद्वान मंडळी एका ठिकाणी जमल्यावर सगळ्याच विषयावरचे बौद्धिक विचार मंथन चालू असते. यात तुम्ही कधी तरी तुम्ही हे पुस्तक वाचले का असे हि साहित्यिक विचार मांडले जातात. अश्या चर्चांमध्ये भाग घेण्यास स्वत:त कोणत्याही विषयावर बोलण्याची क्षमता व पांडित्य असावे लागते. त्यामुळे कमी बोलणारे कमी व माझ्या सारखे श्रोते जास्त असतात. न बोलून वाया  काहीच जात नाही. उलट ज्ञानात भर पडते. व न पटणाऱ्या गोष्टींवर आपण मनातल्या मनात विचार करीत असतो. वैयक्तिक मतभेदांवर वाद घालून वितंड वाद घालण्यापेक्षा मौन हे उत्तमच.
       एक दिवस कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे "ग्रंथ तुमच्या दारी" या योजने अंतर्गत वाचनालय आमच्या संकुलात सुरु झाले. अर्थात आम्ही सर्व त्याचे सभासद हि झालो. आपल्या दारी आणि तो हि अगदी फुकट आलेली संधी कोणी सोडतो! माझ्या मनाने ठरवले हि पुस्तके वाचून बघावी. त्या प्रमाणे गीतेत म्हंटल्या प्रमाणे "कर्मण्ये व धिकारस्ते…. " आपल्या मेंदूत किती प्रकाश पडतो याची अपेक्षा न करता मिळेल ते पुस्तक घ्यायचे आणि वाचायचे असा संकल्प करून माझा साहित्य वाचनाचा प्रवास सुरु झाला. दर बुधवारी पुस्तक आणायचे आणि पुढच्या बुधवारी परत करून दुसरे आणायचे असा वाचन क्रम अस्तित्वात आला.
      अल्प अवधीत च बरीच पुस्तके वाचली. चरित्र ग्रंथ , कादंबरी, व्यंगात्मक कथा, प्रवास वर्णने इत्यादी अनेक विषयावर सरसकट वाचीत राहिलो. हे सगळे वाचताना बऱ्याच गोष्टी मला हळू हळू समजू लागल्या. न समजणाऱ्या गोष्टींचा, तत्वांचा गूढ अर्थ लक्षात येऊ लागला. भारदस्त शब्दांचे अर्थ , भावार्थ कळू लागले. मनातल्या विचारांना दिशा मिळू लागली. प्रत्येक लेखकाचे विचार मांडण्याचे स्वतंत्र तंत्र असून आपले विचार योग्य आहेत. हे पटवून देण्याचे कसब त्यांना साध्य झालेले आहे असे समजते. याचे बरोबर कि त्याचे बरोबर याचा विचार करण्यास वाचक प्रवृत्त होतो. त्याचा परिणाम म्हणजे माझ्या सारखा हि विचार मंथनात रस घेऊ लागतो. वाचताना टिपणे घेऊन ठेवू लागतो. कदाचित भविष्यात उपयोगी पडतील या विचारांनी.
         काही पुस्तकांचा ठसा मनावर कायम उमटतो. साने गुरुजी सात्विक वातावरणात नेतात, पु ल देशपांडे , व पु काळे हास्याची कारंजी उडवतात. प्रवीण दवणे , वि स खांडेकर , मिरासदार वगैरे व्यक्तिरेखांचे अचूक वर्णन दर्शवतात. ऐतिहासिक पुस्तके वाचताना त्या काळात वावरू लागतो. आणि त्या प्रसंगाचे आपण साक्षीदार आहोत असे वाटून आपले रक्त सळसळू लागते. रवींद्र भटांचे "भेदिले सुर्य मंडळा" वाचून  प्रभू रामचंद्रांचे प्रत्यक्ष दर्शनाचा आनंद प्राप्त झाला. अध्यात्मा बरोबर शारीरिक बळ असणे समर्थांना जरुरी वाटले. म्हणून मारुतीच्या उपासनेचा समर्थ रामदासांनी प्रचार केला. कालानुरूप जन जागृतीची मशाल पेटवण्याचे महान कार्य त्यांनी केले. प्रत्येक विषयाचे ज्ञान प्राप्त करण्याची समर्थांची जिद्द पाहून मन थक्क होते.
          मनोरंजनात्मक दृष्टीने पुस्तकांचे वाचन करताना त्यात तत्वज्ञान भरलेले आहे ते कळले. लिहणाऱ्या मंडळींची विद्वत्ता पाहून ती सर्व तपस्वी ऋषी आहेत अशी श्रद्धा निर्माण होते. वीक एन्ड ला निसर्गाच्या सानिध्यात मौज मजा करण्यास आपण जातो. खूप आनंद येतो. मन उल्हसित होते.  आहा किती छान अशी भावना निर्माण होते. पण एक लेखक निसर्गाच्या बारकाव्यांचे अफलातून वर्णन असे लिहितो कि प्रत्यक्ष न जाता हि आपण तिथल्या गारव्याचा अनुभव घेतो. म्हणून च वाचनाची चटक लागते. अभ्यासू वृत्ती येते. निदान माझ्या वृत्तीत तरी नक्कीच फरक पडलेला आहे. ग्रंथ आणि साहित्याचा मोठा खजिना उपलब्ध आहे. वाचून ज्ञानात भर घालावी. निदान थोर संतानी आणि साहित्यकारांनी अथक प्रयत्नांनी प्राप्त केलेल्या आणि सांगितलेल्या गूढ तत्वज्ञानाचे सर समजले तरी जीवन पावन होईल असे मला वाटते.
         मनातले विचार लिखाणातून कसे व्यक्त करावे. मुद्देसूद मांडणी कशी करावी .लहन सुबक वाक्ये कशी लिहावी.  क्रम व ओघ व्यवस्थित ठेवण्याचे भान असावे. शक्यतो साधे आणि योग्य शब्दांची गुंफण असावी. अश्या मुलभूत गोष्टींचा अभ्यास करण्याची इच्छा  होऊ लागते. माझे वाचन वाढत गेले तसे आपले विचार लिहून व्यक्त करता येतील असे मला हि वाटू लागले.
        परवाच आमच्या केंद्र प्रमुखांनी निबंध स्पर्धा आयोजित केल्याचे कळवले . निबंध म्हणजे काय व तो कसा लिहायचा हे मला उमगलेले नाही. आपले विचार निबंध समजून प्रस्तुत करण्याची मला प्रेरणा झाली. आयुष्यात पहिल्यांदा निबंध स्पर्धेत भाग घेत आहे. त्याचे श्रेय मी पेटीतल्या पुस्तकांना देतो. कसला हि विचार न करता सुचेल तसे लिहित गेलो. व हा निबंध तयार झाला. पुस्तक पेटीने मला काय दिले ते मन मोकळेपणाने जमेल तसे प्रस्तुत केले आहे. चूक कि बरोबर हे काळच ठरवील.                                                                             
                                         

गुरुवार, २८ मे, २०१५

ग्रंथ तुमच्या दारी मुंबई (पूर्व ) गेट टुगेदर ९ मे २०१५ महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड पश्चिम वृत्तांत

        ग्रंथ तुमच्या दारी मुंबई पूर्व विभागाचे समन्वयक आणि देणगीदार यांच्यासाठी चे गेट टुगेदर ९ मे २०१५ रोजी सुविधा शंकर गोखले सभागृह, महाराष्ट्र सेवा संघ (मुलुंड पश्चिम ) येथे संध्याकाळी ७.३० वाजता आयोजित केले होते.
या कार्यक्रमात व्यासपीठावर श्री. चंद्रशेखर वझे, श्री. विनायक रानडे, श्री. जयप्रकाश बर्वे आसनस्थ होते. या कार्यक्रमाचे निवेदन सौ. स्मिता जोशी यांनी केले. सर्व प्रथम या योजनेची माहिती त्यांनी दिली. व त्यानंतर महाराष्ट्र सेवा संघाबद्दल माहिती ध्वनी चित्र फीत सादर केली गेली. श्री चंद्रशेखर वझे यांनी श्री विनायक रानडे यांचा सत्कार केला.
   श्री  चंद्रशेखर वझे यांनी भाषण केले. ग्रंथ तुमच्या दारी या योजनेची सुरवात कशी झाली. त्यांनी विनायक जोगळेकर यांचे आभार मानले. या योजनेची सुरवात होण्यासाठी ते कसे सहाय्यभूत झाले ते सांगितले. त्यांच्या सहभागामुळे हि योजना १७ सेंटर पर्येंत वाढवता आली. असे हि सांगितले.
   त्यानंतर उपस्थित देणगीदार आणि समन्वयक यांचा सत्कार श्री जयप्रकाश बर्वे  यांच्या हस्ते झाला.

देणगीदार -    श्री. विद्याधर हरी गुर्जर ,श्री संजय आणि सौ स्मिता जोशी ,श्री विजय वझे

समन्वयक  -श्री. पेठे , श्री दत्त डोंगरे , सौ स्नेहल वैद्य , श्री भिडे . श्री खरे ,

सौ सुषमा पाटणकर (महाराष्ट्र सेवा संघ ग्रंथालय अध्यक्ष)

या सत्कारानंतर श्री दत्ता डोंगरे यांनी आपले मनोगत वक्त केले.या उपक्रमामुळे लोकसंपर्क वाढला त्यांच्याबद्दल सांगताना श्री विनायक जोगळेकर म्हणाले कि एवढी  जड पेटी त्यांनी स्वत:हून उचलून घेऊन गेले. हि फार कौतुकास्पद बाब आहे.श्री दत्ता डोंगरे असे हि म्हणाले कि मला जी जबाबदारी दिली जाईल ती मी योग्य रित्या पार पडण्याचा प्रयत्न करीन. श्री. कुलकर्णी म्हणाले कि ते ह्या पेटीतील पुस्तके कार्यालयात घेऊन जातात आणि त्यांना तिथे हि छान प्रतिसाद मिळतो.
    श्री विनायक रानडे यांचे भाषण झाले. त्यांनी येथील प्रतिसादाबद्दल विनायक जोगळेकर आणि त्यांच्या सहकार्यांचे कौतुक केले. त्याशिवाय महाराष्ट्र सेवा संघ आणि श्री चंद्रशेखर वझे यांचे हि अभिनंदन केले. त्यांनी या योजनेची सुरवात कशी झाली याची थोडक्यात माहिती दिली आणि हि योजना ५ वर्षात देशात च नव्हे तर परदेशात हि पोचली आहे असे नमूद केले. त्यांनी विविध ठिकाणचे अनुभव सांगितले आणि ते म्हणाले कि हि योजना मुंबई पूर्व या विभागात अजून वृद्धिंगत होवो. त्याशिवाय माझे ग्रंथालय, माझे ग्रंथालय बाल विभाग या योजनेची हि माहिती त्यांनी दिली. ते असे हि म्हणाले कि पुढच्या वेळी हे   गेट टुगेदर अजून मोठ्या प्रमाणावर साजरे व्हावे त्यात समन्वयक , वाचक आणि देणगीदार हे हि सामील व्हावेत आणि त्या कार्यक्रमात वाचन विषयक कार्यक्रम सदर व्हावेत.
      त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघ येथील श्री खरे यांनी नमूद केले कि वाचकांचे इ मेल , whatsapp किवा मोबाईल नंबर घेऊन त्यांना योग्य माहिती पुरवली जावी. श्री विजय वझे म्हणतात कि हे काम ऑनररी  करणाऱ्यांचा योग्य सत्कार व्हावा. या योजनेमुळे जी वाचनसंस्कृती वाढीस लागत आहे त्यामुळे यात काम करणाऱ्यांचे अभिनंदन. या च वेळी श्री डी व्ही कुलकर्णी यांनी सांगितले कि त्यांचा भाऊ जो इंग्लिश माध्यमातून शिकला होता तो आता या योजनेमुळे मराठी वाचन करू लागला आहे.
     या वेळी श्री दीपक बालगी - केटरर्स - महाराष्ट्र सेवा संघ यांनी देणगी देण्याचे आश्वासन दिले.
श्री चंद्रशेखर वझे यांनी त्यांच्या मित्रातर्फे एका पेटीच्या देणगीचा चेक श्री विनायक रानडे यांना सुपूर्त केला. या कार्यक्रमाची सांगता सौ स्नेहल वैद्य यांच्या पसायदानाने झाली
    हा कार्यक्रम खेळीमेळीत पार पडला. या कार्यक्रमासाठी श्री विनायक जोगळेकर, श्री विजय वैद्य , सौ स्मिता जोशी आणि अन्य मान्यवर व्यक्तींचे सहाय लाभले.

https://youtu.be/A4vsbhkZ8ag  
                      

मंगळवार, २६ मे, २०१५

माझे ग्रंथालय बाल विभाग ठाणे लोकसत्ता २६मे २०१५

उषा भालचंद्र येवले -ब्रम्हांड ठाणे - पुस्तक पेटी ने मला काय दिले (निबंध स्पर्धा २०१२)

     पुस्तके हि ज्ञान आणि माहिती देतात. नव्या पिढीवर संस्कारही करतात. तुम्ही कुठली पुस्तके वाचतात हे बघून तुमच्या ज्ञान आणि विचारांची खोली किती आहे याची कल्पना येते. तसेच पुस्तक वाचन हा मनासाठी उत्तम व्यायाम आहे. पुस्तक वाचनामुळे आपले अनुभव विश्व आपली कल्पनाशक्ती आणि शब्दसंपत्ती वाढते. आणि स्वतंत्र पणे विचार करण्याची क्षमता वाढते. वाचन केल्याने माणसाची दृष्टी आणि बुद्धी बदलत असते. बुद्धीला परिपक्वता येते. खोचक पणाची वृत्ती लोप पावते. वाचनाने प्रज्ञा बुद्धी जागृत होते. मन शांत होते आणि वैचारिक शक्ती वाढते.
       अर्थात या सर्व गोष्टी खऱ्या असल्या तरी प्रत्येक वेळेस हि पुस्तक खरेदी करणे शक्य नाही. मग यासाठी पर्याय म्हणजे वाचनालय मात्र जवळ पास वाचनालय नसल्यास त्याला पर्याय पुस्तक पेटी आणि हीच संकल्पना मनात ठेवून श्री व सौ जोशी यांच्या पुढाकाराने आमच्या ब्रम्हांड परिसरात कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे आणि ठाणे जनता सहकारी बँकेच्या सौजन्याने पुस्तक पेटी या उपक्रमाची सुरवात केली गेली. १०० पुस्तकांची १ पेटी ३ महिन्यांनी बदलली जाते. या १०० पुस्तकांच्या एका पेटीत आत्मचरित्र, कथा कादंबऱ्या , प्रवास वर्णन व विविध वांड:मय प्रकारातील पुस्तकांचा खजिनाच असतो.
         १०० पुस्तकांची एक पेटी हि ब्रम्हांड मधेच स्थाईक झालेल्या सौ वैदेही जोशी यांच्याकडे दिली आहे. या पुस्तक पेटीचे सभासदत्व मायबोली महिला मंडळाच्या सभासदांना देण्यात आलेले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे आठवड्यातून एकदा बुधवारी संध्याकाळी ४-७ या वेळेत पुस्तके दिली घेतली जातात. या मुळे आम्ही सर्व महिला सभासद एकत्र येतो या पुस्तक पेटीत विविध लेखकांची तसेच विविध विषयांची पुस्तके उपलब्ध असल्याने आमच्यात वाचनाची गोडी निर्माण झाली. घराजवळ च असल्याने व वार्षिक अनामत रक्कम फक्त २०० रुपये असल्याने आर्थिक दृष्ट्या देखील परवडण्यासारखे आहे. त्यामुळे आमचा वाचनाचा छंद  चांगल्या प्रकारे जोपासला जात आहे. आणि याचा फायदा कुटुंबातील सर्व सभासदांना होतो. घरात पुस्तक बघून सगळ्यांची वाचायची इच्छा निर्माण होते. व सर्वचजण पुढच्या आठवड्यातील बुधवारची वाट बघतात.
         या पुस्तक पेटी द्वारे माझ्या ज्ञानात भर पडतेच आणि याचा सर्वात जास्त फायदा मला आमच्या मायबोली महिला मंडळाच्या मिटींगमध्ये होतो. या मिटिंग मध्ये दर महिन्याला "मी वाचलेले पुस्तक " यावर थोडक्यात भाष्य करायचे असते व त्या विषयावर चर्चा देखील होते.
अश्या प्रकारे या पुस्तक पेटीने माझी ज्ञानाची लालसा आणि जिज्ञासा वाढवली आहे. आता तर हि पुस्तक पेटी माझ्या रोजच्या सवयीचा भागच झाली आहे. अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम समाज बांधवाना दिलेला संदेश थोड्या फार प्रमाणात माझ्याकडून पाळला जातो. "वाचाल तर वाचाल"                               

उषा गायकवाड - पुस्तक पेटीने मला काय दिले, मित्तल पार्क रघुनाथ नगर ठाणे (निबंध स्पर्धा २०१२)

    "ग्रंथ हेच गुरु" "वाचाल तर वाचाल " अश्या वाक्यांचे संस्कार होत असलेल्या पिढीतील मी एक प्रौढ महिला. लहानपणापासून वाचनाचे जबरदस्त वेड. रोजच्या वर्तमानपत्र पासून कथा कादंबरी, चरित्रे, ललित लेख , वैज्ञानिक साहित्य अश्या सर्व प्रकारच्या वाचनाची आवड आज पर्येंत प्रयत्नपूर्वक जोपासली होती. त्यातच कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे ग्रंथ तुमच्या दारी या योजने अंतर्गत वाचनासाठी आणखी एक दालन उघडते आहे समजल्यावर ताबडतोब नाव नोंदणी करून पुस्तक पेटीचा लाभ घेण्यास सुरवात केली .
        आजच्या धावपळीच्या जीवनात वाचानासाठी वेळ देणे जड जातेय . त्यातच कामाशी संबंधित वाचन नाईलाजाने करावेच लागते. एका जागी शांत पाने वाचन करणे दुरापास्त ! अश्या परिस्थितीत कुसुमाग्रज प्रतिष्ठानने पुस्तक सहज उपलब्ध होतील अशी व्यवस्था करून सामाजिक ऋण फेडण्याचा केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद!पुस्तक पेटीने वाचनातून माझे अनुभव विश्व समृद्ध केले. इथे नाना विषयावरील अनेक पुस्तक वाचावयास मिळाली. बाबू मोशाय यांचे सिने सृष्टीवरील अनुभव , स्टीव जॉब्स यांचे चरित्र वाचावयास मिळाले. इथेच मला मैक्झीम गोर्कींची "आई" भेटली. एस एम मुश्रीफ सारख्या पोलिस अधिकाऱ्याने लिहिलेल्या "हु किल्ड करकरे" मधून मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यामागिल आणखी एक झगझगीत वास्तव समोर आले.
        डॉक्टर दातारांनी "दोन तात्या" म्हणजे स्वा. सावरकर व कुसुमाग्रज यांची नव्याने ओळख करून दिली. डॉक्टर फोंडक्यांच्या "सुगरणीच्या विज्ञानातून" वैज्ञानिक जग उलगडले तर प्रतिभा रानड्यांच्या "फाळणी ते फाळणी " माधून देशाच्या राजकारणाचे एक सत्य उघड झाले! इथेच मला वीणा गवाणकरांचा "कार्वर" भेटला. व एहेच पुलंच्या "गोतावळ्या" बरोबर परिचय झाला. जीवनाच्या अनेक पैलूचा उलगडा करणाऱ्या कथा व कादंबऱ्या यांचा खुराक तर भरपूर मिळाला.
        याशिवाय अनेक अप्रत्यक्ष फायदे होतेच. आजच्या बंद फ्लॅट संस्कृतीत परिचितांचा संपर्क कमी! पण  देवाण घेवाण करण्याच्या वेळात अनेक शेजारी पाजारी भेटू लागले. नवीन ओळखी होऊ लागल्या. सुख दु:खाची बोलणी होऊ लागली. आवडलेल्या पुस्तकांसंबंधी माहितीची देवाण घेवाण होऊ लागली.
       आमची पुस्तक पेढी चालवणारे डॉक्टर गोखले , श्रीमती गोरे अश्या सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या व्यक्तींची ओळख झाली.
       अश्या अनेक गोष्टी पुस्तक पेढीने दिल्या. तरीही एक खंत जाणवते. आजची इंग्रजाळलेली टेक्नो सैव्ही तरुण पिढी मात्र या उपक्रमापासून   खूपच दूर आहे. मराठी साहित्य या पिढीसाठी अजूनही अनोळखी आहे . जोपर्येंत पुस्तक पेढी त्यांच्या पर्येंत पोचत नाही तो पर्येंत साहित्यातून होणारे संस्कार त्यांच्यावर होणार नाहीत आणि    तो पर्येन्त पुस्तक पेढीचे उद्धिष्ट १००% साध्य होणार नाही    

कुमुद अवचट मित्तल पार्क ठाणे ( पश्चिम) - पुस्तक पेटी ने मला काय दिले -(निबंध स्पर्धा )

   खूप दिवस वाटत होते कि कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे जी पुस्तक पेटी योजना सुरु झाली आहे तिच्याशी आपला संपर्क व्हावा . तो दिवस आमच्या मित्तल पार्क या सोसायटीत सुरु झाला आणि आपली जी मनापासूनची इच्छा होतीय ती पूर्ण होते आहे म्हणून खूप खूप आनंद झाला.
    उद्घाटन झालं आणि पुस्तक पेटी योजना सुरु झाली. या प्रकल्पाचे प्रणेते विनायक रानडे यांनी हि योजना सुरु करण्याची इच्छा हेतू हे स्पष्ट केले . त्यामागची त्यांची वाचनाला प्रवृत्त करण्याची तळमळ समजली . स्वत आर्थिक झीज सोसून कोणाकडून कोणतीही वर्गणी न घेता केवळ वाचनाची सवय वाचकांना लागावी या उद्देशाने हे वाचनालय सुरु झाले. मित्तल पार्क व प्रकृती यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पाचा प्रारंभ झाला.
विनायक रानडे यांनी अगदी सोप्पा आणि ओघवत्या भाषा शैलीत आपले मनोगत मांडले. हा सगळा वाचनाचा परिणाम. अंग झोकून देऊन केवळ वाचनासाठी प्रवृत्त करणे हि त्यांची सेवाभावी वृत्ती या तरुणांमध्ये निर्माण झाली हे पाहून आम्हा ज्येष्ठांचे मन भारावून गेले.
         महाराष्ट्रातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज हे खरोखर आपले सर्वांचे आदर्श आहेत, त्यांच्या सामाजिक कविता आजही आपल्या अनेकांच्या मुखोद्गत आहेत. आकाशातील एका ताऱ्याला सुद्धा कुसुमाग्रजांचे नाव हा त्यांच्या साहित्याचा केवढा मोठा गौरव आहे.
        विनायक रानडे यांच्या या उपक्रमाला सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला. पेटीतील पुस्तके हि अगदी उत्तम बांधणीची आहेत. विविध लेखकांचे , विविध साहित्य प्रकार , विविध विषय अशी हि पेटी अतिशय वैविध्य पूर्ण अशी आहेत. मुख्य म्हणजे हि पुस्तके आम्हाला हाताळायला मिळाली. मैक्झिम  गोर्कि चे आई, सावरकरांचे सहा सोनेरी पाने , पु ल , मिरासदार , चि. विं ची  विनोदी पुस्तके , शरद दळविंचे एकलव्य, नर्मदा परीक्रमेचे अनुभव लिहिलेलं भारती ठाकूर यांचे आगळे वेगळे पुस्तक , अनिल अवचट यांचे समाजातील तळागाळातील लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष राहून केलेलं समाजासमोर मांडण्याचे धाडस त्यांच्या कथा व्यथा हे सर्व आम्हास वाचावयास मिळाले . खूप खूप समाधान झाले . ज्या पुस्तकांच्या प्रतीक्षेत आम्ही कित्येक दिवस होतो. ती पुस्तके निवांत वाचनासाठी प्रवृत्त करणारी , अंतर्मुख करावयास लावणारी आहेत.
          खरोखर खूप आनंद आणि समाधान मिळाले . पुस्तकांची निवड खूप विचारपूर्वक झालेली आहे. या वाचानालायामुळे आम्हाला इतर वाचनालये बंद करावीशी वाटू लागले आहे.
          आम्हा ज्येष्ठ नागरिकांना तर हा अनुभव आनंदाचा होता. कारण आम्हाला वेळ भरपूर उपलब्ध आणि पुस्तकांच्या देवाण घेवानासाठी कोठे लांब जायला नको
           आमचा दृष्टीकोन व्यापक झाला. अनेकांची ओळख झाली. विचारांची देवाणघेवाण वाढली. पुस्तकांच्या अभिप्रायावरून तर ते पुस्तक केव्हा वाचू अशी उत्कंठा वाढली. सर्वात महत्वाचे म्हणजे पुस्तकातील बुकमार्क ते इतके बोलके आहेत कि वाचनालये म्हणजे देवालये समाजातील लोकांची मनेच त्यात उतरली आहेत (म्हणजे पाने फाडू नये वगैरे ) पुस्तकाला लहान बाळाची उपमा उत्तमच बाळाप्रमाणे उत्तम संगोपन , हे मनाला खूप भावले.
       डॉक्टर गोखले हि इतकी महान व्यक्ती हे योजनेमुळेच समजले बुकमार्क बद्दल किशोर पाठक यांना धन्यवाद
       पुस्तक पेटी योजनेला धन्यवाद. अश्याच नवीन योजनांचा अवलंब इतरांनी त्यांच्या पासून घ्यावा, प्रेरणा घ्यावी आणि अश्या प्रकल्पांचे उदंड पीक येवो त्या दीर्घ काळ टिकाव्या हि ईश्वर चरणी प्रार्थना.             
  
              

सोमवार, २५ मे, २०१५

ग्रंथ तुमच्या दारी दौरा २६ मे २०१५ मुंबई

ग्रंथ निघाले . . . .  मुंबई २६ मे २०१५माझं ग्रंथालय , बालविभाग मुंबई येथे नविन  १२ ग्रंथ पेट्या . बालविभागाच्या ठाणे आणि मुंबई एकंदर ४० पेट्या , पुणे १६ तर नाशिक ९० ग्रंथ पेट्या . इयत्ता २ री ते ८ वी च्या मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ पेट्या प्रत्येकी १५ मराठी व १० इंग्रजी अशी एकूण २५ पुस्तके दर दोन महिन्यांनी आपापसात बदलणे … सभासद होण्यासाठी देणगी मुल्य . साहित्याचा खजिना असलेली फिरती ग्रंथ पेटी मुलांना वाढदिवसाला भेट देण्यासाठी ऊतम . अधिक माहितीसाठी संपर्क करा. विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान


शुक्रवार, २२ मे, २०१५

लक्ष्मी रवींद्र आचरेकर - पुस्तक पेटीने मला काय दिले. वर्तक नगर ठाणे (निबंध स्पर्धा २०१२)


पुस्तक पेटीने मला काय दिले? हा निबंधाचा विषय होऊ शकतो का? मला पडलेला प्रश्न तुम्हाला हि पडू शकला असता खरे ना? पण मी म्हणते या विषयावर एक शोध निबंध हि होऊ शकतो.
   खरेच मला या पुस्तक पेटीने काय दिले यापेक्षा किती दिले यावर लिहायला २५० शब्दाची मर्यादा खूप कमी आहे.
   वयाच्या ७२ व्या वर्षात पदार्पण करताना खूप करायचे राहून गेले हि खंत मनात होतीच. दुपारचा उदासवाणा वेळ , संध्याकाळची सरती कातर वेळ सारच कसे हुरहूर अनामिक एकटेपणा जाणवणार.
    पण ग्रंथ तुमच्या दारी ची हाक कानावर आली. सर्व सोपस्कार पूर्ण होऊन पेटी आमच्या मंदिरात डेरेदाखल झाली. आणि मनाची आणि शरीराची हि तगमग शांत  झाली. किती आणि कोणते वाचू ?अलिबाबाची गुहाच जणू हाती आली. वांड:मायाचे विविध प्रकार गुण्या गोविंदाने पेटीतल्या १०० ग्रंथात विराजमान झाले होते. हि विविध ग्रंथ संपदा जणू सांगत होती हे अक्षर धन तुमच्यासाठी ज्या एका पुस्तक वेड्याने खुले केले ते स्वीकार. मनात सलणारा एकटेपणा मरगळ दूर करून पुन्हा एकदा जगाच्या ह्या पसाऱ्यात  मोकळेपणाने श्वास घे.
    " पुस्तका  सारखा दुसरा सच्चा मित्र नाही" हे थोरा मोठ्यांचे वचन लहानपणापासूनच पाठ होते. पण या मित्राची पाठ राखण उमेदीच्या काळात , लौकिक सुखाच्या शोधात कधी भासली नाही.पण काळाच्या ओघात कृतांत कर कमाल , ध्वज जर दिसो लागले याची जाणीव  देह मनावर उमटू लागली आणि खर्या मित्राची ओढ जाणवली
      या पुस्तक मित्राने मला जगाच्या कानाकोपऱ्यातील यात्रा घडवली. पृथ्वीच्या गोलात जग समाविष्ट झालेले पाहतो पण ह्या ग्रंथांनी देश परदेश तेथील संस्कृती, लोक, माणुसकी, निर्दयता यांचे समग्र दर्शन घडवले जगाच्या कोणत्या हि देशात जा प्रत्येक स्थळी माणसाचे माणूसपण मत्सर , हेवेदावे प्रेम मैत्री , ऋणानुबंध मानवी मनाचे तरल भाव विश्व   पराकोटीचा द्वेष   विस्मय चकित करणारे देश प्रेम सारखेच , फक्त भाषा वेगळी. पण त्यातूनच झिरपणारा माणुसकीचा एक सूक्ष्म निर्झर मला सापडला. "men are not born they are made" या वचनाचा अर्थ लावता आला. "अवघे विश्वची माझे घर" हा प्रत्यय पुस्तकाच्या प्रवास वर्णनातून मला   सापडला.
      तळागाळातला अति क्षुद्र समजला जाणारा माणुस त्याची न संपणारी दु :खे यातना आणि भ्रष्ट सत्तालोलुप धन कोडग्या माणसांची न संपणारी धन विषयक लालसा यातली सीमा रेषा यामध्ये मी चक्रासारखी फिरत राहिले हे जीव घेणे सत्य या माझ्या पुस्तक पेटीतल्या मित्रांनी निदर्शनास आणून दिले. मानवतेच्या कक्षा अधिकच गडद होत गेल्या. वय झाले म्हणून काय झाले ? समाजाकरिता करता येण्यासारखे खूप काही  आहे  हे त्या पेटीने मला शिकवले.
       पण त्याच बरोबर जीवन किती सुंदर आहे जीवनातील प्रत्येक क्षण हा अखरेच क्षण आहे असे समजून प्राप्त परिस्थितीत आनंद माना हा संदेश ह्या पुस्तक मित्रांनी दिला.     
        जीवन मरणाच्या सीमा रेषेवर उभी असणारे माझ्यासारख्या असंख्य स्त्री पुरुषांना हि पुस्तक रुपी पणती म्हणते तुमचे सर्व सुख दु;ख भावविश्व , आशा निराशा या पुस्तकांच्या प्रकाशात शोध
        हे दान मला पुस्तक पेटी ने दिले.  
                       

विभावरी दांडेकर पोखरण रोड नंबर -२ ठाणे - मला पुस्तक पेटीने काय दिले (निबंध स्पर्धा २०१२)

कुसुमाग्रज प्रतिष्ठानची " ग्रंथ तुमच्या दारी " हि जाहिरात वर्तमानपत्रात वाचली आणि माझ्या आनंदाला उधाण आले. एखाद्यापुढे पंच पक्वानांचे ताट ठेवावे असे वाटले. डोंबिवली हून ठाण्याला राहायला आल्यामुळे वाचनाचा आणि माझा संबंध संपल्यासारखाच झाला होता. नवीन शहर आणि नवीन जागा त्यामुळे कोणाशीही फारशी ओळख नाही. वाचनालये घरापासून फार दूर व गैरसोयीच्या ठिकाणी असल्यामुळे वाचन करणे जमत नव्हते. त्याच दरम्यान हि जाहिरात वाचल्यामुळे खूप आनंद झाला.पाठपुरावा करून फेब्रुवारी २०१२ मध्ये माझ्याकडे केंद्र सुरु झाले. त्या दिवशी कुसुमाग्रज च माझ्या घरी आल्यासारखे वाटले. आज ते आपल्यात नाहीत पण साहित्य रूपाने मरणोत्तरीही ते कीर्ती रूपाने जन मानसात आढळ स्थान मिळवून बसले आहेत. प्रत्येक पुस्तक पेटीत शंभर पुस्तके असतात व साधारणपणे चार महिन्यांनी पेटी बदलून दुसरी पेटी केंद्रात पोचोवली जाते.
       शंभर पुस्तकांच्या रूपाने साधारण पणे  नव्वद एक लेखक आपल्या घरी येतात.(वाचायला मिळतात). कारण काही लेखकांची दोन - चार पुस्तके असतात. पुस्तकांचे रूप देखणे असते. नवीन पुस्तके, पुस्तक बांधणी  करून (बाईंडिंग )योग्य ते शिक्के मारून पुस्तकाचे स्वरूप अतिशय सुंदर केलेले असते. पुस्तकांची निवड फार चोखंदळ पणे केल्याचे जाणवते. विविध विषय, जुन्या लेखकांप्रमाणे नवीन नवीन लेखक वाचकांच्या वाचनात कसे येतील ह्याचा प्रामुख्याने विचार केलेला दिसतो. त्यामुळे ज्ञान , कला , विज्ञान , भाषा यांचे सखोल ज्ञान मिळते.  प्रत्येकाला आपल्या आवडीप्रमाणे पुस्तक निवडून वाचता येते.
       पेटीतील विविध पुस्तकांच्या वाचनामुळे मानवी भाव भावनांचे विलोभनीय दर्शन घडले. माणसाचा जगण्यासाठीचा संघर्ष त्यात आलेले यशापयश आणि अपयश पचवून झुंजून पुढील आयुष्याची वाटचाल अधिक नेटाने करण्याचा निर्धार जाणवला. अपंगत्वावर मत करून स्वत: आयुष्य  कसे घडवावे याचा वस्तुपाठ मिळाला. (रुद्रवर्षा - वसंत पागीकर) प्राक्तनात असलेली नोकरी व तिच्या अनुषंगाने मिळणारी वागणूक (फाशीचा साक्षीदार- ज्योती पुजारी) (झुलवा- उत्तम बंडू तुपे ) यांच्या कादंबरीवरून जोगती जोगतीणीच्या नशिबी आलेली फरपट पाहून मन व्यथित होते. अर्थात आनंददायी पुस्तके हि आहेत. त्यांच्या वाचनाने जीवनाच्या वेगळ्या पैलूंचे दर्शन घडते. नावे आणि उदाहरणे तरी किती देणार. वि स खांडेकर , पु ल देशपांडे , साने गुरुजी , प्रवीण दवणे , रणजीत देसाई, रेखा बैजल, प्रकाश संत हेच नव्हे तर अनेक नव्या जुन्या लेखक लेखिकांच्या लेखनाने मनात सुख दु:खाचे कल्लोळ उभे केले. आणि समजले कि जीवन जे आयुष्य वाट्याला आले आहे ते जास्तीत जास्त चांगलेपणाने कसे निभावता येईल .  दुसऱ्याला त्रास न होता स्वतः अधिकाधिक लोकाभिमुख होऊन कोणत्याही परिस्थितीत आनंदी, समाधानी राहून दुसऱ्यासाठी जगले पाहिजे. मी कोण ? त्या प्रश्नाचा पाठपुरावा करून समाजोपयोगी काही चांगले करता येईल याचा विचार केला पाहिजे. हि शिकवण पुस्तक पेटीतील पुस्तकांच्या मुळे मिळाली. स्वतः उच्च आर्थिक स्थितीत असणे हेच जीवनाचे साफल्य आहे असे न मानता माझ्या बरोबरीने अनेकांचे जीवन सुखी आणि सुसह्य करण्याचा वसा घेण्याचा संदेश पुस्तक पेटीने दिला. भाषांतरित, रुपांतरीत पुस्तकांमुळे इतर भाषातील ज्ञान , चालीरीती वागण्याची पद्धत समजली. आपल्या मराठी भाषेची समृद्धी , श्रीमंती शतकानुशतके जुनी आहे. धार्मिक ग्रंथ , पुस्तके , कथा कादंबऱ्या, प्रवास वर्णने , आत्मचरित्रे , काव्य या सारख्या वांड:मय प्रकारांनी आपली भाषा समृद्ध आहे. त्यामुळे पुस्तके अनेक जण  वाचत च आले आहेत. पुस्तक पेटीची योजना नव्हती तेव्हा कोणी वाचत नव्हते असे नाही पण ज्या वेळी एखाद्या गोष्टीला काळाचे बंधन आले कि ती गोष्ट आपण वेगाने करतो. म्हणजे पुस्तक पेटी चार महिन्यांनी बदलणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त पुस्तके वाचण्याचा मी प्रयत्न करीन असा निश्चय करतो व तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. कायम स्वरूपी वाचनालयातील पुस्तकांबद्दल आपण एवढे जागरूक राहत नाही. वाचू! पुस्तके कुठे जाणार आहेत . ह्या विचाराने दिरंगाई होते. मिळणारा वेळ जास्तीत जास्त सार्थकी लावायला मी पुस्तक पेटी मुळे शिकले. चांगले ज्ञान, आचार विचार , आपल्या आधी दुसऱ्याचा विचार करण्याची वृत्ती मला पुस्तक पेटीने दिली. आपलेच सर्वस्वी बरोबर आहे. दुसऱ्याचे चुकत आहे असा विचार न करता त्या त्या भूमिकेत जाऊन विचार करण्याची कुवत मला पुस्तक पेटीने म्हणजेच अनेक लेखकांनी दिली. अनेकांचे उत्तम लेखन ह्याचा विचार करताना किती लेखकांचा व त्याच्या लेखनाचा उल्लेख करणार? कारण ग्रंथ संपदा अगणित आहे. ह्या सर्व लेखकांचे ऋण फार मोठे आहे. एकच उल्लेख केला तर दुसरा तिसरा असे अनेकांचे उल्लेख राहिले याची मनाला चुटपूट लागते. त्यांच्याविषयी कृतज्ञता दाटून येते. लेखकांनी लिहित राहावे आणि व आपण ते वाचून त्यातले चांगले ग्रहण करून समृद्ध व्हावे असेच सारखे वाटत राहते. ह्या पेटीने मला शिकवले कि एखादे उत्तम काम करायचे ठरवले, अथक परिश्रमाची तयारी ठेवली , नेटाने काम करीत राहिले कि ते काम इतके चांगले व मोठे होते कि त्याची सुरवात करणाऱ्यालाहि ते आपोआप मोठे करते. नाशिक येथून सुरु झालेला हा प्रवास महाराष्ट्रातील अनेक शहरातून, गावातुन सुरु झाला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळून तो महाराष्ट्र बाहेरही गेला. परदेशात हि विचारणा होत आहे. हि बाब किती कौतुकाची आहे नाही का.?हे सुरु झालेले काम पुढे नेण्यासाठी श्री विनायक रानडे व त्यांचे सहकारी अशी निष्ठावान माणसे हवीत. संधीचे सोने कसे करावे हे श्री रानडे यांच्या कडून शिकावे. आजारपणात अंथरुणावर पडून निष्क्रिय अवस्थेत असताना एवढे क्रियाशील काम त्यांनी सुरु केले. ते रेटले ते पुढे नेले हि गोष्ट खूप काही शिकवणारी आहे. या योजनेमुळे अनेक माणसे एकत्र आली. भेटीमुळे अनेक विचारांची देव घेव झाली , मैत्री जुळली. समविचारी मैत्रिणी ह्या पेटीमुळे मिळाल्या हा फार मोठा भाग्य योगच होय. या योजनेचा वेलू गगनावरी गेला आहे. आणि भाग्य म्हणजे तेथे कुसुमाग्रज नावाचा तारा अढलपणे  तळपत आहे. पुढील वाट अजून सोपी करण्यासाठी आपल्या आकाश गंगेसारख्या अनेक आकाश गंगा ह्या ब्रम्हांडात (विश्वात)आहेत ना ! त्यामुळे
 "sky is the limit " असे न म्हणता  आपण आणखी पुढे पुढे चालत राहूया. व ह्या प्रवासात हाच आशावाद मला पुस्तक पेटीने दिला. चांगले अधिक चांगले पुढे पुढे चालत रहाणे मग मार्गातील काटे कुटे आपल्याला कधीच टोचत नाहीत. कारण मनात भरून राहिलेला असतो आशावाद, जीवनाचे सोने करण्याची विजीगिषु इच्छा , इर्षा                                                 
          
      

मंगळवार, १२ मे, २०१५

सौ मनीषा ठाकूर देसाई - ठाणे - पुस्तक पेटीने मला काय दिले ( निबंध स्पर्धा २०१२)

    इतर सजीवांमध्ये व मानव प्राण्यात एक मुख्य फरक आहे. तो म्हणजे मानवाला बुद्धी आहे ज्यायोगे तो विचार करू शकतो, लिहू वाचू शकतो. म्हणूनच अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्राथमिक गरजा भागल्यावर तो समाधानी राहू शकत नाही. त्याची बुद्धिची  भूक भागणे , करमणूक होणे सुद्धा तितकेच आवश्यक असते . त्यासाठी तो निरनिराळे छंद  जोपासतो , व्यासंग करतो.
     वाचन हा असा छंद आहे कि ज्याने करमणूक होते वेळ उत्तम प्रकारे सत्कारणी लागतो , बुद्धिला चालना मिळते व ते सुद्धा कुठल्याही प्रकारच्या खर्चिक  सुविधांशिवाय. त्यासाठी कोणावर अवलंबून राहावे लागत नाही. पुस्तकाची उपलब्धता व आपली इच्छा बस.
      मला वाचनाची आवड लहानपणापासून होती. जे मिळेल ते अधाशासारखे वाचून काढायचे. ह्या छंदामुळेच केवळ तोंडओळख असणाऱ्या मैत्रिणीने मला ह्या उपक्रमाची माहिती दिली आणि मी चला जाऊन तर बघू म्हणून सुरवात केली आणि घट्ट पायच रोवला. जणू परतीची वाटच बंद. बर सुरुवातच अशी झाली कि आधीच्या आठवड्यात पेपर मध्ये माहिती वाचलेले पुस्तक कुठे मिळेल असे वाटत होते तेच हाती लागले आणि उत्साह खूपच वाढला.
     ह्याचा सर्वात मोठा फायदा असा झाला कि मी माझ्या मुलीमध्ये वाचनाची आवड निर्माण करू शकले. माझ्या आवडीमुळे मला सतत असे वाटायचे कि घरातील इतरांनी  पण चांगले साहित्य वाचावे . ह्या पुस्तक पेटीचे सभासद झाल्यावर जादूची कांडी फिरावी तशी तिची वाचनाची आवड थोडी होती ती वाढली . माझ्याबरोबरच घरातील मंडळी सुद्धा पुस्तक बदलण्याच्या वाराची आतुरतेने वाट बघू लागली . पुस्तक आणल्यास छान आण  हं,आम्हाला पण वाचायचं आहे अशी फर्माईश  होऊ लागली. पुस्तकावर चर्चा होऊ लागली. वाचायला वेळ नसेल तर तूच वाचून महत्वाचे मुद्दे संग अशी मागणी होऊ लागली.
     पुस्तक पेटी ने फक्त वाचायला पुस्तके पुरवली नाही तर त्यापलीकडे जाऊनही खूप काही दिले. वाचनालयातून आपण एखादे वेळेस कधीच घेतली नसती अशी पुस्तके घेऊन वाचली गेली. व आपल्या फक्त आवडत्या साहित्यिकाची किवा विषयावरची पुस्तकेच वाचण्याचा दृष्टीकोन किती संकुचित आहे ते लक्षात आले.
     सरधोपटपणे चालणाऱ्या वाचनाला एक प्रकारची दिशा मिळाली . त्यावर विचार करून ते वक्त करण्याची सवय लागली. मनापासून आवड व व्यासंग असणाऱ्या  समानधर्मी व्यक्ती एकत्र आल्यामुळे वाचलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा, इतरांचे त्याबाबतचे विचार यांची देवघेव होऊ लागली. न वाचलेल्या पुस्तकांबद्दल माहिती मिळून ती वाचण्याची उर्मी येऊ लागली . एखाद्या विषयावर असा वेगळा विचार होऊ शकतो, आपल्याला कसे सुचले नाही याची जाणीव होऊ लागली.
     अजून एक फायदा म्हणजे इथेच वाचक मंडळामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यामुळे ठराविक वाचन त्यावर चिंतन , मनन होऊन त्याबद्दल आपले विचार व्यक्त करण्याचा आत्मविश्वास मिळाला.  पुस्तकांची नोंद ठेवली जाऊ लागली. व छोट्या ग्रुप मध्ये का होईना आपण आपले विचार व्यक्त करू शकतो असा विश्वास मिळाला.
      अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये रस असणाऱ्या , काम करणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळू लागली. त्यांची ओळख होऊ लागली. त्यांचे विचार ऐकायला कार्य जवळून बघायला मिळाले. त्यांचे माहिती नसलेले गुणविशेष काही किस्से यांची भर पडली . आजूबाजूला चालणाऱ्या काही छोट्या मोठ्या संस्थांची सुद्धा माहिती मिळू लागली.
      वयाची किवा आपल्या कार्यक्षेत्राची चौकट ओलांडून अनेक समविचारी व्यक्तींशी ऋणानुबंध जुळून आला व नवीन मैत्रीचे धागे जुळले . त्याचा जीवनविषयक दृष्टीकोन बदलण्यास अधिक सकारात्मक होण्यास हातभार लागला. अनेक अडचणींवर केलेली मात बघून नवी स्फूर्ती मिळाली. सामाजिक जाणीवा अधिक प्रगल्भ झाल्या.
     असा आगळा वेगळा उपक्रम असू शकतो त्याला सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो तो सुद्धा इतक्या अल्पावधीत ह्याचा खूप आनंद झाला. जे वेड मजला लागले तुजला हि ते लागेल का ? असे म्हणण्याची गरज उरली नाही. कारण आपल्यासारखे किवा याहून जास्त वेडे ठरणारे आहेत हे बघून धन्य झाले.  ह्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पुढची पिढी वाचेल का ? मराठी भाषेला व पुस्तकांना भवितव्य लाभेल काय ? असे प्रश्न हास्यास्पद आहेत कि काय असे वाटले. पुस्तकांचे आशादायी भवितव्य दिसू लागले.
     आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवून अनुभव देऊन जाते . कधी बरा कधी वाईट  तसे ह्या पुस्तक पेटीच्या उपक्रमामुळेच स्वतःतील सुप्त विचारांना अधिक वाव मिळालाऽअप्ले विचार व्यक्त करायची शब्दात मांडण्याची सवय लागली जणू एक नवीन दलांच समोर अले. त्याचाच परिपाक म्हणजे आजचा लेखन प्रपंच. जाता जाता एव्ह्डेच म्हणते
     अनंत हस्ते कमलावराने, देता  घेशील किती दो करांने .                                            

सौ शर्मिष्ठा श्रीकृष्ण लेले - पोखरण गावंड बाग ठाणे - पुस्तक पेतीने मला काय दिले (निबंध स्पर्धा २०१२)

दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे ।
बहु खेळ खोटा सदालस्य खोटा  । समस्तांशी भांडेल तोचि करंटा  ।। समर्थ रामदास

      दिवसभर खेळत राहणे, आळश्या सारखे पडून राहणे हे बरोबर नाही दिवसात किती वेळ खेळावयाचे , किती वेळ अभ्यास करावयाचा , दूरदर्शन किती वेळ पहावयाचे या सर्वांचे नियोजन शिक्षक किवा आई वडील किवा आपण करावयास हवे . तरच जीवनात एक शिस्त येते. समर्थांचा यावर कटाक्ष होता.
      डॉ बाबासाहेब आंबेडकर एकदा दुपारी दोन वाजता ग्रंथ वाचायला बस्ले. त्यांच्याकडे कामाला असलेला नोकर रामचंद्र सकाळी नऊ ते पाच वाजेपर्येंत असे . तो पाच वाजता घरी जायला निघाला तेव्हा बाबासाहेब वाचण्यात गर्क होते. त्याने मी जाऊ का ? असे बाबासाहेबांना विचारले बाबासाहेबांनी खूण  करून जा असे सांगितले . दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता रामचंद्र कामावर आला. बाबासाहेब खुर्चीवर बसून पुस्तक वाचत होते. त्याला वाटले कि बहुतेक रात्री झोपून सकाळी पुन्हा वाचायला बसले असावेत. आपण कामावर आलेलो आहोत हे सांगण्यासाठी तो नुसते बाबासाहेब म्हणाला. तोच काहीश्या त्रासिकपणे बाबासाहेब त्याला म्हणाले तुला जा म्हणून सांगितले ना ? असे हे बाबासाहेब दुपारी दोन ते सकाळी नऊ वाजेपर्येंत वाचत च होते.
     लोकसत्तेच्या ठाणे वृत्तांत मध्ये संक्षिप्त या सदरात श्री विनायक रानडे " ग्रंथ तुमच्या दारी " वाचनासाठी मोफत पुस्तके उपलब्ध   हि जाहिरात वाचली आणि त्वरित रानडे यांच्याशी भ्रमणध्वनीने संपर्क साधला . श्री रानडे यांनी योजनेची माहिती दिली. त्यासाठी ठाण्यातील प्रमुख सौ रश्मी जोशी यांच्याशी संपर्क साधून पुढील कार्यवाही करावी असे सांगितले. त्यानुसार सौ रश्मी जोशी यांच्याशी संपर्क साधला  त्यांनी किमान ३५ लोकांचे नाव पत्ते दूरध्वनी क्रमांक अशी यादी अर्ज सोबत द्यावी व त्यानंतर आम्ही स्वत सोसायटीत येउन पाहू व मगच पेटी देऊ असे सांगितले. परंतु सध्या पेटी उपलब्ध नाही असे त्यांनी सांगितले तेव्हा मात्र श्री रानडे यांच्याशी भ्रमण ध्वनीने सतत पाठपुरावा केला त्यामुळे माझी कदाचित आंतरिक इच्छा जाणवली व त्यांनी दिनांक ११ फेब्रुवारी २०१२ रोजी १०० पुस्तकांची पेटी प्रदान केली.
       पुस्तक पेटी प्रदान करण्याच्या छोटेखानी समारंभात श्री रानडे यांनी त्यातील चार पुस्तके सर्वाना दाखवली. त्यावेळी ती पाहिल्यानंतर कोरी साडी हातात घेतल्यानंतर येणार सुगंध जसा मनाला सुखावतो तसाच भाव त्यावेळी प्रत्येक सभासदांच्या चेहऱ्यावर पाहून मलाही खूप आनंद झाला . प्रत्येक पुस्तक कोरे करकरीत प्लास्टिक मध्ये बंदिस्त जणू नवा साज ल्याले आहे. यात पु ल देशपांडे , व पु काळे , वि स खांडेकर , ह मो मराठे , डॉ विजया वाड , अश्या दिग्गजांची पुस्तके आहेतच पण अनुवादित तसेच नवोदित लेखकांची पुस्तके हि यात समाविष्ट आहेत.
       डॉ विजया वाड  यांनी कर्तुत्ववान स्त्रियांची ओळख करून दिली. ह मो मराठे यांनी मोठे मोठे राजकारणी , लेखक ,नट यांची भेट घडवून आणली .श्री श्रीनिवास गडकरी यांनी त्यांच्या "वेगळे काही" यातून   प्रसिद्धीस न आलेले परंतु जगावेगळ्या व्यक्तींची महती दाखवून दिली . गिरीजा कीर यांनी कारागृहातील कैद्यांची मन मोकळी ओळख करून दिली.
        या पुस्तक पेटी चे   ज्येष्ठ नागरिकच नव्हेत तर तरुणाई ने सुद्धा मनापासून स्वागत केले. मुख्यत्वे मोफत पुस्तक वाचनालय हि संकल्पनाच सर्वाना भावली. हे वाचनालय सुरु केल्याने सर्वांच्या शुभेच्छा मिळाल्या. तर बहुतांची अंतरे समजली . आज गावंड बागेत अथवा जवळ पास वाचनालय नाही त्यामुळे आज वाचनालयातून वाचक वर्ग लाभला. फक्त वाचनालय नाही तर मी व इतर ३-४ सभासदांनी वाचन व त्यावर चर्चा करावी असे हि विचार मांडले निवृत्ती नंतर सतत कुठल्या तरी कामात गुंतावे असा ध्यास या पुस्तक पेटीने पूर्ण केला. हि पुस्तक पेटी म्हणजे मेवा आहे. तो भरभरून सर्वांनी घ्यावा व त्यातील ज्ञान रस चाखावा व पुढे तो हि सर्वाना द्यावा हीच इच्छा. तरीही असे सांगावेसे वाटते कि यात ग्रामीण भाषेतील पुस्तके जास्त न ठेवता संगीत, संत वांङ्गमय , ललित लेख यासारखी पुस्तके असावीत . तसेच अच्युत गोडबोले,
डॉ जाखोटिया इ लेखक हि सहभागी व्हावेत. श्री रानडे, कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि सौ रश्मी जोशी प्रमुख संचालिका यांना धन्यवाद.
        जो वाचेल तो वाचेल . जो वाचणार नाही तो वाचणार नाही हा नव्या युगाचा धर्म आहे. म्हणून समर्थांनी अफाट वाचन आणि थोडेसे लेखन रोज करावयास सांगितले आहे. आपण जे वाचन करतो त्यातील आपल्याला आवडलेला आणि महत्वाचा भाग लिहून काढावा.       

सोमवार, ११ मे, २०१५

सौ सुचेता यशवंत रानडे, देवदया नगर , ठाणे - मला पुस्तक पेटीने काय दिले (निबंध स्पर्धा २०१२)

  नऊ वर्षापूर्वी आम्ही ठाण्यास शिवाई नगर भागात वास्तव्यास आलो. जुने मित्रत्वाचे संबंध तुटले नव्याने मैत्री जुळवणे, मन रमवणे सोपे नव्हते . पण मे महिन्याच्या सुट्टीत छोट्यांसाठी दोन वर्षे संस्कार वर्ग चालवले. महिला मंडळी सुरु केले. परंतु आजकाल या साठी सक्रिय सभासदांचा सहभाग मिळणे समाजाच्या अश्या उपक्रमांकडे दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीमुळे अवघड झाले व ते बंद पडले.
    आम्हा उभयतांची वये वाढत होती. शारीरिक स्थितीमुळे ठाण्याबाहेर व कधी कधी घराबाहेर जाणे  हि अशक्य होत असे . आम्हा दोघांना वाचनाची आवड आहे.  पुस्तक हा जवळचा सोबती वाटतो. शरीर दुर्बल असले तरी वाचन शक्य असते . हा मित्र आपल्याशी मोकळेपणाने संवाद साधतो. मनोरंजन बरोबर अनेक अज्ञात विषयांची जवळून माहिती देतो , असामान्य व्यक्तीच्या जवळ नेतो व त्यांचे अलौकिक गुण ज्यांनी अनुभवले आहेत त्यांच्या साक्षीने आपल्यासमोर त्या गुणांना देदीप्यमान करतो. यशस्वी माणसांनी किती झगडून व जिद्दीने हार न मानता ध्येय साध्य केले हे सांगून आपले पूर्वीचे कष्ट व संकटे खरे तर या पुढे नगण्य होती हे लक्षात आणून देतो . शिवाय जर आवडले नाही , वेळ नाही , शरीर दमले तर मुकाट्याने आपले तोंड मिटून घेतो. आणि तसे करण्यासाठी आपल्या हातांना दुसऱ्यांच्या परवानगीची गरज लागत नाही. या मुळे  घरपोच पुस्तक देणाऱ्या वाचनालयाचे सभासदत्व घेतले . परंतु मोजक्या दहा बारा पुस्तकातून निवड करावी लागे . पुस्तक वाचून झाले नाही तर ठराविक दिवशी वाटप करणारा दारात आला तर पुस्तक परत न केले तरी अवघड अन्यथा नाईलाजाने पुस्तक बदलायचे ते हि बंद केले.
      पाच महिन्यापूर्वी योगायोगाने गावंड बाग येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वाचन पेटी उपक्रमासंबंधी कळले .तिथे जाऊन संचालिका सौ लेले यांची गाठ घेऊन तपशीलवार माहिती मिळवली. लगेचच सभासदत्व घेऊन टाकले . ठराविक वेळी व ठरविक दिवशी पुस्तक बदलायचे , पंधरा दिवसांनी ते बदलावेचे लागते या मुळे वाचनात एक शिस्त आली असे अनुभवास आले. दर वेळेस चाळीस एक पुस्तकातून पुस्तक निवडायचे असल्याने निवडीस वाव मिळतो. विविध विषयावरची व विविध लेखन प्रकारातील पुस्तके समोर आल्याने मनपसंत निवड करून कृष्णाबाई सुर्वे यांचे " मी आणि मास्तर " हाती आले त्यांच्या कथेने कष्टानी अडचणींनी काळीज हेलावले. रवींद्र पिंगे यांच्या शतपावलीत कुमार गंधर्वांना भेटलो, महात्मा गांधीचे चरित्रकार श्री. डी. जी तेंडूलकर यांना जवळून जाणले. राम जगताप संपादित कर्ता माणूस मधल्या अप्रसिद्ध परंतु असामान्य व्यक्तींना परीचीतात सामावून घेतले. द. मा. मिरासदारांच्या हसणावळीत हसलो, वि. स. खांडेकरांचे पाढरे ढग कितीतरी वर्षांनी वाचले. काय नि किती जणांचा उल्लेख करू?
        शिवाय "समानशीलेषु  व्यसनेषु सख्यम या नात्याने इतर सभासद व संचालिकांशी मैत्री होत आहे. वाचन पेटी उपक्रमामुळे वाचनाचे आमचे उद्धेश सफल होत आहेतच .शिवाय मैत्रीचे वर्तुळ हि वाढत आहे. या सारखा आनंद कोणता? या उतारवयात एकटेपणा विसरायला लावणारी कोणतीही गोष्ट  आनंदाचीच व स्वागतार्ह असते ना?                    

             

लतिका कर्णे , लोकमान्यनगर ठाणे - मला पुस्तक पेटीने काय दिले ( निबंधस्पर्धा २०१२)


  फार पूर्वी संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अमृत तुल्य ज्ञानेश्वरीतून आपणास प्राकृत भाषेचे पसायदान दिले. ज्यामुळे सर्व समाज जागृत झाला. ज्ञानाचा दिवा जनसामान्यात प्रकाशु लागला आणि भाषेची गोडी माणसाना रिझवू लागली. 
   लेखनाचे अनेक प्रकार पौराणिक कथा, अभंग, भारुड ओव्या , निरुपणे पण त्यातून मिळणारे अमौलिक ज्ञान माणसास आत्मभान देवून गेले.  ज्ञानेश्वरांप्रमाणे संत तुकाराम, नामदेव , मुक्ताबाई, रामदास अश्या अनेक संतानी हि साहित्याची गंगा समाजात पसरवली . त्यांनी सर्व लोकांना जगण्याची प्रेरणा दिली. त्यानंतरही अनेक प्रतिभासंपन्न लेखक - लेखिका यांचा ऒघ चालूच राहिला. त्यामध्ये राम गणेश गडकरी , प्र. के. अत्रे ,
 व. पु. काळे , पु.ल. देशपांडे, वि.वा. शिरवाडकर , शांता शेळके , इंदिरा संत , कवी ना. धो. महानोर, 
बा. सी . मर्ढेकर या सारख्या दिग्गजांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांनी लिहिलेल्या सर्व साहित्य प्रकारात समाजाचे प्रतिबिंब अचूक दिसते. त्यांच्या साहित्यातुन आपल्या अनेक कला , संस्कृती , समाज , व्यक्ती याविषयी लिहिले व आपले मनोरंजन केले. 
    अश्या या समृद्ध साहित्याचा ठेवा सर्वांना सहज उपलब्ध व्हावयास हवा आणि हे शक्य झाले आहे पुस्तक पेटी या योजनेमुळेच. 
     आज सर्वसामान्यांना प्रत्येक पुस्तक स्वत घेऊन वाचणे शक्य नसते. परंतु नामवंत लेखकांची सर्व पुस्तके ज्यामधून आपणास अनेक साहित्यप्रकार हाताळता येतात . जसे कथासंग्रह , कवितासंग्रह , विज्ञान विषयक पुस्तके , आत्मचरित्र , कादंबरी व नाटके इत्यादी मला पुस्तक पेटीतून मला उपलब्ध झाले. या सर्व पुस्तकातून अनेक गोष्टींची प्रेरणा मिळते. जीवन सुसह्य करण्यासाठी त्याची मदत होते. जगण्याचा आनंद वाढवता येतो. पुस्तक वाचताना नकळत आपण त्यातील एक घटक बनून जातो. एका विश्वातून दुसऱ्या कल्पनाविश्वात नेण्याची किमया फक्त पुस्तकेच करू शकतात. 
      अनेक व्याधी , संकटे, चिंता यांनी त्रस्त झालेल्या लोकांना पुन्हा शांत व  स्थिर होण्यासाठी पुस्तके फार उपयुक्त आहेत. ती नैराश्य दूर करून नाव चैतन्य देतात. पुस्तकेच आपले मित्र असतात असे म्हंटले  तर वावगे ठरू नये. पुस्तक पेटी योजने मुळे आज समाजात जो संकुचितपणा झाला आहे तो हि कमी होण्यास मदतच मिळते कारण या निमित्ताने एकमेकांशी वैचारिक देवाण घेवाण होते. सुसंवाद साधला जातो. वेळोवेळी येणाऱ्या नवोदित लेखकांच्या साहित्याची हि ओळख होते. कारण याच लेखकांनी हा साहित्याचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. वाचाल तर वाचाल हि उक्ती खरे ठरवणाऱ्या पुस्तक पेटी मुळेच वरील सर्व गोष्टी शक्य झाल्या आहेत.                                   

सौ वेदेहि रामचंद्र जोशी - ठाणे - मला आवडलेले पुस्तक (निबंध स्पर्धा २०१२)


"फॉर हिअर टू  गो " हे अपर्णा वेलणकर यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे १९६० च्या दशकात मायभूमी सोडून दहा हजार मैलावरच्या परक्या देशात आपले नशीब आजमावण्याकरिता गेलेल्या महाराष्ट्रीयन लोकांची कथा आहे. 
  पैशाचे आकर्षण, अनुभव गाठी बांधण्याची जिज्ञासा , उच्च शिक्षणाची संधी अश्या अनेक कारणांनी लोक अमेरिकेत पोहोचले. अवघड जिणे , खाचखळगे, धोके जिद्दीने पचवले. भारतातील पारंपारिक संस्कृती आणि अमेरिकेतील राहणीमान, हवामान, खाणेपिणे हे दिवसरात्रीच्या फरकाएवढे वेगळे होते. 
   जलाशयाच्या पोटात दडलेली सुखदु:खे किनाऱ्यावरील लोकांना समजत नाहीत . परंतु अपर्णा वेलणकर यांनी अमेरिकेतल्या वेगवेगळ्या थरातील कुटुंबांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे अवलोकन केले. देवापुढे निरंजन,  अगरबत्ती,कपूर लावला कि फायर अलार्म वाजू लागल्यावर काय करावे हे न कळणाऱ्या गृहिणी , आपल्या मुलांनी १२-१३ व्या वर्षी स्वताच्या बेडरूमला कडी लावून वावरणे पाहून आई वडिलांची होणारी कुचंबणा , शाळा कॉलेज मध्ये जाणारया  मुला मुलींना त्यांचे दिसणे भाषेचे शब्दोच्चार या मुळे  वाटणारा कमीपणा आणि अश्या अनेक गोष्टी प्रत्यक्ष संवादातून मांडल्या आहेत .   
     पतीच्या मृत्युनंतर ६५ व्या वर्षी अमेरिकेत स्थाईक झालेल्या मुलाकडे जाऊन राहणाऱ्या आजीबाई नि ड्रायविंग करण्यासह सगळा बदल सहज स्वीकारला. संस्कृती रक्षणाच्या अमेरिकेत गेलेल्या लोकांच्या प्रयत्नांना सहाय्यभूत ठरावे  म्हणून श्री पटवर्धन यांनी आपला व्यवसाय सांभाळतानाच पौरोहित्याचे काम सुरु ठेवले .  असे अनेक जिद्दीने  राहणारे सामान्य परिवार होते. अमेरिकन उद्योगजगतात ज्यांनी नाव कमावले अश्या व्यावसाईकांशी संवाद साधून  त्यांचे अनुभव पुस्तकात अधोरेखित केले आहेत. 
     विमानाचे तिकीट काढण्यासाठी बँकेकडून कर्ज घेऊन ५० वर्षापूर्वी अमेरिकेत आलेले "सी एम सी रिअल्टी लिमिटेड " या शेकडो मिलिअन डॉलरची उलाढाल करणाऱ्या बांधकाम कंपनीचे मालक सुभाष गायतोंडे आहेत. अख्ख्या सिलिकॉन व्हालीत  ज्यांच्या नावाचा दबदबा आहे आणि ज्यांचा व्यवसाय व्हेन्चर कॅपीटालीस्ट आहे त्या डॉ  भालेराव यांनी १५००० हून अधिक कंपन्यांची स्थापना केली. अमेरिकन डिफेन्स डिपार्टमेंट व एअर फोर्स ची कामे ज्यांना मिळतात आणि उलाढाली नुसार अमेरिकेतील पहिल्या तीन कंपन्यामध्ये ज्यांची गणना होते ते मनोहर शिंदे आहेत. केमिर कंपनीचे मालक डॉ श्रीनिवास ठाणेदार असे अनेक महाराष्ट्रीयन लोक याच काळात अमेरिकेत आले.  परिस्थितीच्या नाविन्याशी झगडत, जुळवून घेत आपापली साम्राज्ये स्थापन केली  व व्यवसायात हि महाराष्ट्रीयन लोक कमी नाही हे सिदध केले 
    "फॉर हिअर टू  गो " हे पुस्तक वाचल्यावर परदेशात जाऊन स्थाईक झालेल्या लोकांच्या कष्टाची कदर न करता त्यांच्या मिळकतीवर डोळा ठेवणाऱ्या देशवासीयांच्या मनोवृत्तीचा विचार करणे भाग पडते . भारतीय संस्कृतीची जपणूक व्हावी म्हणून कसोशीने प्रयत्न करणाऱ्या परदेशस्थ लोकांना १९८० नंतर भारतीय सांस्कृतिक जीवनात पडणारा फरक थक्क करणारा होता. तरीही परदेशातील सांस्कृतिक  जीवन निकृष्ट हे ऐकावे लागत होतेच. बृहन्महाराष्ट्र मंडळ हि संस्था तेथील लोकांच्या मनातील उद्रेक बाहेर येण्याला त्यांना एकत्र  ठेवण्याला त्यांची सांस्कृतिक भूक शमविण्याला  आधार होती. 
        रमेश मंत्री यांचे " सुखाचे दिवस " (१९७५) व सुभाष भेंडे यांचे "गड्या आपुला गाव बरा "(१९८५) हि पुस्तके वाचनात आली. असणाऱ्या  वाचक जाणकारांकरिता २००७ साली प्रथमावृत्ती निघालेल्या   "फॉर हिअर टू  गो " या पुस्तकात घडणारे अमेरिका दर्शन निराळेच तरीही विलोभनीय आहे. टिकून राहण्याच्या , तरुन -तगुन  जगण्याच्या अपरिहार्यतेतून अमेरिकेत गेलेल्या महाराष्ट्रीयन लोकांनी अफाट कष्ट केले. विदेशी कंपन्यात नोकऱ्या करून गुणवत्तेने सन्मानाची पदे मिळवली. दूरदर्शी विचाराने व चिवट जिद्दीने संघर्ष करून बडे उद्योगपती बनले. 
     संपूर्ण जगाला एक "ग्लोबल व्हिलेज" करून टाकण्याची किमया माणसाला अवगत नव्हती त्याकाळी अनोळखी जगाच्या महासागरात आपले तरु लोटून देऊन ५० वर्षापूर्वी देशांतर करणाऱ्यांची हि कथा भाषेच्या गोडव्यासह , माहितीने परिपूर्ण आणि ओघवत्या लेखनाने अत्यंत मनोवर्धक झाली आहे.  

शनिवार, २५ एप्रिल, २०१५

माझ ग्रंथालय , बालविभाग शुक्रवार १ मे २०१५ महाराष्ट्र दिन संध्याकाळी ६ वाजता

पुणे येथे शुभारंभ  माझ ग्रंथालय , बालविभाग . . . 

शुक्रवार  १ मे  २०१५ महाराष्ट्र दिन संध्याकाळी ६ वाजता 

DSK Frangipani 5B BJ Road
Hotel woodland lane 
Near Sadhu Vaswani Statue
Pune - 411001

आयोजक : देवेंद्र बंगाळे  ९८६०० ३१९१८ 

योजनेत सहभागी होण्यासाठी बालगोपाळा समवेत अवश्य उपस्थित राहावे . 
मुलांना येणार्या सुट्टीत वाचनाचा आनंद लुटु द्या 
इयत्ता २ री ते ८ वी च्या मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी 
ग्रंथ पेट्या प्रत्येकी १५ मराठी व १० इंग्रजी अशी एकूण २५ पुस्तके 
दर दोन महिन्यांनी आपापसात बदलणे … सभासद होण्यासाठी देणगी मुल्य . 

शुभारंभ ९ ग्रंथ पेट्या वितरणाने सभासद वाढत जातील तसे पेट्या व पुस्तके वाढत जातील . 
नाशिक येथे दोन महिन्यात चांगला प्रतिसाद ७५ पेट्या . .  
लवकरच पुणे व महाराष्ट्र भर विस्तार करण्याचा मानस . 

साहित्याचा खजिना असलेली फिरती ग्रंथ पेटी मुलांना वाढदिवसाला भेट देण्यासाठी ऊतम . 

जरूर सहभागी व्हा  . . 
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : 
विनय जोगळेकर , समन्वयक , माझ ग्रंथालय , पुणे  विभाग . 
९३ ७० २६ ०० ५२ , ९४ २२ ४४ ९८ ८७  vinayjoglekar11@gmail.com