मंगळवार, १२ मे, २०१५

सौ मनीषा ठाकूर देसाई - ठाणे - पुस्तक पेटीने मला काय दिले ( निबंध स्पर्धा २०१२)

    इतर सजीवांमध्ये व मानव प्राण्यात एक मुख्य फरक आहे. तो म्हणजे मानवाला बुद्धी आहे ज्यायोगे तो विचार करू शकतो, लिहू वाचू शकतो. म्हणूनच अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्राथमिक गरजा भागल्यावर तो समाधानी राहू शकत नाही. त्याची बुद्धिची  भूक भागणे , करमणूक होणे सुद्धा तितकेच आवश्यक असते . त्यासाठी तो निरनिराळे छंद  जोपासतो , व्यासंग करतो.
     वाचन हा असा छंद आहे कि ज्याने करमणूक होते वेळ उत्तम प्रकारे सत्कारणी लागतो , बुद्धिला चालना मिळते व ते सुद्धा कुठल्याही प्रकारच्या खर्चिक  सुविधांशिवाय. त्यासाठी कोणावर अवलंबून राहावे लागत नाही. पुस्तकाची उपलब्धता व आपली इच्छा बस.
      मला वाचनाची आवड लहानपणापासून होती. जे मिळेल ते अधाशासारखे वाचून काढायचे. ह्या छंदामुळेच केवळ तोंडओळख असणाऱ्या मैत्रिणीने मला ह्या उपक्रमाची माहिती दिली आणि मी चला जाऊन तर बघू म्हणून सुरवात केली आणि घट्ट पायच रोवला. जणू परतीची वाटच बंद. बर सुरुवातच अशी झाली कि आधीच्या आठवड्यात पेपर मध्ये माहिती वाचलेले पुस्तक कुठे मिळेल असे वाटत होते तेच हाती लागले आणि उत्साह खूपच वाढला.
     ह्याचा सर्वात मोठा फायदा असा झाला कि मी माझ्या मुलीमध्ये वाचनाची आवड निर्माण करू शकले. माझ्या आवडीमुळे मला सतत असे वाटायचे कि घरातील इतरांनी  पण चांगले साहित्य वाचावे . ह्या पुस्तक पेटीचे सभासद झाल्यावर जादूची कांडी फिरावी तशी तिची वाचनाची आवड थोडी होती ती वाढली . माझ्याबरोबरच घरातील मंडळी सुद्धा पुस्तक बदलण्याच्या वाराची आतुरतेने वाट बघू लागली . पुस्तक आणल्यास छान आण  हं,आम्हाला पण वाचायचं आहे अशी फर्माईश  होऊ लागली. पुस्तकावर चर्चा होऊ लागली. वाचायला वेळ नसेल तर तूच वाचून महत्वाचे मुद्दे संग अशी मागणी होऊ लागली.
     पुस्तक पेटी ने फक्त वाचायला पुस्तके पुरवली नाही तर त्यापलीकडे जाऊनही खूप काही दिले. वाचनालयातून आपण एखादे वेळेस कधीच घेतली नसती अशी पुस्तके घेऊन वाचली गेली. व आपल्या फक्त आवडत्या साहित्यिकाची किवा विषयावरची पुस्तकेच वाचण्याचा दृष्टीकोन किती संकुचित आहे ते लक्षात आले.
     सरधोपटपणे चालणाऱ्या वाचनाला एक प्रकारची दिशा मिळाली . त्यावर विचार करून ते वक्त करण्याची सवय लागली. मनापासून आवड व व्यासंग असणाऱ्या  समानधर्मी व्यक्ती एकत्र आल्यामुळे वाचलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा, इतरांचे त्याबाबतचे विचार यांची देवघेव होऊ लागली. न वाचलेल्या पुस्तकांबद्दल माहिती मिळून ती वाचण्याची उर्मी येऊ लागली . एखाद्या विषयावर असा वेगळा विचार होऊ शकतो, आपल्याला कसे सुचले नाही याची जाणीव होऊ लागली.
     अजून एक फायदा म्हणजे इथेच वाचक मंडळामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यामुळे ठराविक वाचन त्यावर चिंतन , मनन होऊन त्याबद्दल आपले विचार व्यक्त करण्याचा आत्मविश्वास मिळाला.  पुस्तकांची नोंद ठेवली जाऊ लागली. व छोट्या ग्रुप मध्ये का होईना आपण आपले विचार व्यक्त करू शकतो असा विश्वास मिळाला.
      अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये रस असणाऱ्या , काम करणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळू लागली. त्यांची ओळख होऊ लागली. त्यांचे विचार ऐकायला कार्य जवळून बघायला मिळाले. त्यांचे माहिती नसलेले गुणविशेष काही किस्से यांची भर पडली . आजूबाजूला चालणाऱ्या काही छोट्या मोठ्या संस्थांची सुद्धा माहिती मिळू लागली.
      वयाची किवा आपल्या कार्यक्षेत्राची चौकट ओलांडून अनेक समविचारी व्यक्तींशी ऋणानुबंध जुळून आला व नवीन मैत्रीचे धागे जुळले . त्याचा जीवनविषयक दृष्टीकोन बदलण्यास अधिक सकारात्मक होण्यास हातभार लागला. अनेक अडचणींवर केलेली मात बघून नवी स्फूर्ती मिळाली. सामाजिक जाणीवा अधिक प्रगल्भ झाल्या.
     असा आगळा वेगळा उपक्रम असू शकतो त्याला सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो तो सुद्धा इतक्या अल्पावधीत ह्याचा खूप आनंद झाला. जे वेड मजला लागले तुजला हि ते लागेल का ? असे म्हणण्याची गरज उरली नाही. कारण आपल्यासारखे किवा याहून जास्त वेडे ठरणारे आहेत हे बघून धन्य झाले.  ह्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पुढची पिढी वाचेल का ? मराठी भाषेला व पुस्तकांना भवितव्य लाभेल काय ? असे प्रश्न हास्यास्पद आहेत कि काय असे वाटले. पुस्तकांचे आशादायी भवितव्य दिसू लागले.
     आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवून अनुभव देऊन जाते . कधी बरा कधी वाईट  तसे ह्या पुस्तक पेटीच्या उपक्रमामुळेच स्वतःतील सुप्त विचारांना अधिक वाव मिळालाऽअप्ले विचार व्यक्त करायची शब्दात मांडण्याची सवय लागली जणू एक नवीन दलांच समोर अले. त्याचाच परिपाक म्हणजे आजचा लेखन प्रपंच. जाता जाता एव्ह्डेच म्हणते
     अनंत हस्ते कमलावराने, देता  घेशील किती दो करांने .                                            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा