सोमवार, ११ मे, २०१५

लतिका कर्णे , लोकमान्यनगर ठाणे - मला पुस्तक पेटीने काय दिले ( निबंधस्पर्धा २०१२)


  फार पूर्वी संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अमृत तुल्य ज्ञानेश्वरीतून आपणास प्राकृत भाषेचे पसायदान दिले. ज्यामुळे सर्व समाज जागृत झाला. ज्ञानाचा दिवा जनसामान्यात प्रकाशु लागला आणि भाषेची गोडी माणसाना रिझवू लागली. 
   लेखनाचे अनेक प्रकार पौराणिक कथा, अभंग, भारुड ओव्या , निरुपणे पण त्यातून मिळणारे अमौलिक ज्ञान माणसास आत्मभान देवून गेले.  ज्ञानेश्वरांप्रमाणे संत तुकाराम, नामदेव , मुक्ताबाई, रामदास अश्या अनेक संतानी हि साहित्याची गंगा समाजात पसरवली . त्यांनी सर्व लोकांना जगण्याची प्रेरणा दिली. त्यानंतरही अनेक प्रतिभासंपन्न लेखक - लेखिका यांचा ऒघ चालूच राहिला. त्यामध्ये राम गणेश गडकरी , प्र. के. अत्रे ,
 व. पु. काळे , पु.ल. देशपांडे, वि.वा. शिरवाडकर , शांता शेळके , इंदिरा संत , कवी ना. धो. महानोर, 
बा. सी . मर्ढेकर या सारख्या दिग्गजांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांनी लिहिलेल्या सर्व साहित्य प्रकारात समाजाचे प्रतिबिंब अचूक दिसते. त्यांच्या साहित्यातुन आपल्या अनेक कला , संस्कृती , समाज , व्यक्ती याविषयी लिहिले व आपले मनोरंजन केले. 
    अश्या या समृद्ध साहित्याचा ठेवा सर्वांना सहज उपलब्ध व्हावयास हवा आणि हे शक्य झाले आहे पुस्तक पेटी या योजनेमुळेच. 
     आज सर्वसामान्यांना प्रत्येक पुस्तक स्वत घेऊन वाचणे शक्य नसते. परंतु नामवंत लेखकांची सर्व पुस्तके ज्यामधून आपणास अनेक साहित्यप्रकार हाताळता येतात . जसे कथासंग्रह , कवितासंग्रह , विज्ञान विषयक पुस्तके , आत्मचरित्र , कादंबरी व नाटके इत्यादी मला पुस्तक पेटीतून मला उपलब्ध झाले. या सर्व पुस्तकातून अनेक गोष्टींची प्रेरणा मिळते. जीवन सुसह्य करण्यासाठी त्याची मदत होते. जगण्याचा आनंद वाढवता येतो. पुस्तक वाचताना नकळत आपण त्यातील एक घटक बनून जातो. एका विश्वातून दुसऱ्या कल्पनाविश्वात नेण्याची किमया फक्त पुस्तकेच करू शकतात. 
      अनेक व्याधी , संकटे, चिंता यांनी त्रस्त झालेल्या लोकांना पुन्हा शांत व  स्थिर होण्यासाठी पुस्तके फार उपयुक्त आहेत. ती नैराश्य दूर करून नाव चैतन्य देतात. पुस्तकेच आपले मित्र असतात असे म्हंटले  तर वावगे ठरू नये. पुस्तक पेटी योजने मुळे आज समाजात जो संकुचितपणा झाला आहे तो हि कमी होण्यास मदतच मिळते कारण या निमित्ताने एकमेकांशी वैचारिक देवाण घेवाण होते. सुसंवाद साधला जातो. वेळोवेळी येणाऱ्या नवोदित लेखकांच्या साहित्याची हि ओळख होते. कारण याच लेखकांनी हा साहित्याचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. वाचाल तर वाचाल हि उक्ती खरे ठरवणाऱ्या पुस्तक पेटी मुळेच वरील सर्व गोष्टी शक्य झाल्या आहेत.                                   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा