सोमवार, ११ मे, २०१५

सौ वेदेहि रामचंद्र जोशी - ठाणे - मला आवडलेले पुस्तक (निबंध स्पर्धा २०१२)


"फॉर हिअर टू  गो " हे अपर्णा वेलणकर यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे १९६० च्या दशकात मायभूमी सोडून दहा हजार मैलावरच्या परक्या देशात आपले नशीब आजमावण्याकरिता गेलेल्या महाराष्ट्रीयन लोकांची कथा आहे. 
  पैशाचे आकर्षण, अनुभव गाठी बांधण्याची जिज्ञासा , उच्च शिक्षणाची संधी अश्या अनेक कारणांनी लोक अमेरिकेत पोहोचले. अवघड जिणे , खाचखळगे, धोके जिद्दीने पचवले. भारतातील पारंपारिक संस्कृती आणि अमेरिकेतील राहणीमान, हवामान, खाणेपिणे हे दिवसरात्रीच्या फरकाएवढे वेगळे होते. 
   जलाशयाच्या पोटात दडलेली सुखदु:खे किनाऱ्यावरील लोकांना समजत नाहीत . परंतु अपर्णा वेलणकर यांनी अमेरिकेतल्या वेगवेगळ्या थरातील कुटुंबांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे अवलोकन केले. देवापुढे निरंजन,  अगरबत्ती,कपूर लावला कि फायर अलार्म वाजू लागल्यावर काय करावे हे न कळणाऱ्या गृहिणी , आपल्या मुलांनी १२-१३ व्या वर्षी स्वताच्या बेडरूमला कडी लावून वावरणे पाहून आई वडिलांची होणारी कुचंबणा , शाळा कॉलेज मध्ये जाणारया  मुला मुलींना त्यांचे दिसणे भाषेचे शब्दोच्चार या मुळे  वाटणारा कमीपणा आणि अश्या अनेक गोष्टी प्रत्यक्ष संवादातून मांडल्या आहेत .   
     पतीच्या मृत्युनंतर ६५ व्या वर्षी अमेरिकेत स्थाईक झालेल्या मुलाकडे जाऊन राहणाऱ्या आजीबाई नि ड्रायविंग करण्यासह सगळा बदल सहज स्वीकारला. संस्कृती रक्षणाच्या अमेरिकेत गेलेल्या लोकांच्या प्रयत्नांना सहाय्यभूत ठरावे  म्हणून श्री पटवर्धन यांनी आपला व्यवसाय सांभाळतानाच पौरोहित्याचे काम सुरु ठेवले .  असे अनेक जिद्दीने  राहणारे सामान्य परिवार होते. अमेरिकन उद्योगजगतात ज्यांनी नाव कमावले अश्या व्यावसाईकांशी संवाद साधून  त्यांचे अनुभव पुस्तकात अधोरेखित केले आहेत. 
     विमानाचे तिकीट काढण्यासाठी बँकेकडून कर्ज घेऊन ५० वर्षापूर्वी अमेरिकेत आलेले "सी एम सी रिअल्टी लिमिटेड " या शेकडो मिलिअन डॉलरची उलाढाल करणाऱ्या बांधकाम कंपनीचे मालक सुभाष गायतोंडे आहेत. अख्ख्या सिलिकॉन व्हालीत  ज्यांच्या नावाचा दबदबा आहे आणि ज्यांचा व्यवसाय व्हेन्चर कॅपीटालीस्ट आहे त्या डॉ  भालेराव यांनी १५००० हून अधिक कंपन्यांची स्थापना केली. अमेरिकन डिफेन्स डिपार्टमेंट व एअर फोर्स ची कामे ज्यांना मिळतात आणि उलाढाली नुसार अमेरिकेतील पहिल्या तीन कंपन्यामध्ये ज्यांची गणना होते ते मनोहर शिंदे आहेत. केमिर कंपनीचे मालक डॉ श्रीनिवास ठाणेदार असे अनेक महाराष्ट्रीयन लोक याच काळात अमेरिकेत आले.  परिस्थितीच्या नाविन्याशी झगडत, जुळवून घेत आपापली साम्राज्ये स्थापन केली  व व्यवसायात हि महाराष्ट्रीयन लोक कमी नाही हे सिदध केले 
    "फॉर हिअर टू  गो " हे पुस्तक वाचल्यावर परदेशात जाऊन स्थाईक झालेल्या लोकांच्या कष्टाची कदर न करता त्यांच्या मिळकतीवर डोळा ठेवणाऱ्या देशवासीयांच्या मनोवृत्तीचा विचार करणे भाग पडते . भारतीय संस्कृतीची जपणूक व्हावी म्हणून कसोशीने प्रयत्न करणाऱ्या परदेशस्थ लोकांना १९८० नंतर भारतीय सांस्कृतिक जीवनात पडणारा फरक थक्क करणारा होता. तरीही परदेशातील सांस्कृतिक  जीवन निकृष्ट हे ऐकावे लागत होतेच. बृहन्महाराष्ट्र मंडळ हि संस्था तेथील लोकांच्या मनातील उद्रेक बाहेर येण्याला त्यांना एकत्र  ठेवण्याला त्यांची सांस्कृतिक भूक शमविण्याला  आधार होती. 
        रमेश मंत्री यांचे " सुखाचे दिवस " (१९७५) व सुभाष भेंडे यांचे "गड्या आपुला गाव बरा "(१९८५) हि पुस्तके वाचनात आली. असणाऱ्या  वाचक जाणकारांकरिता २००७ साली प्रथमावृत्ती निघालेल्या   "फॉर हिअर टू  गो " या पुस्तकात घडणारे अमेरिका दर्शन निराळेच तरीही विलोभनीय आहे. टिकून राहण्याच्या , तरुन -तगुन  जगण्याच्या अपरिहार्यतेतून अमेरिकेत गेलेल्या महाराष्ट्रीयन लोकांनी अफाट कष्ट केले. विदेशी कंपन्यात नोकऱ्या करून गुणवत्तेने सन्मानाची पदे मिळवली. दूरदर्शी विचाराने व चिवट जिद्दीने संघर्ष करून बडे उद्योगपती बनले. 
     संपूर्ण जगाला एक "ग्लोबल व्हिलेज" करून टाकण्याची किमया माणसाला अवगत नव्हती त्याकाळी अनोळखी जगाच्या महासागरात आपले तरु लोटून देऊन ५० वर्षापूर्वी देशांतर करणाऱ्यांची हि कथा भाषेच्या गोडव्यासह , माहितीने परिपूर्ण आणि ओघवत्या लेखनाने अत्यंत मनोवर्धक झाली आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा