मंगळवार, १२ मे, २०१५

सौ शर्मिष्ठा श्रीकृष्ण लेले - पोखरण गावंड बाग ठाणे - पुस्तक पेतीने मला काय दिले (निबंध स्पर्धा २०१२)

दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे ।
बहु खेळ खोटा सदालस्य खोटा  । समस्तांशी भांडेल तोचि करंटा  ।। समर्थ रामदास

      दिवसभर खेळत राहणे, आळश्या सारखे पडून राहणे हे बरोबर नाही दिवसात किती वेळ खेळावयाचे , किती वेळ अभ्यास करावयाचा , दूरदर्शन किती वेळ पहावयाचे या सर्वांचे नियोजन शिक्षक किवा आई वडील किवा आपण करावयास हवे . तरच जीवनात एक शिस्त येते. समर्थांचा यावर कटाक्ष होता.
      डॉ बाबासाहेब आंबेडकर एकदा दुपारी दोन वाजता ग्रंथ वाचायला बस्ले. त्यांच्याकडे कामाला असलेला नोकर रामचंद्र सकाळी नऊ ते पाच वाजेपर्येंत असे . तो पाच वाजता घरी जायला निघाला तेव्हा बाबासाहेब वाचण्यात गर्क होते. त्याने मी जाऊ का ? असे बाबासाहेबांना विचारले बाबासाहेबांनी खूण  करून जा असे सांगितले . दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता रामचंद्र कामावर आला. बाबासाहेब खुर्चीवर बसून पुस्तक वाचत होते. त्याला वाटले कि बहुतेक रात्री झोपून सकाळी पुन्हा वाचायला बसले असावेत. आपण कामावर आलेलो आहोत हे सांगण्यासाठी तो नुसते बाबासाहेब म्हणाला. तोच काहीश्या त्रासिकपणे बाबासाहेब त्याला म्हणाले तुला जा म्हणून सांगितले ना ? असे हे बाबासाहेब दुपारी दोन ते सकाळी नऊ वाजेपर्येंत वाचत च होते.
     लोकसत्तेच्या ठाणे वृत्तांत मध्ये संक्षिप्त या सदरात श्री विनायक रानडे " ग्रंथ तुमच्या दारी " वाचनासाठी मोफत पुस्तके उपलब्ध   हि जाहिरात वाचली आणि त्वरित रानडे यांच्याशी भ्रमणध्वनीने संपर्क साधला . श्री रानडे यांनी योजनेची माहिती दिली. त्यासाठी ठाण्यातील प्रमुख सौ रश्मी जोशी यांच्याशी संपर्क साधून पुढील कार्यवाही करावी असे सांगितले. त्यानुसार सौ रश्मी जोशी यांच्याशी संपर्क साधला  त्यांनी किमान ३५ लोकांचे नाव पत्ते दूरध्वनी क्रमांक अशी यादी अर्ज सोबत द्यावी व त्यानंतर आम्ही स्वत सोसायटीत येउन पाहू व मगच पेटी देऊ असे सांगितले. परंतु सध्या पेटी उपलब्ध नाही असे त्यांनी सांगितले तेव्हा मात्र श्री रानडे यांच्याशी भ्रमण ध्वनीने सतत पाठपुरावा केला त्यामुळे माझी कदाचित आंतरिक इच्छा जाणवली व त्यांनी दिनांक ११ फेब्रुवारी २०१२ रोजी १०० पुस्तकांची पेटी प्रदान केली.
       पुस्तक पेटी प्रदान करण्याच्या छोटेखानी समारंभात श्री रानडे यांनी त्यातील चार पुस्तके सर्वाना दाखवली. त्यावेळी ती पाहिल्यानंतर कोरी साडी हातात घेतल्यानंतर येणार सुगंध जसा मनाला सुखावतो तसाच भाव त्यावेळी प्रत्येक सभासदांच्या चेहऱ्यावर पाहून मलाही खूप आनंद झाला . प्रत्येक पुस्तक कोरे करकरीत प्लास्टिक मध्ये बंदिस्त जणू नवा साज ल्याले आहे. यात पु ल देशपांडे , व पु काळे , वि स खांडेकर , ह मो मराठे , डॉ विजया वाड , अश्या दिग्गजांची पुस्तके आहेतच पण अनुवादित तसेच नवोदित लेखकांची पुस्तके हि यात समाविष्ट आहेत.
       डॉ विजया वाड  यांनी कर्तुत्ववान स्त्रियांची ओळख करून दिली. ह मो मराठे यांनी मोठे मोठे राजकारणी , लेखक ,नट यांची भेट घडवून आणली .श्री श्रीनिवास गडकरी यांनी त्यांच्या "वेगळे काही" यातून   प्रसिद्धीस न आलेले परंतु जगावेगळ्या व्यक्तींची महती दाखवून दिली . गिरीजा कीर यांनी कारागृहातील कैद्यांची मन मोकळी ओळख करून दिली.
        या पुस्तक पेटी चे   ज्येष्ठ नागरिकच नव्हेत तर तरुणाई ने सुद्धा मनापासून स्वागत केले. मुख्यत्वे मोफत पुस्तक वाचनालय हि संकल्पनाच सर्वाना भावली. हे वाचनालय सुरु केल्याने सर्वांच्या शुभेच्छा मिळाल्या. तर बहुतांची अंतरे समजली . आज गावंड बागेत अथवा जवळ पास वाचनालय नाही त्यामुळे आज वाचनालयातून वाचक वर्ग लाभला. फक्त वाचनालय नाही तर मी व इतर ३-४ सभासदांनी वाचन व त्यावर चर्चा करावी असे हि विचार मांडले निवृत्ती नंतर सतत कुठल्या तरी कामात गुंतावे असा ध्यास या पुस्तक पेटीने पूर्ण केला. हि पुस्तक पेटी म्हणजे मेवा आहे. तो भरभरून सर्वांनी घ्यावा व त्यातील ज्ञान रस चाखावा व पुढे तो हि सर्वाना द्यावा हीच इच्छा. तरीही असे सांगावेसे वाटते कि यात ग्रामीण भाषेतील पुस्तके जास्त न ठेवता संगीत, संत वांङ्गमय , ललित लेख यासारखी पुस्तके असावीत . तसेच अच्युत गोडबोले,
डॉ जाखोटिया इ लेखक हि सहभागी व्हावेत. श्री रानडे, कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि सौ रश्मी जोशी प्रमुख संचालिका यांना धन्यवाद.
        जो वाचेल तो वाचेल . जो वाचणार नाही तो वाचणार नाही हा नव्या युगाचा धर्म आहे. म्हणून समर्थांनी अफाट वाचन आणि थोडेसे लेखन रोज करावयास सांगितले आहे. आपण जे वाचन करतो त्यातील आपल्याला आवडलेला आणि महत्वाचा भाग लिहून काढावा.       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा