शुक्रवार, २२ मे, २०१५

विभावरी दांडेकर पोखरण रोड नंबर -२ ठाणे - मला पुस्तक पेटीने काय दिले (निबंध स्पर्धा २०१२)

कुसुमाग्रज प्रतिष्ठानची " ग्रंथ तुमच्या दारी " हि जाहिरात वर्तमानपत्रात वाचली आणि माझ्या आनंदाला उधाण आले. एखाद्यापुढे पंच पक्वानांचे ताट ठेवावे असे वाटले. डोंबिवली हून ठाण्याला राहायला आल्यामुळे वाचनाचा आणि माझा संबंध संपल्यासारखाच झाला होता. नवीन शहर आणि नवीन जागा त्यामुळे कोणाशीही फारशी ओळख नाही. वाचनालये घरापासून फार दूर व गैरसोयीच्या ठिकाणी असल्यामुळे वाचन करणे जमत नव्हते. त्याच दरम्यान हि जाहिरात वाचल्यामुळे खूप आनंद झाला.पाठपुरावा करून फेब्रुवारी २०१२ मध्ये माझ्याकडे केंद्र सुरु झाले. त्या दिवशी कुसुमाग्रज च माझ्या घरी आल्यासारखे वाटले. आज ते आपल्यात नाहीत पण साहित्य रूपाने मरणोत्तरीही ते कीर्ती रूपाने जन मानसात आढळ स्थान मिळवून बसले आहेत. प्रत्येक पुस्तक पेटीत शंभर पुस्तके असतात व साधारणपणे चार महिन्यांनी पेटी बदलून दुसरी पेटी केंद्रात पोचोवली जाते.
       शंभर पुस्तकांच्या रूपाने साधारण पणे  नव्वद एक लेखक आपल्या घरी येतात.(वाचायला मिळतात). कारण काही लेखकांची दोन - चार पुस्तके असतात. पुस्तकांचे रूप देखणे असते. नवीन पुस्तके, पुस्तक बांधणी  करून (बाईंडिंग )योग्य ते शिक्के मारून पुस्तकाचे स्वरूप अतिशय सुंदर केलेले असते. पुस्तकांची निवड फार चोखंदळ पणे केल्याचे जाणवते. विविध विषय, जुन्या लेखकांप्रमाणे नवीन नवीन लेखक वाचकांच्या वाचनात कसे येतील ह्याचा प्रामुख्याने विचार केलेला दिसतो. त्यामुळे ज्ञान , कला , विज्ञान , भाषा यांचे सखोल ज्ञान मिळते.  प्रत्येकाला आपल्या आवडीप्रमाणे पुस्तक निवडून वाचता येते.
       पेटीतील विविध पुस्तकांच्या वाचनामुळे मानवी भाव भावनांचे विलोभनीय दर्शन घडले. माणसाचा जगण्यासाठीचा संघर्ष त्यात आलेले यशापयश आणि अपयश पचवून झुंजून पुढील आयुष्याची वाटचाल अधिक नेटाने करण्याचा निर्धार जाणवला. अपंगत्वावर मत करून स्वत: आयुष्य  कसे घडवावे याचा वस्तुपाठ मिळाला. (रुद्रवर्षा - वसंत पागीकर) प्राक्तनात असलेली नोकरी व तिच्या अनुषंगाने मिळणारी वागणूक (फाशीचा साक्षीदार- ज्योती पुजारी) (झुलवा- उत्तम बंडू तुपे ) यांच्या कादंबरीवरून जोगती जोगतीणीच्या नशिबी आलेली फरपट पाहून मन व्यथित होते. अर्थात आनंददायी पुस्तके हि आहेत. त्यांच्या वाचनाने जीवनाच्या वेगळ्या पैलूंचे दर्शन घडते. नावे आणि उदाहरणे तरी किती देणार. वि स खांडेकर , पु ल देशपांडे , साने गुरुजी , प्रवीण दवणे , रणजीत देसाई, रेखा बैजल, प्रकाश संत हेच नव्हे तर अनेक नव्या जुन्या लेखक लेखिकांच्या लेखनाने मनात सुख दु:खाचे कल्लोळ उभे केले. आणि समजले कि जीवन जे आयुष्य वाट्याला आले आहे ते जास्तीत जास्त चांगलेपणाने कसे निभावता येईल .  दुसऱ्याला त्रास न होता स्वतः अधिकाधिक लोकाभिमुख होऊन कोणत्याही परिस्थितीत आनंदी, समाधानी राहून दुसऱ्यासाठी जगले पाहिजे. मी कोण ? त्या प्रश्नाचा पाठपुरावा करून समाजोपयोगी काही चांगले करता येईल याचा विचार केला पाहिजे. हि शिकवण पुस्तक पेटीतील पुस्तकांच्या मुळे मिळाली. स्वतः उच्च आर्थिक स्थितीत असणे हेच जीवनाचे साफल्य आहे असे न मानता माझ्या बरोबरीने अनेकांचे जीवन सुखी आणि सुसह्य करण्याचा वसा घेण्याचा संदेश पुस्तक पेटीने दिला. भाषांतरित, रुपांतरीत पुस्तकांमुळे इतर भाषातील ज्ञान , चालीरीती वागण्याची पद्धत समजली. आपल्या मराठी भाषेची समृद्धी , श्रीमंती शतकानुशतके जुनी आहे. धार्मिक ग्रंथ , पुस्तके , कथा कादंबऱ्या, प्रवास वर्णने , आत्मचरित्रे , काव्य या सारख्या वांड:मय प्रकारांनी आपली भाषा समृद्ध आहे. त्यामुळे पुस्तके अनेक जण  वाचत च आले आहेत. पुस्तक पेटीची योजना नव्हती तेव्हा कोणी वाचत नव्हते असे नाही पण ज्या वेळी एखाद्या गोष्टीला काळाचे बंधन आले कि ती गोष्ट आपण वेगाने करतो. म्हणजे पुस्तक पेटी चार महिन्यांनी बदलणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त पुस्तके वाचण्याचा मी प्रयत्न करीन असा निश्चय करतो व तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. कायम स्वरूपी वाचनालयातील पुस्तकांबद्दल आपण एवढे जागरूक राहत नाही. वाचू! पुस्तके कुठे जाणार आहेत . ह्या विचाराने दिरंगाई होते. मिळणारा वेळ जास्तीत जास्त सार्थकी लावायला मी पुस्तक पेटी मुळे शिकले. चांगले ज्ञान, आचार विचार , आपल्या आधी दुसऱ्याचा विचार करण्याची वृत्ती मला पुस्तक पेटीने दिली. आपलेच सर्वस्वी बरोबर आहे. दुसऱ्याचे चुकत आहे असा विचार न करता त्या त्या भूमिकेत जाऊन विचार करण्याची कुवत मला पुस्तक पेटीने म्हणजेच अनेक लेखकांनी दिली. अनेकांचे उत्तम लेखन ह्याचा विचार करताना किती लेखकांचा व त्याच्या लेखनाचा उल्लेख करणार? कारण ग्रंथ संपदा अगणित आहे. ह्या सर्व लेखकांचे ऋण फार मोठे आहे. एकच उल्लेख केला तर दुसरा तिसरा असे अनेकांचे उल्लेख राहिले याची मनाला चुटपूट लागते. त्यांच्याविषयी कृतज्ञता दाटून येते. लेखकांनी लिहित राहावे आणि व आपण ते वाचून त्यातले चांगले ग्रहण करून समृद्ध व्हावे असेच सारखे वाटत राहते. ह्या पेटीने मला शिकवले कि एखादे उत्तम काम करायचे ठरवले, अथक परिश्रमाची तयारी ठेवली , नेटाने काम करीत राहिले कि ते काम इतके चांगले व मोठे होते कि त्याची सुरवात करणाऱ्यालाहि ते आपोआप मोठे करते. नाशिक येथून सुरु झालेला हा प्रवास महाराष्ट्रातील अनेक शहरातून, गावातुन सुरु झाला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळून तो महाराष्ट्र बाहेरही गेला. परदेशात हि विचारणा होत आहे. हि बाब किती कौतुकाची आहे नाही का.?हे सुरु झालेले काम पुढे नेण्यासाठी श्री विनायक रानडे व त्यांचे सहकारी अशी निष्ठावान माणसे हवीत. संधीचे सोने कसे करावे हे श्री रानडे यांच्या कडून शिकावे. आजारपणात अंथरुणावर पडून निष्क्रिय अवस्थेत असताना एवढे क्रियाशील काम त्यांनी सुरु केले. ते रेटले ते पुढे नेले हि गोष्ट खूप काही शिकवणारी आहे. या योजनेमुळे अनेक माणसे एकत्र आली. भेटीमुळे अनेक विचारांची देव घेव झाली , मैत्री जुळली. समविचारी मैत्रिणी ह्या पेटीमुळे मिळाल्या हा फार मोठा भाग्य योगच होय. या योजनेचा वेलू गगनावरी गेला आहे. आणि भाग्य म्हणजे तेथे कुसुमाग्रज नावाचा तारा अढलपणे  तळपत आहे. पुढील वाट अजून सोपी करण्यासाठी आपल्या आकाश गंगेसारख्या अनेक आकाश गंगा ह्या ब्रम्हांडात (विश्वात)आहेत ना ! त्यामुळे
 "sky is the limit " असे न म्हणता  आपण आणखी पुढे पुढे चालत राहूया. व ह्या प्रवासात हाच आशावाद मला पुस्तक पेटीने दिला. चांगले अधिक चांगले पुढे पुढे चालत रहाणे मग मार्गातील काटे कुटे आपल्याला कधीच टोचत नाहीत. कारण मनात भरून राहिलेला असतो आशावाद, जीवनाचे सोने करण्याची विजीगिषु इच्छा , इर्षा                                                 
          
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा