बुधवार, ९ डिसेंबर, २०१५

इवलेसे रोप लावियले दारी



२०१२ अखेरची गोष्ट , डॉक्टर अभ्यंकरांनी ग्रथ तुमच्या दारी या योजनेची कल्पना माझ्यासमोर मांडली. वाचनाची पहिल्यापासून आवड शिवाय जवळपासच्या मराठी जनांसाठी असा काही उपक्रम राबवावा हि कित्येक वर्षाची सुप्त इच्छा म्हणून मी अभ्यंकरांना ताबडतोब होकार दिल. आणि केंद्र समन्वयक म्हणून तयारीला लागलो. पण म्हणतात ना 'घी देखा मगर बडगा नाही देखा! बांगूर नगर-वसंत गेलक्झी परिसरातील मराठी मंडळी माझ्या ३०-३२ वर्षाच्या वैद्यकीय व्यवसायामुळे परिचित होती,पण खरी ओळख व्हायची होती.
"बैबिलियन संकृतीवर वैदिक संस्कृतीचा प्रभाव"या वरची पुस्तके असतील का हो ?
"अय्या घरी आणून नाही देणार पुस्तकं ?मग कसलं ग्रंथ तुमच्या दारी "?
"पु लं ची नवीन पुस्तके ठेवणार का?
"तुम्हाला मदत म्हणून होईन मेम्बर !

अश्या अनेक प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या . बांगुरनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे निरलस समाजसेवक श्री महेश नेणे यांच्या प्रचंड सहकार्यामुळे एक एक सदस्य मिळत गेले. आणि १० मार्च(शिव जयंती -कुसुमाग्रज स्मृतिदिन )२०१३च्या सुमुहूर्तावर आमचे केंद्र सुरु झाले.
   सुरु होणे आणि चालवणे या महदंतर आहे याचा ताबडतोब प्रत्यय आला. ग्रंथ पेटी माझ्या दवाखान्यात ठेवलेली त्यामुळे शनिवारी संध्याकाळी पेशंट, वाचक, पेशंट कम वाचक अशा तिहेरी हल्ल्याला तोंड देताना माझी दमछाक होऊ लागली. अश्या वेळी दीपक आणि राजन हे राय बंधू माझ्या सहाय्याला उभे राहिले . दीपक मितभाषी आणि कामाला वाघ राजन हसतमुख पण शिस्तीला काटेकोर त्यामुळे पुस्तक देणे घेणे त्यांची नोंद ठेवणे , वेळेवर पुस्तक न देणाऱ्या महाभागांना टेलीफोनवरून आठवण करून देणे हि कामे हि दुक्कल बिन बोभाटपणे करीत आहे.
    दीपकची कार्य निष्ठा जबरदस्त. स्वताच्या आईचे निधन झाल्यावरही शनिवारी ७ वाजता नित्यनेमाप्रमाणे हे महाशय पुस्तक वितरणासाठी हजर. त्यांच्या घरची गोष्ट मला दुसरीकडून समजली तेव्हा मन हेलावल्या वाचून राहिले नाही, कधी गावी जायचे असेल तर, ऑफिसात जसे सिक लिव चा अर्ज करतात तसा हा माणूस १५ दिवस आधी सांगणार !अश्या अकृत्रिम , भक्कम पाठींब्यावरच आमचे केंद्र सुरळीत चालू आहे.
"रिधोरकर बाई या आणखीन एक अस्सल ग्रन्थ्प्रेमि. पतीच्या ७५व्या वाध्दिवासानिम्मित त्यांनी एकरकमी २०,०००/- चा चेक दिला आणि आमच्या दुसऱ्या ग्रंथ पेटी ची तजवीज सुरू झाली.
    दोन वर्ष उलतलि. विनायक रानडेंच्या "ग्रंथ तुमच्या दारी "चळवळीला आमच्या केंद्रासारखे अनेक खंदे समर्थक मिळाले आहेत आणि तिची प्रगती चालूच आहे.
"इवलेसे रोप लावियले दारी , तयाचा वेलू गेला गगनावरी"

या ज्ञानेश्वरांच्या ओळी आम्ही सानंद साभिमान अनुभवीत आहोत आणि या फुललेल्या मोगऱ्याचा वाचन सुगंध दशदिशात परीमालात राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करीत आहोत.

डॉक्टर विद्याधर देसाई 
बांगूर नगर गोरेगाव (प )  

    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा