शुक्रवार, २२ मे, २०१५

लक्ष्मी रवींद्र आचरेकर - पुस्तक पेटीने मला काय दिले. वर्तक नगर ठाणे (निबंध स्पर्धा २०१२)


पुस्तक पेटीने मला काय दिले? हा निबंधाचा विषय होऊ शकतो का? मला पडलेला प्रश्न तुम्हाला हि पडू शकला असता खरे ना? पण मी म्हणते या विषयावर एक शोध निबंध हि होऊ शकतो.
   खरेच मला या पुस्तक पेटीने काय दिले यापेक्षा किती दिले यावर लिहायला २५० शब्दाची मर्यादा खूप कमी आहे.
   वयाच्या ७२ व्या वर्षात पदार्पण करताना खूप करायचे राहून गेले हि खंत मनात होतीच. दुपारचा उदासवाणा वेळ , संध्याकाळची सरती कातर वेळ सारच कसे हुरहूर अनामिक एकटेपणा जाणवणार.
    पण ग्रंथ तुमच्या दारी ची हाक कानावर आली. सर्व सोपस्कार पूर्ण होऊन पेटी आमच्या मंदिरात डेरेदाखल झाली. आणि मनाची आणि शरीराची हि तगमग शांत  झाली. किती आणि कोणते वाचू ?अलिबाबाची गुहाच जणू हाती आली. वांड:मायाचे विविध प्रकार गुण्या गोविंदाने पेटीतल्या १०० ग्रंथात विराजमान झाले होते. हि विविध ग्रंथ संपदा जणू सांगत होती हे अक्षर धन तुमच्यासाठी ज्या एका पुस्तक वेड्याने खुले केले ते स्वीकार. मनात सलणारा एकटेपणा मरगळ दूर करून पुन्हा एकदा जगाच्या ह्या पसाऱ्यात  मोकळेपणाने श्वास घे.
    " पुस्तका  सारखा दुसरा सच्चा मित्र नाही" हे थोरा मोठ्यांचे वचन लहानपणापासूनच पाठ होते. पण या मित्राची पाठ राखण उमेदीच्या काळात , लौकिक सुखाच्या शोधात कधी भासली नाही.पण काळाच्या ओघात कृतांत कर कमाल , ध्वज जर दिसो लागले याची जाणीव  देह मनावर उमटू लागली आणि खर्या मित्राची ओढ जाणवली
      या पुस्तक मित्राने मला जगाच्या कानाकोपऱ्यातील यात्रा घडवली. पृथ्वीच्या गोलात जग समाविष्ट झालेले पाहतो पण ह्या ग्रंथांनी देश परदेश तेथील संस्कृती, लोक, माणुसकी, निर्दयता यांचे समग्र दर्शन घडवले जगाच्या कोणत्या हि देशात जा प्रत्येक स्थळी माणसाचे माणूसपण मत्सर , हेवेदावे प्रेम मैत्री , ऋणानुबंध मानवी मनाचे तरल भाव विश्व   पराकोटीचा द्वेष   विस्मय चकित करणारे देश प्रेम सारखेच , फक्त भाषा वेगळी. पण त्यातूनच झिरपणारा माणुसकीचा एक सूक्ष्म निर्झर मला सापडला. "men are not born they are made" या वचनाचा अर्थ लावता आला. "अवघे विश्वची माझे घर" हा प्रत्यय पुस्तकाच्या प्रवास वर्णनातून मला   सापडला.
      तळागाळातला अति क्षुद्र समजला जाणारा माणुस त्याची न संपणारी दु :खे यातना आणि भ्रष्ट सत्तालोलुप धन कोडग्या माणसांची न संपणारी धन विषयक लालसा यातली सीमा रेषा यामध्ये मी चक्रासारखी फिरत राहिले हे जीव घेणे सत्य या माझ्या पुस्तक पेटीतल्या मित्रांनी निदर्शनास आणून दिले. मानवतेच्या कक्षा अधिकच गडद होत गेल्या. वय झाले म्हणून काय झाले ? समाजाकरिता करता येण्यासारखे खूप काही  आहे  हे त्या पेटीने मला शिकवले.
       पण त्याच बरोबर जीवन किती सुंदर आहे जीवनातील प्रत्येक क्षण हा अखरेच क्षण आहे असे समजून प्राप्त परिस्थितीत आनंद माना हा संदेश ह्या पुस्तक मित्रांनी दिला.     
        जीवन मरणाच्या सीमा रेषेवर उभी असणारे माझ्यासारख्या असंख्य स्त्री पुरुषांना हि पुस्तक रुपी पणती म्हणते तुमचे सर्व सुख दु;ख भावविश्व , आशा निराशा या पुस्तकांच्या प्रकाशात शोध
        हे दान मला पुस्तक पेटी ने दिले.  
                       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा