मंगळवार, २६ मे, २०१५

उषा गायकवाड - पुस्तक पेटीने मला काय दिले, मित्तल पार्क रघुनाथ नगर ठाणे (निबंध स्पर्धा २०१२)

    "ग्रंथ हेच गुरु" "वाचाल तर वाचाल " अश्या वाक्यांचे संस्कार होत असलेल्या पिढीतील मी एक प्रौढ महिला. लहानपणापासून वाचनाचे जबरदस्त वेड. रोजच्या वर्तमानपत्र पासून कथा कादंबरी, चरित्रे, ललित लेख , वैज्ञानिक साहित्य अश्या सर्व प्रकारच्या वाचनाची आवड आज पर्येंत प्रयत्नपूर्वक जोपासली होती. त्यातच कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे ग्रंथ तुमच्या दारी या योजने अंतर्गत वाचनासाठी आणखी एक दालन उघडते आहे समजल्यावर ताबडतोब नाव नोंदणी करून पुस्तक पेटीचा लाभ घेण्यास सुरवात केली .
        आजच्या धावपळीच्या जीवनात वाचानासाठी वेळ देणे जड जातेय . त्यातच कामाशी संबंधित वाचन नाईलाजाने करावेच लागते. एका जागी शांत पाने वाचन करणे दुरापास्त ! अश्या परिस्थितीत कुसुमाग्रज प्रतिष्ठानने पुस्तक सहज उपलब्ध होतील अशी व्यवस्था करून सामाजिक ऋण फेडण्याचा केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद!पुस्तक पेटीने वाचनातून माझे अनुभव विश्व समृद्ध केले. इथे नाना विषयावरील अनेक पुस्तक वाचावयास मिळाली. बाबू मोशाय यांचे सिने सृष्टीवरील अनुभव , स्टीव जॉब्स यांचे चरित्र वाचावयास मिळाले. इथेच मला मैक्झीम गोर्कींची "आई" भेटली. एस एम मुश्रीफ सारख्या पोलिस अधिकाऱ्याने लिहिलेल्या "हु किल्ड करकरे" मधून मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यामागिल आणखी एक झगझगीत वास्तव समोर आले.
        डॉक्टर दातारांनी "दोन तात्या" म्हणजे स्वा. सावरकर व कुसुमाग्रज यांची नव्याने ओळख करून दिली. डॉक्टर फोंडक्यांच्या "सुगरणीच्या विज्ञानातून" वैज्ञानिक जग उलगडले तर प्रतिभा रानड्यांच्या "फाळणी ते फाळणी " माधून देशाच्या राजकारणाचे एक सत्य उघड झाले! इथेच मला वीणा गवाणकरांचा "कार्वर" भेटला. व एहेच पुलंच्या "गोतावळ्या" बरोबर परिचय झाला. जीवनाच्या अनेक पैलूचा उलगडा करणाऱ्या कथा व कादंबऱ्या यांचा खुराक तर भरपूर मिळाला.
        याशिवाय अनेक अप्रत्यक्ष फायदे होतेच. आजच्या बंद फ्लॅट संस्कृतीत परिचितांचा संपर्क कमी! पण  देवाण घेवाण करण्याच्या वेळात अनेक शेजारी पाजारी भेटू लागले. नवीन ओळखी होऊ लागल्या. सुख दु:खाची बोलणी होऊ लागली. आवडलेल्या पुस्तकांसंबंधी माहितीची देवाण घेवाण होऊ लागली.
       आमची पुस्तक पेढी चालवणारे डॉक्टर गोखले , श्रीमती गोरे अश्या सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या व्यक्तींची ओळख झाली.
       अश्या अनेक गोष्टी पुस्तक पेढीने दिल्या. तरीही एक खंत जाणवते. आजची इंग्रजाळलेली टेक्नो सैव्ही तरुण पिढी मात्र या उपक्रमापासून   खूपच दूर आहे. मराठी साहित्य या पिढीसाठी अजूनही अनोळखी आहे . जोपर्येंत पुस्तक पेढी त्यांच्या पर्येंत पोचत नाही तो पर्येंत साहित्यातून होणारे संस्कार त्यांच्यावर होणार नाहीत आणि    तो पर्येन्त पुस्तक पेढीचे उद्धिष्ट १००% साध्य होणार नाही    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा